Sunday, 19 February 2017

हे भलते अवघड असते..




“प्रश्न लवकर पडतात,पण उत्तरं शोधावी लागतात. त्याकरीता वाट पहाण्याखेरीज काहीच गत्यंतर नसते.”
मला भावलेली गोष्ट म्हणजे मी तिला दिलेल्या कोड्याच्या उत्तरानंतरही तिचं वागणं बदललं नव्हतं. अर्थात हे मात्र दिलासादायक होतं. कोडं ? तिलाही जाणवलं.. नुसतंच प्रश्न नसलेलं. विचार करायला भाग पाडलेलं.. पण नेमकं काय आहे, हे समजायला तिला महिनाभर तरी लागला. 
म्हणजे,  तू=२ मी=४ मैत्री=६

१) २४६२४६

२)प्रतिष्ठा,पैसा,राग,संशय,आनंद,आदर,भीती,अपेक्षा,सुंदरता,सवयी,काळजी= ११
 २४६२४६/११ = २२३८६

३)प्रतिष्ठा,पैसा,राग,संशय,आनंद,आदर,भीती,अपेक्षा,सुंदरता,सवयी,काळजी,मन,बुद्धी= १३
 २२३८६/१३  = १७२२

४) १७२२/२४६= ७

मग मात्र तिने मला कॉल केला की, “अरे मला उत्तर मिळालंय. आता तरी ते तिकीट उघडून पाहू का. ?” मला तिला मिळालेल्या उत्तरापेक्षाही तिने तिकीट अजूनही न उघडण्याचा ‘खरेपणा’ नक्कीच भावला होता.
खरंतर आपण एखाद्याला काही सांगावं आणि त्याला ते कळू नये, ह्याखेरीज दुसरी कुठलीही वाईट गोष्ट ह्या जगात नाही. परंतु मला ठाम विश्वास होता की, कोडं हे ‘निमित्त’ होतं अन् मला जे ‘सांगायचं’ आहे ते ‘वेगळंच’ होतं..
तिचा एकेदिवशी फोन आला की आज अचानक गावी जायचं आहे काही दिवस. मग मी तिला म्हणालो, “सगळं आवरून आमच्या घरीच आज जेवायला ये. त्यानिमित्ताने आई-बाबांशीही ओळख होईलच.” ती आली, जेवण देखील झालं:  त्यादिवशी 'कोकणकन्ये'चं दर्शन घरच्याना झालंच! मग घरच्यांची परवानगी घेऊनच मी तिला सोडायला गेलो. मला कोड्याच्या उत्तराची प्रतीक्षा होतीच. ट्रेन निघण्यापूर्वी तिने माझ्या हातात एक पत्र दिले.

तिने माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं.ज्यात लिहिलं होतं..  

प्रिय व्योम,
       कसा आहेस ? तू मजेतच असतोस नेहमीच, मीही मजेत आहे. ऐक ना.. समोर भेटल्यावर नेमकं हेच बोलता येईल की नाही किंवा फोनवर नीट सांगता येईल की नाही समजत नाही; म्हणून पत्रातून व्यक्त होतेय.भावनांना पोहोचवण्याचं एक आवडतं साधन - पत्र..!!तुझ्या तीन अंकी कोड्याचं उत्तर मला मिळालंच. पण तुला नेमकं काय सांगायचं आहे हे मला समजलं, तेव्हा खूप खूप खूप आनंद झाला. किती सहज बोलतोस रे तू ? तुझा खूपच हेवा वाटतो मला.
तू, मी, मैत्री हे आपल्या जीवनातील न विसरता येणारे खास अनुभव. ज्यांना तू २वेळा सरळ गृहीत धर म्हणालास. एकदा तुझ्यासाठी आणि एकदा माझ्यासाठी. ब-याचदा आपण  नातं नेमकं प्रतिष्ठा, पैसा, राग, संशय, आनंद, आदर, भीती, अपेक्षा, सुंदरता, सवयी,काळजी ह्यावर निवडतो ? की खरंच आपुलकीने ? म्हणून त्याने भागलं की उरतोस फक्त 'तू..' नातं जसं मिळतं, तसं दिल्यानेच पूर्ण होतं, नाही का ? म्हणून पुन्हा मीही त्यातुन प्रतिष्ठा, पैसा, राग, संशय, आनंद, आदर, भीती, अपेक्षा, सुंदरता,सवयी, काळजी अन् सर्वात महत्वाचं मन, बुद्धीच समर्पण सुद्धा. ह्यांनी 'तू'ला भागलं.. की उरते फक्त 'मी'.
'मी' लाही तू,मी, मैत्री ने भागलं की उरते  फक्त ' साथ-प्रेमाची..!!'
किती रे सुंदर विचार करतोस ? ते तिकीट उघडायच्या आधीच मला समजलं होतं हे सारं तुझ्या कोड्यातून.. नव्हे ! तुझ्या विचारलेल्या प्रश्नातून. पण तरीही एक औपचारीकता म्हणून मी तिकीट पाहिलं आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला समजलं. किती सुंदर आहे ना.. आपण कुणावर तरी प्रेम करावं, ह्यापेक्षा आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे, ही भावनाच खूप सुखद आहे..
                                                                                                            - अवनी



कोड्याचं नेमकं उत्तर तिला मिळालं होतं ह्याच खूप समाधान होतं पण तिच्या मनात काय असेल ह्याची उत्सुकता ही..

काही दिवसांनी ती गावावरून परतलीदेखील,सोबत गावाचा 'खाऊ' घेऊनच..नातं सांभाळणं एकवेळ सोप्पं असतं पण नातेवाईक.. न बोललेलं बरं.. हा खाऊ दुसरा तिसरा कुणी नसून तिचा मामेभाऊ होता. तिच्यासोबत आलेला. आल्यानंतर प्रत्येकवेळी तिच्या बोलण्यात तोच असायचा आणि भेटीसाठी ती आल्यावरदेखील तोच. लहानपणी जसं आपल्या वाटणीचा खाऊ आपल्यालाच मिळावा अन् दुस-या कुणालाही तो मिळू नये ही भावना मला खूप सतावत होती.  ती तशीच होती.. पण मी मात्र बदलत होतो..
एके दिवशी आम्ही सोबतच होतो. तिला पंचतंत्रातल्या गोष्टी फार आवडायच्या.तिच्या आज्जीने तिला लहानपणी खूप सांगितलेल्या. ती मला एक गोष्ट सांगत होती. एक छोटी मुलगी तिच्या आजोबांचा हाथ धरून चालली होती. एक मोठं झाड त्यांच्या शेतातलं.. ती म्हणाली, ”हे  झाड खूप जुनं आहे ना ?”
आजोबा म्हणाले, “हो माऊ..अगदी माझ्याही आधीचं..!!”
“आजोबा, झाडं इतकी वर्ष कशी काय टिकतात ?”  
“खरं सांगू, मला नेमकं ठाऊक नाही; पण माझ्या अनुभवावरून मला समजलं आणि आपल्या पूर्वजांनी नाती जपण्याचा आश्वासक दृष्टीकोन दिला, त्यातुन  ते तुला सांगतो. झाडं आपुलकीनेच वाढतात. ‘झाडं सजीव आहेत’, असं जगदीशचंद्र बोस यांनी जगाला प्रयोगाने सांगितलं, त्यापूर्वीही कित्येक अगोदर वृक्षांशी असलेलं भावविज्ञान येथे ज्ञात होतंच की ! त्यांना आपल्या स्पर्शांतून मोठं होण्याची प्रेरणा मिळते. मायेची ऊब मिळते, अगदी थंडीत तुझ्या आज्जीने शिवलेल्या गोधडीची उब तुला मिळते तशी.
झाडं परोपकारी असतात.. तू त्यांना दगड मारलास, तर ते तुला फळं देणार नाहीत असं होत नाही. चुकीला शिक्षा अशी असते की ती चूक पुन्हा होऊ नये हे समजायला हवं.  
झाडं मोठं होईपर्यंत मातीशी नाळ जोडतात आणि मोठी झाली तरी मातीचे उपकार विसरत नाहीत. ही त्यांनी स्वीकारलेली मातीची गुलामी नव्हे किंवा अगतिकतेने पत्करलेली शरणागती नव्हे; तर आयुष्यभर सोबत राहण्यासाठी केलेलं जाणीव पूर्वक समर्पण आहे.
झाडं वाढायला खूप वर्ष लागतात. पण आजुबाजूचं गवत किंवा बांडगुळं वाढायला काही दिवसही पुरेसे असतात. तसंच आकर्षण वेगळं आणि प्रेम वेगळं. सोबत असणं वेगळं आणि आपुलकी असणं ह्यात खूप फरक असतो.
माऊ, तू खुप लहान आहेस, कधीतरी ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.”
मग मी अवनीला घरी सोडलं आणि मी माझ्या घरी जायला निघालो.
‘नेमकं तिच्या मनात काय आहे ?’  मला काहीच समजत नव्हतं..

मी अस्वस्थ झालो होतो. एका नव्या सूर्योदयाची वाट पहात होतो. पण डोळ्यांसमोर मळभ दाटलं होतं.
घरी पोहोचलो, जेवलो आणि मग तिला Gud Night चा sms करणार तेवढ्यात तिचा sms मला आला.
त्यात लिहिलं होतं..


‘’दृष्टीतून _ _ _ _ ,
_ _ तुन मायेची ऊब,
चुकांतून _ _ _ ण्याची वृत्ती,
शरण नव्हे तर _ _ _ _चा भाव संपला ना..
तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत नाहीत.
म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला कि 'जगण्याचा' त्रास होत नाही.
संबंध जपताना _ _चंच खतपाणी घालायला हवं;
कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात.’’


मी शब्दांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार तेवढ्यात निद्रादेवीच्या अधीन कधी गेलो समजलंच नाही.

क्रमश:







हे भलते अवघड असते..
(भाग ४)

Thursday, 16 February 2017

The only freedom is the freedom from the known - जे.कृष्णमूर्ती.



जे.कृष्णमूर्ती (११ मे १८९५) प्रख्यात भारतीय विचारवंत. जन्म तमिळनाडू राज्यातील मदनपल्ली (जि. चित्तूर) येथे. वडिलांचे नाव नारायण अय्या. आडनाव जिद्दू. १९०९ मध्ये सी. डब्ल्यू. लेडबीटर व मिसेस अ‍ॅनी बेझंट यांना अंतर्ज्ञानाने, केवळ तेरा वर्षे वयाच्या कृष्णमूर्तीमध्ये त्याच्या उज्ज्वल भावी आयुष्याची पूर्वचिन्हे दिसली. त्यामुळे त्यांनी कृष्णमूर्तीच्या शालेय आणि आध्यात्मिक शिक्षणाची जबाबदारी पतकरण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कृष्णमूर्तीच्या वडिलांनी प्रथम कृष्णमूर्तींना त्यांच्या स्वाधीन करण्याचा करार केला. तथापि नंतर मात्र त्यांनी मुलाचा (कृष्णमूर्तीचा) ताबा मिळावा म्हणून दावा दाखल केला. प्रिव्ही कौन्सिलने मिसेस बेझंटच्या बाजून निकाल दिला (१९१२–१४).१९१४ ते २१ ह्या काळात मिसेस बेझंट यांनी खाजगी रीत्या नामांकित शिक्षकांकरवी कृष्णमूर्तीचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण करून घेतले, तसेच कृष्णमूर्तीच्या आध्यात्मिक कार्याकरिता १९११ मध्ये ‘पूर्वतारक संघ’ (द ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट) ह्या संस्थेची आणि तिच्या हेराल्ड ऑफ द स्टार  ह्या मुखपत्राची स्थापना केली. संघाच्या प्रमुखपदी त्यांनी कृष्णमूर्तीची स्थापना केली. ‘पूर्वतारक संघा’चे १९२८ मध्ये सु. एक लाख सभासद होते. हॉलंडमध्ये एक किल्ला व सु. २,०२५ हे. जमीनही संघास देणगी म्हणून मिळाली होती. संघाचे वार्षिक मेळावे भरत, तसेच जगद्गुरूशी मीलन झाल्याची घोषणा होऊन कृष्णमूर्तीची स्वतंत्र विचारांनी ओतप्रोत अशी प्रवचनेही होत. त्यामुळे कृष्णमूर्तींची कीर्ती जगभर पसरली.

दुभते जनावर दूध देण्याचे बंद झाल्यानंतर त्याची रवानगी कोंडवाड्यात का केली जाते ? झाडाला फळे लागणे बंद झाले म्हणजे त्याच्यावर कुऱ्हाड का चालव‌िली जाते ? ही रोजच्या जगण्यातली उदाहरणे इतरांवर प्रेम करण्याच्या मुळाशी काहीतरी अपेक्षा असण्याचे प्रत‌िन‌िधीत्व करतात. कोणत्याही अपेक्षेश‌िवाय आपण इतरांवर प्रेम करू शकत नाही, ही व्यावहारिक भावनाच प्रत्येक मानवाच्या आण‌ि मानवी समूहाच्या प्रत्येक समस्येचे मूळ आहे, हा सिद्धांत जे.कृष्णमूर्तींनी आपल्या विचारांतून मांडला आहे. श‌िक्षणपद्धतीतून समाज घडतो. या पद्धतीची बीजेच नीतिमूल्यांना सुरुंग लावणाऱ्या तत्त्वांनी बाधित झाली आहेत. निरपेक्ष प्रेमाचे कोंदण या शैक्षण‌िक बीजांना ‌मिळाले तर समतोल समाजाची न‌िर्मिती शक्य आहे, हा नवा श‌िक्षण विषयक दृष्टीकोन त्यांनी रूजव‌िला आहे.

कुठल्यातरी अपेक्षा किंवा मानवी स्वभावाच्या वृत्तींवर अवलंबून असणारी प्रेमाची संकल्पना अवलंब‌ित्वामुळे अपूर्ण ठरते. देशात सध्या प्रचल‌ित असणारी श‌िक्षणपद्धती हे अवलंब‌ित्व आण‌ि अपूर्णत्व येथील समाजाला देते. समाजातील समस्यांचे मूळ श‌िक्षणातील मूल्यश‌िक्षणाच्या विरोधी तत्त्वांमधून येते, याकडेही जे. कृष्णमूर्तींचा विचार प्रकर्षाने निर्देश करतो. या समाजाला संघर्षाच्या न‌ियमापल‌िकडे नेण्याच्या प्रक्रियेला जे. कृष्णमूर्ती मुक्ती मानतात. निरपेक्ष प्रेम हे मुक्तीच्या संकल्पनेच्या जवळपास पोहचते. कुठल्यातरी भावनेला किंवा अपेक्षेला प्रत्युत्तर म्हणून व्यक्त झालेले प्रेम हे प्रत‌िक्रीया असू शकते. जेथे प्रत‌िक्रीया येते त्यामागे व्यापार किंवा व्यवहार दडलेला असू शकतो. हे व्यवहार विरहीत प्रेम समाजात न‌िर्माण होण्याची प्रक्रिया मानवी समूहाचा प्रवास मुक्तीच्या दिशेने नेते. विचारांची सर्व आंदोलने शून्यात विलीन करून या मुक्तीच्या दिशेने मानवी समूहाला नेण्याचे स्वप्न जे. कृष्णमूर्ती यांनी पाह‌िले. हे स्वप्न सत्यात उतरव‌िण्यासाठी त्यांना चालून आलेल्या विश्वगुरूपदाचा त्याग करून व्याख्याने, ल‌िखाण आण‌ि संवाद या माध्यमांद्वारे माणूस अन् माणूस उभी हयातभर त्यांनी प‌िंजून काढला.

आपल्या पाल्याने श‌िक्षण अन् करिअर मधल्या रॅट रेसमध्ये ट‌िकाव धरावा. जीवनात त्याने सत्तेची आण‌ि भौतिक उंचीची पदे त्याने पादक्रांत करावीत, एवढ्याच मर्याद‌ित ध्येयासाठी पालकरूपी समाज जगतो. मात्र, तुम्ही ज‌ितके वर जातात त‌ितके इतर दु:खी होतात, हा विचार कृष्णमूर्ती मांडतात. याचा अर्थ सत्तेची किंवा उंचीची पदे कुणीही पादक्रांत करू नये असा नाही तर त्या सत्ताप्रवासाला समाजाची आक्षेपरह‌ित संमती असायला हवी, या विचारांकडे त्यांचा कटाक्ष आहे. सत्तेचे पद साम, दाम, दंड अन् भेद या लालसेतून जन्म घेते. ही लालसा न‌िर्माण करणारी श‌िक्षणपद्धतीच बदलवली तर स्पर्धारह‌ित समाज न‌िर्मिती शक्य आहे, हा दृष्टीकोन ठेऊन भारतासह इंग्लंड आण‌ि अमेरिकेत कृष्णमूर्तींच्या अनुयायांनी श‌‌िक्षणसंस्था सुरू केल्या आहेत. आपल्या जीवनात आपणच स्वत: स्वत:चे श‌िक्षक आण‌ि विद्यार्थी बनण्याचा अनोखा विचारही ते मांडतात.

सध्या आपले सामाजिक जीवन कलह, द्वेष, मत्सर, युद्धे इत्यादींनी आणि वैयक्तिक जीवन काळजी, भीती, दुःखे इत्यादींनी भरलेले आहे. याच्या मुळाशी मन-बुद्धी यांविषयीचे आपले अज्ञानच आहे. मन-बुद्धीची मुख्य वैगुण्ये पुढीलप्रमाणे होत : (१) मन पूर्वसंस्कारांनी बद्ध आहे. (२) आपण समस्यांची वर्णने, चिकित्सा, उपाय योजना इ. करताना परिस्थितीला परस्परविरोधी मर्यादा घालतो. (३) कर्ता ‘मी’ याला आपण अवास्तव महत्त्व देतो. (४) पूर्वानुभवावर विसंबल्याने नित्यनूतन वर्तमानाचा आपणास विसर पडतो. या सर्व चुकांवर कृष्णमूर्तीच्या मते एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, आपल्या मनाच्या सर्व व्यापारांकडे आपण स्तब्धतेने, त्यांना चांगले-वाईट न म्हणता अथवा त्यांबाबत कुठलीही अभिलाषा न बाळगता, निव्वळ पाहणे किंवा त्यांची अवधानपूर्वक संपूर्ण जाणीव बाळगणे (अवेअरनेस) हा होय. यामुळे चुका उघड होऊन, सत्याचा प्रादुर्भाव होतो. मन अधिक विचलित न झाल्यास प्रादुर्भूत सत्य दृढ होते. अशा प्रकारे स्तब्धतेने चुकांचे निरसन करणे, म्हणजेच ध्यान होय. एकंदरीत कृष्णमूर्तींनी प्रतिपादन केलेला मार्ग अध्यात्माचा अथवा तत्त्वमीमांसेचा नसून, तो ज्ञानमीमांसात्मक योगमार्ग म्हणजे ‘समत्व योग’ आहे. वैश्विक दृष्टी,मानव व पर्यावरणाचा विचार,शास्त्रीय दृष्टीचा समावेश असणारी धार्मिक चेतना ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवुनच त्यांनी शाळा सुरु केल्या.

भयासारखी भावना अनुभवल्याश‌िवाय आनंदाची अनुभूती अपूर्ण आहे. भय असो वा आनंद प्रत्येक भावनेचा वाहक विचार असल्याकारणाने त्या विचारांवरील नियंत्रणच विचाररह‌ित अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यास कारणीभूत आहे. हे लक्षात घेऊन विचाररह‌ित मनोवस्था साधण्याचा सराव मानवी समस्यांच्या पल‌िकडे मानवी जीवनाला घेऊन जातो, हा अनुभवण्यासारखा स‌िद्धांतही त्यांच्या ओघावत्या ल‌िखाणातून येतो. वैश्व‌िक आण‌ि शास्त्रीय दृष्टीकोन, बाळगणाऱ्या जे. कृष्णमूर्तींच्या विचारांमधील श‌िक्षण दारिद्र्यापासून ते आण्व‌िक युद्धांपर्यंतचे सर्व प्रश्न आपल्या कवेत घेते. आत्मकेंद्रित समाजाचा दृष्टीकोन जगात विषमता अन् दुहीपेक्षा इतर वेगळी फळे देऊ शकणार नाही, यासाठी निरपेक्ष प्रेमाची कृती प्रत्येक मानवाच्या जीवनात रोजची दीपावली साजरी करू शकेल.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी जे.कृष्णमूर्तींचे निधन झाले.
जीवनाच्या संघर्षात भाकरीपासून ते आण्व‌िक युद्धापर्यंतच्या प्रश्नांनी सारे जगच ढवळून न‌िघाले आहे. या टप्प्यावर तत्वच‌िंतनाच्या बैठकीला जग कितीसे गांभीर्याने घेणार ? या प्रश्नाला भीक न घालता जे.कृष्णमूर्तींचा श‌िक्षण विषयक संदेश या दीपावलीत अंतरीच्या उंबरठ्यावर प्रकाश पाडण्यास पुरेसा ठरावा..

कृष्णमूर्तीचे ग्रंथलेखन
फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम (१९५४), एड्यूकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाइफ (१९५५), कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग (तीन भागांत – १९५६,५९,६०), लाइफ अहेड (१९६३), धिस मॅटर ऑफ कल्चर (१९६४), फ्रीडम ऑफ द नोन (१९६९), द ओन्ली रेव्हील्यूशन (१९७०), द अर्जन्सी ऑफ चेंज (१९७१) इत्यादी. यांशिवाय त्यांच्या प्रवचनांचे व भाषणांचे पंचाहत्तर संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी पेंग्विन कृष्णमूर्ती रीडर (१९७०) उल्लेखनीय आहे.













Monday, 13 February 2017

हे भलते अवघड असते..





हे भलते अवघड असते..
    (भाग ३)



…अवनी मुंबईला येणार ही आनंदाची बाब होतीच;  पण त्या चिठ्ठीत नेमकं काय होत? ही उत्सुकता जास्त होती..
ती कोड्यातच बोलते असं असलं तरी तिला ह्यावेळेस मला जपायचंही होतं आणि पत्रातून लवकर निरोप समजावा असंच काहीसं सुचवायचं होतं.. मी गणितात सामान्य असल्याने ती गणितातली कोडी मला घालणार नाही हे मी पुरता जाणून होतो..

मला लिहिलेलं पत्र फ़ारसं काही सांगणार नसलं तरी त्यात मला जे सांगायचं होतं ते मी सहजच ओळखलं होतं.. कारण एरव्ही मराठीत बोलणारी ती माझ्याशी.. मराठीत कविता करणारी ती.. माझ्याशी इंग्रजीत कसं काय व्यक्त होईल ? हा माझ्याच मनात पडलेला प्रश्न..
अंकामध्येच काहीतरी उत्तर असणार ह्याची जाणीव मला होतीच.. शाळेतही जरी कधी वेळेवर गृहपाठ पूर्ण केला नसला तरी आज मला ते उत्तर शोधायचं होतं.. कारण नंतरला फार अंतर असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं.. अखेर सगळी इंग्रजी मुळाक्षरं एका कागदावर लिहून काढली. आणि त्यांना क्रमांक दिले..
मग मला त्या अंकांची जादू समजली अन् तिला भेटण्याचे 'गणित' मला उमगले ..


M A H E F D R A     P  V  T.    L  T   D.
13 1 8 5 6 4 18 1    16 22 20   12 20  4

W   O  R  L  I
23 15 18 12 9

 M  U   M   B  A   I
13  21  13  2  1   9

: Mahefdra Pvt Ltd.,Worli,Mumbai



प्रेम वेडं असतं असं सगळेच म्हणतात.. पण मला ते 'हुशार' करत होतं..!!

नव्या शहरात तिचं आगमन झालं होतंच  आणि मग जेव्हा तिला मी भेटायला पोहोचलो. मग मुंबईत झालेली तिची अन् माझी पहीलीच भेट.. मी म्हंटलं, चल ना समोर सी-फेस आहे, जाऊ तिकडेच.. तिचं इकडे फारसं कुणी ओळखीचं नसल्याने तिनेही आढेवेढे न देता सहज होकार दिला. तिनं विचारलं मुंबईविषयी मला काय सांगशील ?

मुंबई..

लोकलच्या प्रवासात तिसरी की चौथी सीट मिळेल ? हा प्रश्नच नाही आपण फक्त प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्यायचा..
Humidity ची चर्चा दुनिया करेल.. पण marine drive वर शांतपणे बसणे ह्यासारखा आनंद कुठेच नाही..
McDonalds,Café Coffee Day मध्ये सर्वच जातील.. पण शेवपुरी आणि अस्सल वडापाव मात्र इथेच चाखायला मिळतो..
वा-याची झुळूक एकवेळ क्षणभर विसावा घेत असेलही.. पण इथली माणसं तो देखील नाहीत..
आपल्या स्वप्नांची पूर्तता करणारी, येथील अथांग अशा समुद्राप्रमाणेच कुणालाही सहज आपल्यात सामावून घेणारी..
प्रत्येकाला एकदा तरी आवर्जून पहावी असं वाटणारी मायानगरी..
दोष तर कुणीही काढतं.. पण ‘शोधक’ नजर असली की खुप काही गवसतं..

तिथे फक्त मीच बोलत होतो, ती फक्त माझ्या चेह-याकडे पाहत ऐकत होती. समुद्राने किना-याला भेटताना जसं सारंकाही द्यावं तसच अगदी मी बोलत होतो,  अचानक वाहणा-या वा-याबरोबर आलेला धुळीचा कण माझ्या डोळ्यात गेला. क्षणाचाही विलंब न करता तिने तिचा रुमाल देण्यासाठी केलेली धडपड आणि डोळ्यात मारलेली फुंकर…आपुलकी शब्दांत व्यक्त करता येतच नाही म्हणतात ना हे खरंच आहे.
वेळेचं भान ठेवून मीच मग म्हंटलं उशीर होईल ..  
चल निघुयात..
डोळ्यांत कचरा गेल्याने पाणावलेल्या डोळ्यांत काही क्षण मला धूसर दिसत असलं तरी मनात एक चित्र स्पष्ट उमटलं होतं..
ती,मी आणि मुंबई..!!

उद्या पुन्हा भेटुयात असं म्हणत आम्ही निघालो..






तिने पहिल्या पगारातच नवीन फोन घेतला होता, इथली खुशाली घरी कळवता यावी याकरिता. दुस-या दिवशी मग तिने मला नंबर दिला. अखेर माझ्या प्रेमाला तंत्रज्ञानाची जोड मिळालीच. 


मग मात्र नियमित भेटीगाठी आणि फोनवर बोलणं होत गेलं. इकडे तिला भेटण्यासाठी एकदा तिचे बाबाही मुंबईला येऊन गेले होते, तेव्हा तेही भेटलेच. काळाचे संदर्भ तसे फार कमी जणांना ओळखता येतात. गाणी ऐकताना मला गाण्याचे नवेच अर्थ समजत होते. हळूहळू मलाही कविता आव डू लागल्या होत्या. खरंच मी खूप खुश होतो. आता माझं तिच्यावर प्रेम होतं हे मला माहीतच होतं. तिला माझी सोबत जरी आवडत असली तरी तिचं माझ्यावर प्रेम होतं की नाही हे मात्र मला कळत नव्हतं. तिला इकडे येऊन महिनाच झाला होता. पण तरीही अधिक वेळ जाऊ द्यावा असं मला वाटत नव्हतं. अखेर मनात निश्चय करून मी काहीसं ठरवलंच.

मग हळूहळू जसा विश्वास वाढत गेला, तशी मला जाणीव होत गेली की आता तिच्याशिवाय जगणं सहजशक्य नाही.
एकदा सहज आम्ही फिरायला गेलो होतो. मला नाटक पहायची आवड फार, म्हणून तिने तिकीट काढून आणलेलं. नेमकं नाटक सुरु व्हायला उशीर झाला आणि अर्थात संपायलाही.. ८-९ तरी वाजले असतील. तेव्हा घरी जाऊन जेवण बनवायचा त्रास कशाला, म्हणून मग मीच म्हंटलं, “बाहेर जेवूयात?” मग तिनेही होकार दिला; फक्त एका अटीवर.. की आजची ट्रीट तिच्याकडून घ्यायची. मग मी विचार न करता, हो म्हणालो.

नाटकांचं नाव होतं.. ' LOVE YOU.. again and again..’ मला नाटक फारसं आवडलं नव्हतंच. पण तिला ते जाणवू द्यावं असं मला वाटलं नाही. कारण आवड-नावड हा प्रश्न आपुलकीत नसतोच मुळी.. इथे फक्त काळजी असते..
मग मीच म्हंटलं, “काय खाणारेस?” ती म्हणाली, “तू मागवशील ते..” मग तिच्या आवडीचं जेवण मी मागवलं.. आणि ऑर्डर जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तिला विचारलं, “तूझ्याकडे calculator आहे का गं?”

(मग बोलण्या-बोलण्यातच तिच्या कडील नाटकाचं तिकीट मी मागितलं. एका तिकिटावर मी  ' LOVE YOU..  ह्या शब्दांना - ती मी काय करतोय हे पाहणार नाही - अशा रीतीने पेनाने राऊंड केले आणि पुढे त्या शब्दांची एकूण बेरीज लिहिली. आणि म्हटलं-  “हे न उघडता तिकीट जपून ठेव एक आठवण म्हणून..”)

तर ती म्हणाली, “घरी आहे, का रे ?”
मी म्हटलं,”तीन अंकांची गणिताची जादू माहीत आहे का ? calculatorवर करण्यात मज्जा आहे.”

ती म्हणाली, “सांग तर आधी, आवडेल मला ऐकायला.”



मग मी म्हटलं की समज तू,मी आणि मैत्री हे तीन अंक.. पुन्हा एकदा तू मी आणि मैत्री.. असं सरळ गृहीत धर..

प्रतिष्ठा,पैसा,राग, संशय, आनंद, आदर, भीती ,अपेक्षा, सुंदरता ,सवयी,काळजी ह्यांना त्यातून भागलं आणि जे काही उरेल त्यांना पुन्हा प्रतिष्ठा,पैसा,राग, संशय, आनंद, आदर, भीती ,अपेक्षा, सुंदरता ,सवयी,काळजी, मन,बुद्धी ह्यांनी भागलं तर जे काही उरेल..
त्याला पुन्हा तू मी आणि मैत्रीने भाग द्यायचा ..                     मग उरतं  फक्त.. उत्तर


“उत्तर जरी तुला गवसलं तरी माझा तो प्रश्न आहे..?”

ती मन लावून ऐकत होती. तेवढ्यात आमचं जेवणही उरकलं होतंच.  माझं मन मोकळं झाल्याचा आनंद होताच.. पण तिच्या चेह-यावर, ‘कोड्याचं उत्तर काय असेल’ हेच होतं. मी तिला म्हणालो, ”एवढा काय विचार करतेस.
तुला उत्तर मिळालं की तू हे तिकीट पाहू शकतेस..” आता मात्र ती हसली आणि मग आम्ही घरी जायला निघालो.


व्यक्त होण्यासाठी कुठला तरी मार्ग लागतोच ना ? आमच्यात एक दुआ होता, ते म्हणजे ‘कोडं’. मग ह्यावेळेस मी पुढाकार घ्यायांचा ठरवलं होतं आणि मीच तिला हे विचारलं होतं..
असाच निवांत पहुडलो होतो.. डोळे तर बंद केले होतेच.. पण मन मात्र जागंच होतं.  तिला उत्तर मिळेलही.. उत्तर नेमकं मला हवं तेच असेल ? 

कधी झोप लागली समजलंच नाही प्रतीक्षा होती, एका नव्या सूर्योदयाची..


क्रमश: