Tuesday, 7 March 2017

हे भलते अवघड असते..


दोन जिवांचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मीलन घडवून आणणारा प्रेमाचा धागा म्हणजेच विवाह. सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्या आशीर्वादाने नव्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी छापलेल्या पत्रिका,पत्रिकांवर नावे कोणाची छापायची, लग्नस्थळ कुठे असावे, दोघांच्या कुटुंबीयांना लग्नस्थळ सोयीचे पडेल का?बँजोवाले, खरेदी, ह्या सर्व गडबडीत अखेर तो क्षण आलाच.. घराला रंगही देऊन झाला होता.आमच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून केळवणही झालं होतच..

नव-यामुलीची कलाकुसर पारखण्यासाठीच म्हणा ना हवं तर पण बनवलेला रुखवत खुप सुंदर होता. त्यात एक वेगळाच फोटो माझ्या आई-बाबांनी आमच्यासाठी रुखवतात ठेवायला दिला होता. त्याचा संदर्भ आम्हा दोघांनाही लागत नव्हता. त्याकडे तेव्हा लक्ष तर गेलं होतंच पण विचार करायला वेळ नव्हता.








गंमत म्हणजे त्या सोहळ्यात नऊवारी साडी,नथ घालून आलेली ती चिमुरडी,तिच्या मावशीची मुलगी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. तिचं मुरडणं पाहून सगळ्यांनाच हसू येत होतं.

मग विधीस सुरवात झाल्यावर योग्यसमयी आम्ही उभे राहिलो आणि मामींनी म्हंटलेली गदिमांची ही मंगलाष्टके विशेष भाव खाऊन गेली.

जवळ जवळ मीलनाचा मुहूर्त
उभय तरुण जीवा वाटती शब्‍द व्‍यर्थ
झटपट पट आत विप्र हो दूर सारा
अधीर बहुत झाली, पंख येतील हारा


प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्‍य ध्‍यानी धरा
आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा
सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्‍यापित्‍यांनी दिले
त्‍यांचे श्रेय सुखप्रद तुम्‍हां, ‘कुर्यात सदा मंगलम्’


गुरुजींनी पुढील सुंदर मंगलाष्टक म्हंटल्यावर मला थोडं  हसूच आलं होतं

चांदण्यात चांदणे हे पौर्णिमेचे
लुगड्यात लुगडे ते पैठणीचे
ते लुगडे नेसता मनी हर्ष दाटे
बघुनि समोर नवरा ठेंगणा स्वर्ग वाटे


त्यानंतर एकमेकांना माळा घातल्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद घेताना त्यांचा आग्रहास्तव अवनीने लाजुन घेतलेलं नाव-

हासुनी कळी फुल उमलले, मोहरून आला सुगंध
'व्योम'रावांच्या सोबतीत गवसला मज जीवनाचा आनंद..

नेमकं त्या रुखवतात ठेवायला दिलेल्या  फोटोत काय होतं हे समजत नव्हतं पण आमच्या एकत्र येण्याच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांनी आम्हाला दिलेलं एक छोटसं त्यांच्या अनुभवांतून काहीसं सुचन करणारं एक छानसं असं सांगणं होतं..


‘’सौभाग्याची जाणीव ठेवुन गरजेच्यागोष्टी प्राप्त करण्यासाठी सोबत येण्यासाठीचे पहिले पाऊल.
नातं म्हणजे केवळ दोघांचं नव्हे तर कुटुंबासाठी मिळालेल्या साधनांतून सर्वाना जपण्याची जाणीव 
वेळ कुणासाठी थांबत नाही. योग्य वेळी योग्य मार्गाने कमावलेल्या पैशानेच सुखप्राप्ती करावी ही समज
सुख मिळवणं म्हणजे नेमकं काय ? प्रत्येकाची वेगळी आणि स्वतंत्र अशी व्याख्या असली तरी ते मानण्यात आहे त्या पेक्षा मिळवण्यात आहे. केवळ सफल होण्यापेक्षा समाधानी होण्यात ते आहेच.  
विवाह केवळ बंधन नव्हे तर आपले विचार, परंपरा जपणे, त्यासाठी स्वप्नांना बळ देण्यासाठी पुत्रप्राप्ती
आयुष्य हा क्षणाक्षणांचा उत्सव आहे फक्त तो मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि लहानग्यांसोबत धमाल मस्ती करता करता

साजरा करता यायला हवा.
आयुष्यात फक्त करार नाही, केवळ समाजबंधन म्हणुन नाही तर येणा-या सुख-दु:खात दोघांच्या 'सहयोगा'तुन धैयाने जीवन जगणे
वधुसमावेत तांदळाच्या सात राशींवर पाऊल ठेवताना तिच्या माझ्यासंबंधी अपेक्षा तसेच माझी तिच्याविषयी  असलेल्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव म्हणजेच सप्तपदी..’’

आम्हां दोघांनाही त्या फोटोचा उलगडा गुरुजींनी सांगितल्यावर झाला.. तेव्हा त्या गोष्टीची जाणीव झाली. कर्तव्याचं भान ठेवायला भाग पडणारे आशीर्वादाचे ते हात आजही प्रेरणा देणारेच आहेत

सर्वाना सन्मानाने,थोड्याश्या आग्रहाने
वाढता यावे म्हणून जेवताना व्हावी संगत.
म्हणून जेवणासाठी आमच्या दोघांच्याही आग्रहाने ठेवली होती पंगत..  

बाबांचे डोळेही पाणावले होते. तिच्याशी नेहमी भांडणारा तिचा भाऊही आज रडत होता. मग तिला जप असं मला बाबा म्हणाले.. आणि जड अंत:करणाने सगळ्यांचा निरोप घेऊन भावी आयुष्याची सुरवात करण्यासाठी आम्ही घरी जावयास निघालो.
वाद्यांच्या आवाजात आम्ही हळुहळु घरी पोहोचलो देखील..

तशा आठवणी म्हणा छायाचित्रांच्या माध्यमातून कायमच्या मनावर कोरल्या जातातच..

क्रमश:








हे भलते अवघड असते.. 
(भाग ६) 



 

Wednesday, 1 March 2017

हे भलते अवघड असते..



मी तिला दुस-या दिवशीच भेटून म्हणालो,

“माऊ, तुझं उत्तर मिळालं.. हे बघ”..


‘’दृष्टीतून आश्वासन ,
स्पर्शातुन मायेची ऊब,
चुकांतून समजण्याची वृत्ती,
शरण नव्हे तर समर्पणाचा भाव संपला ना..
तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत नाहीत.
म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला कि 'जगण्याचा' त्रास होत नाही.
संबंध जपताना प्रेमाचंच खतपाणी घालायला हवं;
कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात.’’

ती हसली आणि म्हणाली, “हुशार आहेस.”

एकदा मी माझ्या प्रमोशनची पार्टी दिली. त्यात सर्वांसोबत मी तिलाही बोलावलं होतं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात ‘साथीदार’ म्हणून तिला मी पहात होतो. जेवुन झाल्यावर सर्व निघेपर्यंत मीच डोळयांनी तिला म्हंटल, ‘थांब एकत्रच जाऊ.’

मग आम्ही निघालो. ती म्हणाली, “तुझा walkman सुरु आहे का रे ?”  मी म्हटलं, “नाही.”

ती म्हणाली, “गाणी ऐकायची आज इच्छा होती.”  मग मीच म्हटलं, “एवढंच ना ? त्यात काय ? आपण भेंड्या खेळू की.”

ती म्हणाली,”चालेल..”  मग मीच तिच्या मनाचा अंदाज घ्यायचा ठरवला.. आणि तिच्याच आवडत गाणं म्हणालो :
“कोई उल्फ़त की नज़र ज़रा फेर दे, ले ले दो चार आने जिगर मेरा फेर दे.”
लगेच ती म्हणाली, “ऐसे नहीं चोरी, खुलेगी तकरार से, चलो चलो थाने बताएं जमादार से..”
पुन्हा मी: “जाने कहाँ मेरा जिगर गया जी,अभी अभी यहीं था किधर गया जी ?”
ती : “किसी की अदाओं पे मर गया जी,बड़ी-बड़ी अँखियों से डर गया जी.”
खूप हसत हसतच आम्ही म्हणत होतो.. सगळे आमच्याकडे पाहून हसत होते. पण आम्हाला त्याची पर्वा नव्हतीच.



मग मी पुन्हा म्हणालो : “अगर मैं कहूँ, तुमको जब देखूं लगती हो जैसे नयी, होंठ हैं पंखड़ी फूल की,
आँखें जैसे जुगनू चमकते हुए, सोचे मेरा ये दिल धड़कते हुए,
अगर मैं कहूँ, ये जो चेहरा है,जैसे कोई चाँद है, तो क्या कहोगी..!  

ती : मैं तुमसे कहूँगी, मुझको भूले से भी चाँद तुम ना कहो,चाँद में तो काई दाग हैं,
मुझे फूल ना कहना, वो मुरझाते हैं, जुगनू भी ना कहना, वो खो जाते हैं..!


थोडसं वेगळं म्हणून माझ्या आवडीचं गाणं म्हणालो :
“ऐ रात इस वक्त आँचल में तेरे जितने भी हैं ये सितारें,
            जो दे दे तू मुझको, तो फिर मैं लूटा दू,किसी की नज़र पे ये सारे,
कहो के ये रंगीन सपनें, सजा के मिटा तो ना दोगे,
अगर हम ये पूछें के दिल में, बसा के भूला तो ना दोगे..”

तर ती मुद्दाम म्हणाली: “प्यार में सोचिए तो बस गम है,प्यार में जो सितम भी हो कम है,
प्यार में सर झुकाना पड़ता है,दर्द में मुस्कुराना पड़ता है,
ज़हर क्यों ज़िंदगी में भरते  है, जाने क्यों लोग प्यार करते हैं ?
जाने क्यों वो किसी पे मरते हैं ? जाने क्यों..?

मग मात्र मला तिचा जरा राग आला होता.. पण आनंदाचा दिवस आणि तिही सोबत म्हणून म्हणालो, “उशीर होईल तुला घरी जायला; निघुयात आपण.” तर नेहमीप्रमाणे हसुन “हो” म्हणाली.

पुढच्याच महिन्यात तिचा वाढदिवस होता. पावसाळ्याचेच दिवस होते म्हणा. तिची इच्छा होती की, पूर्ण दिवस मीच तिच्यासोबत घालवावा. उत्तर अजून तिने दिलं नसलं तरी तिच्यासोबत, तिचा वाढदिवस साजरा करावा, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी ‘होकार’ दिला. अखेर वाढदिवसाचा दिवस आलाच.. मला black कलर आवडतो, म्हणून तिने black ड्रेस घातला होता आणि तिला निळा रंग आवडतो, म्हणून निळ्या रंगाचा शर्ट. फारच आनंदी दिसत होती ती.


तिनेच खुप तयारी  करून ठेवली होती. काय करायचं, कुठे जायच.. संध्याकाळी sunset पहायला आम्ही पोहोचलो. आणि तिच्यासाठी मी स्वतः पहिल्यांदाच बनवलेली एक कविता तिला ऐकवली.
होती ‘गप्पा’ष्टकें जरी तरी नेमके ‘ते’ राहते
करुनी ‘भाषांतरे’ मौनाची मज ‘लिहावे’ वाटते

वाहतो वदनातूनी तुझ्या ‘ओढा’ शुभ्र धारेसारखा
ठेविशी ते शब्द जपूनी हात ‘आखडता’ जसा
पाहता ‘रिमझीम’ शब्दांची तुझ्या मौज भारी वाटते
‘थाप द्यावी’ ठेऊनी कुठे सारखे मज वाटते

देव’वेडे’ करती बोल्या ठेऊनी ‘पेढे’ पुढे
मी असा की भक्त ज्या हे ‘वाटती’ ‘आढे-वेढे’
‘बोली’ ठेवावी पुढे, ना मनी कधी दाटते
‘भरली’ श्रद्धेने पुरी इच्छा ‘पुरेशी’ वाटते    

उजळले आहे कसे बघ ‘इंद्रधनू’ क्षितिजावरी
‘उजळूनी’ यावे तसे सारे क्षणी ‘पैलातूनी’
व्यूह शब्दांचे नको तू ‘गावे तराणे’ वाटते
उघडूनी तू ‘सांग राधे’ काय तुजला वाटते..

तीर ‘पक्का’निशाने पर लगा था.. ती बोलत होती.. आणि माझ्या मनात तिचे शब्द कोरले जात होते..

“माझ्यासाठी माझं घर शोधत येणारा..
माझ्या प्रश्नांना अचूक उत्तर देणारा..
माझी आवड जपणारा आणि त्यास मनसोक्त दादही देणारा..
माझ्यासोबत माझ्या घरच्यांनाही मान देणारा.. त्यांची आवड-निवड जपणारा..
अनोळखी शहरात मला आधार देणारा..  मुंबईदर्शन त्याच्या नजरेनं दाखवणारा..
मला कधीच एकटं न पडू देणारा..  माझी नेहमी काळजी घेणारा..
खरंच Sorry.. मी थोडासा उशीर केला आहे सांगायला.. पण मलाच नेमकं समजत नव्हतं मनाला ठाम असं वाटलं मगच मी तुला सांगण्याचा निर्णय घेतला.. मी खुप खुश आहे आज आणि हो.. मला ह्यापेक्षा अधिक सुंदर जोडीदार मिळणं अशक्य आहे..
हो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
माझ्यासाठी तो ‘खूपच’ आनंदाचा क्षण होता. किती दिवसांपासुन मला ‘जे’ हवं होतं ‘ते’ मला आज ‘मिळालं’ होतं..
मग काही दिवसांनी आम्ही दोघांनीही घरी सांगितलं, तिच्या घरी विरोध झालाच नाही. माझ्याघरी तिला बोलावलं होतं. तिला बाबांनी सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. ती तरीही ‘हो’च म्हणाली. मग बाबाच म्हणाले, “जरा डोळे उघडून बघा इतरांकडे; मग कळेल आपलं आयुष्य केवढं सोपं आहे. तुम्हाला जाणीव असायला हवी, लोकांना किती त्रास असतो. लग्न, घरच्यांचा विरोध, आर्थिक , घराचा प्रश्न... तुमच्या आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम नसताना create होण्याची वाट नका पाहू. लवकर लग्न करण्याचा निर्णय घ्या.”

पुढे काही दिवसांत जास्त गाजावाजा न करता दोन-चार मान्यवरांच्या उपस्थितीतच ‘साखरपुडा’ समारंभ ‘संपन्न’ झाला..  आता कुठलेच ‘प्रश्न’ नव्हते कुठलीच ‘कोडी’ नव्हती..
होतं फक्त ‘ती,मी आणि प्रेम’..!!  

क्रमश:




                                                 हे भलते अवघड असते.. 
                                                        (भाग ५)