Monday, 29 January 2018

अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।






प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काहीतरी घडत असतेच, आपण त्यावेळी नेमकं काय करतो हे जास्त महत्वाचं. जगात सर्वसाधारणपणे आलेल्या प्रसंगांना तोंड देणारी तीन प्रकारची माणसं आढळतात, तेव्हा त्याविषयी मागर्दर्शन करणारा हा श्लोक. महाभारताचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असताना शांतिपर्वातील १३७ व्या अध्यायातील २० वा श्लोक हा श्लोक प्रचंड भावला होता.

अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ॥

अर्थ: भविष्यात जी परिस्थिती येणार आहे (अनागतविधाता) त्याची तयारी ठेवणारा आणि परिस्थिती आल्यावर शीघ्र विचार करणारा आणि निर्णय घेणारा (प्रत्युत्पन्नमति) अशा दोघांचीही भरभराट होते. उशिरा विचार करणारा आणि निर्णय न घेणारा नष्ट होतो.( दीर्घसूत्री )

एका सरोवरात अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती, दीर्घसूत्री या नावाचे तीन मासे आपापल्या बंधुबांधवांसह राहात होते. त्यांच्यापैकी 'अनागतविधाता' हा मासा भविष्यकाळात संकट येण्याची शक्यता दिसताच, त्या संकटातून सहीसलामत सुटण्याची अगोदरच उपाययोजना करी. 'प्रत्युत्पन्नमती' हा - आयत्या वेळी का होईना युक्ती लढवून, आलेल्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडण्यात यश मिळवी; तर तिसरा  'दीर्घसूत्री ' हा मासा 'नशिबात असेल ते होईल' असे म्हणून स्वस्थ बसून राही.

एके दिवशी संध्याकाळी, काही कोळी, दुसर्या एका सरोवरातले मासे पकडून, ते तीन मासे रहात असलेल्या सरोवराच्या काठाने चालले असता, त्यांना ते मासे दिसले. ते पाहून ते कोळी आपापसांत म्हणाले, 'वाः ! केवढे मोठमोठे मासे आहेत या तळ्यात ! सध्या आपल्यापाशी भरपूर मासे असल्याने, आता अंधारू ही लागले असल्याने, आपण उद्या सकाळी या तळ्याकडे येऊ इथल्या माशांना  नेऊ.'

कोळ्यांचे ते बोलणे एखाद्या वज्राघातासारखे कानी पडताच, ‘अनागतविधाता’ मासा त्या सरोवरातल्या माशांना जवळ बोलावून घेऊन म्हणाला, 'ते कोळी जे बोलले ते ऐकलेत ना? तेव्हा आपण सर्वांनी आत्ताच्या आत्ता दुस-या जवळच्या तळ्याच्या आश्रयाला गेले पाहिजे. नाहीतर ते कोळी उद्या सकाळी येतील आणि पाण्यात जाळी टाकून, खाण्यासाठी वा विकण्यासाठी आपणा सर्वांना पकडून नेतील. तेव्हा या संकटातून आपला बचाव करण्यासाठी अगोदरच उपाय योजलेला बरं.

कारण म्हटलंच आहे ना,

अशक्तैर्बलिनः शत्रोः कर्तव्य प्रपलायनम्
संश्रितव्योऽथवा दुर्गो नान्या तेषां गतिर्भवेत्

अर्थ: आपला शत्रु जर प्रबळ असेल, तर अशक्तांनी एक तर पळ काढावा किंवा एखाद्या किल्ल्ल्याचा आश्रय तरी घ्यावा. जीव वाचविण्याचा याशिवाय त्याला अन्य मार्ग नसतो.

‘अनागतविधात्या’चं हे बोलणं ऐकूनप्रत्युत्पन्नमती’ म्हणाला, 'तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण आजच्या आज इथून त्या दुसर्या सरोवरात गेले पाहिजे. आता 'वाडवडील राहात आलेले हे ठिकाण सोडून दुसरीकडे कसे जायचे?' असा विचार आपल्यापैकी एखाद्याच्या मनात येईल, पण त्यात अर्थ नाही.
कारण,

यस्यास्ति सर्वत्र गतिः कस्मात्
स्वदेशरागेण हि याति नाशम्
तातस्य कूपोऽयमिति ब्रुवाणाः
क्षारं जलं कापुरुषाः पिबन्ति

अर्थ: जो सर्व ठिकाणी - म्हणजे कुठेही - जाउ शकतो, त्याने मायेपोटी स्वदेशात राहून, स्वतःला का म्हणून बरबाद करून घ्यायचे ?' कशीही असली तरी ही वडिलांची विहिर आहे.' असे म्हणणार्या क्षुद्र लोकांवर त्या विहिरीचे खारे पाणी पीत राहण्याचा प्रसंग येतो.

‘प्रत्युत्पन्नमतीने’  अनागतविधात्या’च्या म्हणण्याला दुजोरा देताच ‘दीर्घसूत्री’ नावाचा मासा खदखदून हसला त्यांना म्हणाला, 'हे पहा, ते कोळी' उद्या येऊ' असे जरी म्हणाले असले, तरी नक्की येतीलच असे थोडेच आहे ? त्यातून समजा जरी ते आले तरी जय माशांचे आयुष्य संपत आलेले असेल, तेच त्यांच्या जाळ्यांत सापडणार मरणार. अशा परिस्थितीत, वाडवडील रहात आलेले हे सरोवर सोडून मी तरी दुसरीकडे जाणार नाही.'

दीर्घसूत्री माशाचा ते सरोवर सोडून   जाण्याचा निर्धार पाहून अनागतविधाता प्रत्युत्पन्नमती हे दोन मासे लगेच आपल्या परिवारासह दुसऱ्या सरोवरात गेले. आणि कोळ्यांनी जाळी पाण्यात टाकून, त्यांनी दीर्घसूत्री व त्याच्याबरोबर राहिलेले मासे पकडून त्यांना घरी नेले आणि मारून खाल्ले.
नशिबावर अवलंबून रहाणार्यांवर असे दुर्धर प्रसंग ओढवतात.



परिणामी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन जगणारेच यशस्वी होतात.
पण नेमके कसे ? तर अशावेळी इंग्रजी साहित्याच्या तासाला चालीत म्हंटलेली एक सुंदर कविता आठवते.


Drive the nail aright, boys ;
Hit it on the heads ;
Strike with all your might, boys,
While the iron's red. IIधृII 

When you've work to do, boys,
Do it with a will ;
They who reach the top, boys,
First must climb the hill.IIII 

Standing at the foot, boys,
Looking at the sky,
How can you get up, boys,
If you never try ? IIII 

Though you stumble oft, boys,
Never be downcast ;
Try and try again, boys --
You will win at last. IIII 
         
आकारमानावरूनही बऱ्याचदा आपण यश मिळेल की नाही याबाबत साशंक असतो, पण

हस्ती स्थूलतरः चाड्कुशवशः किं हस्तिमात्रोऽङ्कुशः
दीपे प्रज्वलिते प्रणश्यति तमः किं दीपमात्रं तमः
वज्रेणापि हताः पतन्ति गिरयः किं वज्रमात्रो गिरिः
तेजो यस्य विराजते बलवान् स्थूलेषु कः प्रत्ययः

हत्ती हा आकाराने बराच मोठा असून अंकुशाला वश होतो; वास्तविक हत्ती केवढा मोठा अंकुश किती लहान ? दीप प्रज्वलित केला असता, अंधाराचा नाश होतो; तसं पाहिलं तर अंधारापुढे दिवा किती लहान ? व्रजाच्या आघाताने पर्वत कोसळतात; तसं पहाता पर्वताच्या आकारापुढे वज्र किती लहान ? तात्पर्य हेच की, ज्याच्या ठिकाणी तेज असते, तोच खरा बलवान. आकारमान हे काही सामर्थ्याचे प्रमाण नव्हे. हे लक्षात येते.

आणि अनागतविधाता, प्रत्युत्पन्नमती जरी कमकुवत का असेनात,

बहूनामप्यसाराणां समवायो हि दुर्जयः
तृणैरावेष्ट्यते रञ्जुर्यया नागोऽपि बद्ध्यते

त्यांचा मोठा समूह झाला की, त्यांना जिंकणे कठीण जाते. म्हणून तर गवताच्या काड्यांपासून बनविलेल्या दोरीने हत्तीलासुद्धा बांधून ठेवता येते.