Knowning of self is not an event, its Process..
हो मात्र ह्या proces मध्ये आपण असणं महत्वाचं नाही का ?
असं कित्येक वर्ष अविरत सुरु होतं..
दोन वर्ष घरी नव्हतो तेव्हा मात्र ह्यात खंड पडला होता बरं का..
असं कुणीतरी लिहिलं आहे ते खरंच आहे कि,
It is said some lives
are linked across time..
Connected by ancient calling
that echoes through the ages..
पुन्हा आता जेव्हा घरी आलो तेव्हा ही जाणीव झाली..
अचानक सर्व डोळ्यासमोर तरळलं..
जगण्याचं समाधान मिळावं ही तशी प्रत्येकाचीच इच्छा.. त्यानुसार प्रत्येकानेच जपलेलं आपलं वेगळेपण हे ओघाने आलंच.. जिथे राहतो जिथे जगतो तिथली जागा , तिथल्या भिंती पासून माझा शर्ट, माझी वही इ... निर्जीव वस्तूंत का होईना आपसुक नातं तैयार होतंच.. मग जरा का बदल झाला की गडबड सुरु होतेच म्हणून कुणीतरी म्हंटलं आहे ना कि रात्र वैरी कधीच नसते.. वैरी ठरतात त्या सवयी..
असो..! सजीवांशी मात्र नातं निर्माण होतं नसतं तर ते करावं लागतं.. तेही आपल्यातील कलागुणांनीच..
घराच्या बाल्कनीत तासन् तास बसून गप्पांतुन 'लोकवांङ्मय'प्राप्ती हा जणू आमच्या जिव्हाळ्याचा विषय.. लहानपणापासून पक्ष्यांसाठी तांदळाचे दाणे ठेवणे, उन्हाळ्यात पाणी ठेवणें हा तसा बाबांचा नित्यक्रमच..
तुम्ही पाळीव प्राणी पाळता का असं एखाद्याने विचारावे अन् कुठला प्राणी नाही पाळत ?हे उत्तर आम्ही द्यावे हे ठरलेलेच..
साधारण ह्याची सुरवात कधी झाली ते आठवत नाही.. जाणिव मात्र व्हायला लागली.. ती केलेल्या प्रयोगानंतर..
‘’जिचं रूप मोहक विलक्षण आहे.. निसर्गातील कलागुणांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीच ती कदाचित एका जागी जास्त वेळ स्थिरावत नसावी.. मात्र दिसताक्षणीच डोळ्यांत भरणारी.. सूर्यनारायणानंतर येणारी.. मध्यंतरी पतंगाच्या मांज्यामुळॆ असो किंवा मोबाईल टॉवरच्या लहरींमुळॆ दुर्मिळ होत चाललेली.. 'Struggle of Existence' च्या नियमांत आपल्याला बसवून आपली प्रतिकारक्षमता वाढवून पुन्हा डौलात जगणारी.. जिचं कौतुक करावं तितकं कमीच अशी चिऊ ताई.. !!’’
सूर्योदयानंतर दररोज आवर्जून उठवायला येणारी.. वेळेत नाही उठलं तर रागही येतो बरं का इकडे..जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मनमुराद ओरडायचं..‘चिवचिवाट’ ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय ह्याची जाणीव नेमकी तेव्हा झाली..
सुरवातीला वाटलं की योगायोग असेल (असा मनाचा समज)
कधीतरी वाचता वाचता आतल्या खोलीत झोप लागली तर सकाळी त्या खिडकीत न येता आतल्या खिडकीतच प्रकटावं तेही सुप्रभात म्हणायला.. आपणही नात्यात गरज नसताना अशीच परीक्षा घेतो ना एखाद्याच्या विश्वासाची ?
प्रेम, विश्वास, आपुलकी यांचा परिणाम म्हणजेच नातं.. कधीतरी पेरलेलं बीज जेव्हा मोठं होऊन एखाद फळं देतं तेव्हा ते मलाच हवं ही अभिलाषा नसतेच मुळी कुणात.. आपण केलेल्या प्रेमाचं ते प्रतीक असतं.. कुठलाही पाळीव पक्षी-प्राणी अन् त्याच्या लीला पाहणे हा एक सुखद अनुभव आहे.
हा योगायोग आहे का? निश्चितच नाही..
नात्यात आपलंपण ऐकू येतच.. फक्त ‘कान‘ असणं गरजेचं..
आपल्या मनीचे गुज उलघडणारी एखादी 'मनी' असतेच कुठेतरी..
आपल्या हाताने जेवणारा एखादा 'राजा' असतोच कुठेतरी ..
आपल्याच आवाजाची नक्कल करणारा 'हिरवा' जादूगार असतोच कुठेतरी..
कधीतरी खाटिकाकडून वाचलेला अन् नवीन जन्म मिळालेला इवलासा 'ससा' असतोच कुठेतरी..
सध्या कुठलेच प्राणी पाळत नाही कारण वाढत्या वयाबरोबर जसं मनही मोठं होतं गेलं तसं उमगलं..
‘मानवी’ बंधनापेक्षा ‘निसर्ग’बंधनात त्यांना जास्त भावतं आणि त्यातच त्यांचं ‘स्वातंत्र्य’ जपलं जातं..
पुन्हा नवी पहाट होईल..
पुन्हा एकदा सूर्य उगवेलं..
पुन्हा प्रेमाची पावती घेऊन चिऊ ताई येईलंच..
पण प्रश्न मात्र हाच असेल
नातं कुठलंही असो !
मग ते टिकवायचं की मोडायचं ?
उत्तर आपल्या 'इच्छेत' आहे..