‘’उठ सुहास उठ , अरे झोपलास काय
? कितीदा तो उशीर करणार ऑफिस ला जायला ?? उठलो देखील.. आजची लिस्ट खूपच मोठी आहे बाबा..
जाताना दळण टाकायचं आहे, बाबांच्या
फोनला रिचार्जही करायचं आहे, येताना आईसाठी चाफ्याची फुलंदेखील आणायची आहेत, आज तारीख
काय ? अरे हा, आज तर माझ्या प्राणाहूनही प्रिय असणा-या ताईचा वाढदिवस.. तिला छोटंसं
गिफ्ट तरी आणूच.. चल आई येतो गं.. अरे ट्रेन आज सुद्धा लेट आहे.. वेळेवर असते तेव्हा
कुणी सालं thank you म्हणत नाही ? जाऊ दे.. आज तरी वेळेत पोहोचणार असं दिसतंय.. जेवलो
देखील, चला आता १ तास राहिलाय, घरची ओढ सुद्धा लागलीय.. निघणार, त्यात बॉसच आगमन..
आज २ तास तरी थांबावं लागणार.. ज्याची जळते ना त्यालाच कळते राव ! वरून कारण सांगितलं,
तर फुंकर म्हणून “हवं तर जा लवकर, पण sunday ला यावं लागेल”.. अखेर निघालो ८ वाजलेले..
सर्व कामं सोडून फक्त ताईला गिफ्ट घेऊन जायचं मनात ठरवलं.. ठाणे स्टेशनला उभा होतो..
आज तरी पहिल्याच फटक्यात ट्रेन पकडायची बाबा.. अखेर दोन ट्रेन सुटल्याच.. आता सोडली
तर आणखी उशीर होईल म्हणून पकडलीच.. जेमतेम एकच पाऊल डब्यात.. कसबसं पाऊल तरी ठेवायला
मिळतंय ना, ह्याच समाधान.. गाडी मुंब्रा-दिवा च्या मध्ये असेल.. मी आनंदात.. अन अचानक..
पाऊल सटकलं.. ‘’
पुढे काय ? भयंकर भीतीने मी जोरात
ओरडलो.. अन् भयंकर पडलेल्या स्वप्नाने माझी झोप उडालीच
आनंद इतकाच..
‘मी जिवंत आहे..!!’
मी.. नाव सुहास.. हसायची गोष्ट
तर दूरच..पण तोंडावर बसलेली माशी सुद्धा हलत नाही असं लोकं म्हणतात.
स्वप्नं..
लोकं स्वप्नं बघतात, आम्हाला
ती पडतात..
आमची स्वप्नंदेखील आम्ही गव्हर्मेंट
policy वरून ठरवतो..
आमची स्वप्नं शेजा-याचं ऐश्वर्य
पाहून ठरतात..
ह्याला आम्ही स्वप्नं म्हणतो
आणि मोठी लोकं Adjustment म्हणतात..
स्वप्नं,ध्येय,महत्वाकांक्षा..
जे नाव द्याल ते..
भयानक पडलेल्या स्वप्नातून मी
आता थोडा सावरला होतोच.. मग म्हंटलं जाऊ दे; आज तसं वाचलोच आहे, तर सुट्टीच घेऊया..
सकाळी उठून बाहेर पडलो ते ज्वेलर्स
च दुकान लागलं.. सुंदर दागिन्यांनी मढवलेला पुतळा पण त्यात डोळेच नव्हते.. आपलंही बहुधा
तसंच झालंय. आनंदाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असेलही किंवा ते मिळवण्याचे मार्गदेखील..
पण नेमकी दृष्टीच आपण गमावुन बसलोय.
इथे मुलीला 'वस्तू'म्हणून वाढवण्याचं
स्वप्न, तर मुलाला एक फुल्ल ऑन 'ATM पॅकेज' बनवण्याचं आई-वडिलांचं स्वप्न.. चारचौघात
बोलण्याचं शिक्षण ? चारचौघांना सांभाळुन घेण्याचं शिक्षण ?? संस्कार आहेत की नाही,
हे तर बघितलं देखील जात नाही..
ऑफिसला घ्यायची सुट्टी आपला हक्क
असतो हेच विसरतो आपण! सरकारच्या एखाद्या योजनेची मदत शेवटच्या माणसाला जशी काटुनछाटुन
मिळते तशी आमची सुट्टी..
पुढे गेलो तर रस्त्याचं काम सुरु
होतं, भर उन्हात साडीचा झोपाळा करून त्यात बाळाला झोपवुन त्याची आई रस्त्यावर काम करत
होती. आम्हांला सुखसुविधांनी प्राप्त अश्या साधनांत सुद्धा झोप येत नाही.
झोपेचं हे गणित नेमकं सोडवायला
हवं..
पुढे एक फुगेवाला दिसला. मस्त
हसत-खेळत फुगे विकत होता तो.. बघा ना.. अतिकाळजीने आपण पुढे जातंच नाही.. कधीतरी रिस्क
घेऊन निर्णय घेतला तर फार फार तर काय होईल ? निर्णय चुकेल.. मग काय? पुन्हा सुरवात करायची.. नाहीतरी कितीतरी वेळा पडत-धडपडतच
आपण चालायला सुरुवात करतो ना लहानपणी..
पुढे एक नंदीबैलवाला दिसला, लहानपणी
खूप उत्सुकता असायची त्याच्याकडून भविष्य ऐकायची; आता मात्र त्याचं वेगळंच रूप मला
दिसलं.. ‘गळ्यात घुंगरू बांधलेलं’..
इतर प्राण्यांपेक्षा विचार करायला
दिलेली बुद्धी आणि मन हे आपलं वेगळेपण.. ब-याचदा
विसरतो आपण..
आपणही असंच घुंगरू बांधून घेतलंय,
नको त्या चिंतांचं..
नंतर एक कथ्थकचा कार्यक्रम होता.
कधी नव्हे ते आज तिथे जायचं ठरवलं. कार्यक्रम सुरु व्हायला वेळ आहे, म्हणून तिथे पूर्व
तयारी पहायला गेलो. तिथे ८-९ वर्षाची एक मुलगी होती, बहुधा पहिल्यांदाच परफॉर्म करणार
होती, खूप excited होती, तिच्या घरून कोण कोण येणार आहे ते ती तिच्या शिक्षिकेला सांगत होती.. अखेर कार्यक्रम
सुरु झाला..
तिच्या पायातही घुंगरू होतंच,
तिच्या डोळ्यांत मात्र समाधान होतं..
आयुष्यात सफलता तर मिळेलच पण
समाधानही मिळायला हवं, ह्याची जाणीव करून देतात ती स्वप्नं..
जगणं आणि मरण ह्यातील रस्ता सुखाने
पार पडावा ह्यासाठी मार्गदर्शक ठरतात स्वप्नं..
(दहा दहा वेळा कपडे, भाजी निरखून
घेणारे आपण ब-याचदा जगण्याच्या बाबतीत किती casual असतो नाही ??)
कधीतरी शांत बसून 'स्व'चा विचार
करायला लावतात ही स्वप्नं.
जिंकायला तर सर्वांनाच आवडतं,
पण दुस-यालाही मदत करण्याची जाणीव करून देतात ही स्वप्नं.
कुटुंबासाठी,समाजासाठी काहीतरी
करून दाखवायचं समजावतात ही स्वप्नं.
एखाद्या वाईट स्वप्नाने आज जगण्याची
जाणीव सुरु झाली असेलही कदाचित..
मग अशी स्वप्नं लहानपणीच पाहायला
हवी होती!! आता खूप उशीर झालाय??
असं काहीच नसतं.. जेव्हा जाणीव
होते, तेव्हा सुरु करायची - नवं स्वप्नं पाहून, नवं आयुष्य जगण्याची ..
आपल्या भक्तीने देवाला देखील
विटेवर उभं करणा-या एका भक्ताचं सत्यात आलेलं स्वप्नं..
जीव हातात घेऊन लढणारे मावळे
आणि शिवबांचं स्वप्नं..
मानपान न बाळगता शक्तीसमोर नतमस्तक
होणा-या बांधवांचं स्वप्नं..
स्वराज्य हे मिळाल्याने किंवा
ब्रिटिशांकडे मागितल्याने नव्हे तर जन्मसिद्ध अधिकाराने मिळतं असं ठणकावून सांगणा-या
स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्नं..
भयानक जातीभेदांच्या भिंतीमध्येही
अवघाचि संसार सुखाचा करीन म्हणणा-या माऊलींच्या वारक-यांच दिसणारं तुळशी वृंदावन..
मग स्वप्नं पूर्णच झाली नाहीत
तर ??
हरकत नाही !!
जगायचं कसं ते शिकवतात खरी स्वप्नं..
मरावं तर कसं ? हे देखील शिकवतात
स्वप्नं..
१८/०४/२०१७