Thursday, 22 June 2017

गर्दी.. !!


आपलं असंच असतं नेहमी.. काही मिळविण्यासाठी काय काय सोडावं लागतं, याचा विचार करावा लागतो. हिशोब केला तर जमवण्यातून मिळतो तोअनुभव’. लाखोंच्या संख्येत असूनही मधमाश्या  कधी भांडण करीत  नाहीत. त्याही जमवतातच ना अनुभवरूपी मध.

गर्दी.. !!

गर्दीला चेहरा नसतो तरी प्रत्येकजण येथे मुखवटा घेऊन वावरतात .स्वतःच वेगळेपण जपून गर्दीत मिसळणारेच खरे हुशार असतात. शांतता सगळ्यानांच हवीय. आम्ही कधी चुकतच नाही म्हणत  खरीअशांती’ हेच माजवतात. प्रत्येक गोष्टीची मापं काढायला नकोत. सहज अनुभवायच्या असतात काही गोष्टीगंमत’ म्हणून..

कुठे जायचंय ? किती दिवस ? Routine Life मध्ये स्वतःकडे पाहायला तरी वेळ मिळतो का ? -याचदा होतं असं; प्रत्येकाची  मनं वेगळी, विचार वेगळे. सोबत असूनही मन भलतीकडेच असतंस्वप्नांची रांग लागली की मग झोपेचं 'खोबरं' होतंखरंय ना ? नकोसं किती साठवून ठेवतो नकळत  आपण ? स्वप्नं पडतात तेव्हा तो 'कचरा' नकोसा होतो. कित्येक विचार येतात मनात, कधी अस्वस्थ,भयानक,आनंदी वगैरे ही भली मोठी रांग लागते!! 'विचारांची गर्दी' मोठा प्रवास असला तरी जगण्याला खतपाणी घालण्याचं काम इथूनच होत असतं.
रेल्वेने प्रवास कोण नाही करत ? ‘लोकलच्या गर्दी’विषयी मुंबईकरांपेक्षा जास्त कोण सांगू शकेल?  एक दिवस तिकिटाला भली मोठी रांग.. म्हणून एका फॅमिलीने त्यांच्या मुलाला कुपन्स आणायला सांगितले. तो मुलगा धावत गेला आणि लगेच तिकीट घेऊन येत होता. तेवढ्यात रांगेतला एक माणुस त्याला ओरडला, अरे बारक्या ! हे तुझं बरंय, आम्ही काय xxx आहोत? रांगेत उभं राहून तिकीट घ्यायला ? छोटा उत्तरला :  आहातच!  बघा जरा, मी तिकीट  नाही, कुपन्स घेतलेत त्यासाठी रांग नाही लावली तरी चालते. काहीही विचार न करता व्यक्त होणारी एखादी तरी व्यक्ती आपल्यात असतेच.

सिनेमांतील गर्दी पहिली की इथला चंदेरी चेहरा खूपच आकर्षक आहे,प्रत्येकाला तो नायक बनण्याची इच्छा असतेच.. लोकनायक बनण्याची,मेहनत करण्याची तयारी करणारे तसे दुर्मिळच..

‘काळोखातल्या गर्दी’च एक वेगळंच रूप पहायला मिळतं. चूकत नाही असं जगात कुणीच नाही. पण चुकांची पुनरावृत्ती करून निर्ढावलेले येथे सर्रास वावरतात. माणसं वाईट नसतात, पण अंधारात ती प्राण्यांपेक्षा भयंकर होतात.





'सोशल मीडिया वरची गर्दी' अस्वस्थ मनाला झोप येते तरी कुठे ? जगभराकडे पाहताना स्वतःकडे वेळ द्यायला, (सॉरी!) बघायला तरी निवांत वेळ काढतो का आपण ? कुणाचं काय तर कुणाचं काय ? आरोग्य, अध्यात्म, देशसेवा, सिनेमा, भाषा यापलीकडे जाऊन समजत असो वा नसो, आपला विषय असो वा नसो, खरं की खोटं.. याहीपेक्षा व्यक्त होण्याची घाई. इतकं ‘शहाणपण’ येतं तरी कुठून(!)? उत्तरं प्रत्येक प्रश्नांची असतात, पण आपण ती शोधतच नाही आणि पळवाट म्हणून 'Log Out' चा पर्याय स्वीकारतो. 

मागे एकदा गावच्या ठिकाणी पैसे संपल्याने ATM शोधत असताना एका मुलाला ATM मिळतच नव्हते. अचानक एक Bike वाला येतो अन् २ किमीं अंतरावर असलेल्या ATM मध्ये घेऊनही जातो आणि परत आणून देखील सोडतो.
तहान लागलेली असताना अचानक पाण्याची सोय होते, तसंच संकटात कुणीतरी मदत करणारं आपल्याल्या मिळतंच, फक्त ‘विश्वास’ हवा.

एकदा प्रवासातुन उतरत असताना  'मुख दर्शन व्हावे आता' ही ओळ गुणगुणत असताना आणि आणि समोरून 'ती'ने चेह-यावरील स्कार्फ त्याच क्षणी काढत मनापासुन हसावं. अनोळखी लोकांच्या गर्दीत आपलं असं म्हणून ‘जगण्याचं’ कारण मिळावं तेव्हा सुखावह वाटते ही गर्दी..
‘सुखसाधनांची गर्दी’ जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो ? रस्त्याचं काम सुरु असताना त्यातील एका स्त्रीचं मूल, झाडाला साडीचा पाळणा करून त्यात निवांत झोपलेलं पाहिलं की.. साधनांमध्ये सुख की समाधानामध्ये सुख ? हा प्रश्न सतावतोच.

पैसे नसताना भीक मागणाऱ्या माणसांची गर्दी आपल्याला दिसून येते. पण सत्तेसाठी मत मागून लुबाडणा-या, भावनांचं राजकारण करणा-या, काहीही न करता मदत मागणा-या, मुबलक असूनही  income Tax वाचवणा-या, मंदिरात फक्त मागण्यासाठीच जाणा-या -या भिका-यांच्या गर्दीकडे’ पाहिलं की मूल्यशिक्षणाचा पाठ मिळतो.

रस्त्यावरची गर्दी.. अन्याय पाहणारी गर्दी,अन्याय सहन करणारी गर्दी,अन्याय करणारी गर्दी, अनोळखी शहरात गेल्यावर वाटणारी, स्फोटातून होण्या-या नुकसानाची किचिंतही कल्पना नसलेली, हातावरच पोट चालणाऱ्या मनातील भीतीयुक्त गर्दी… अजून बरंच अंतर चालायचं आहे गर्दीचं ‘संगठन’ व्हायला. गणेशोत्सव, दहीहंडी, २६जुलै अशा कित्येक प्रसंगात दिसून येते ही गर्दी, गर्दीतील ही चित्र आश्वासक आहेत; अर्थात मूळ हेतू सुधारूनच..

प्रत्येकाचं असतं आपापलं आभाळं त्यात असते कित्येक माणसांची गर्दी.. आभाळाला सुद्धा विविध रंग दिलेत आम्ही, धर्मवादाला हिरवा रंग, जातीवादाला निळा रंग, भक्तीला भगवा रंग. पैसा,पद,प्रतिष्ठा यातच अडकलं तर स्वतःची खरी ओळख पटावी तरी कशी ? ‘माणुसकीच्या डोळ्यांनी’ पाहिलं की अगदी जसं असतं तसंच दिसतं निरभ्र आकाश..गर्दीत मिसळुन जाणारे बरेंच असतात. 'भूतकाळा'त न रमता पण 'वर्तमाना'त आपलं बोट धरून सोबत घेऊन गर्दीला आपलंस करत उज्ज्वल 'भविष्या'कडे घेऊन जाणारेच आभाळाच्या गर्दीत त्या ध्रुव ताऱ्यासारखे ठळक दिसतात.

Thursday, 1 June 2017

Time-प्लीज..

आता तिलाही ह्या सगळ्याचा उबग आला होता. घराला कंटाळून घराबाहेर राहणा-यातली ती नव्हती. जॉबमुळे तिला हे सारं जमत नव्हतं. जेवणाच्या अनियमित वेळा, कमी झोप . चा तिच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम होऊ लागला होता. पूर्वी घडणा-या, आनंद देणा-या गोष्टी आता होतं नाहीत हा बदल जाणवायला लागला होता
  
अशीच शुक्रवारची संध्याकाळ होती. त्यादिवशी काहीच काम नसल्याने आम्ही मैत्रिणी गप्पा मारत ऑफिस मध्ये बसलो होतो. अनघा.. माझी ऑफिस मधली मैत्रीण, दिसायला सुंदर, सुयोग तिचा लहान मुलगा. लग्नानंतर दोनच वर्षात तिचा नवरा अपघातात वारला तरीही सगळ्यांचं नेहमी हसतमुख चेह-याने स्वागत करणारी ती. त्यादिवशी सुयोगही ऑफिसला आला होता. मी विचारलं काय रे काय चाललंय ? तो म्हणाला मावशी Exam सुरु आहे. मी म्हंटलं, Exam नंतर काय करणार मग ? तर म्हणाला, Exam मुळे खेळता नाही येत, त्यामुळे Exam झाली की मनसोक्त खेळणार. त्याच्या उत्तरापेक्षा त्याच्या गोड बोबड्या आवाजानेच मला जास्त हसू आलं. मग तो म्हणाला, मावशी तूही ये ना काकासोबत सुट्टीत आमच्याबरोबर खेळायला ? तसंही आमच्याकडे कुणीच येत नाही.

दिप्ती येणा-या प्रत्येक सुट्टीचे फिरण्याचे त्यांचे फॅमिली प्लान्स मला सांगत होती.

शर्वरी ती तिच्या आजी-आजोबांकडे वीकेण्डला जाऊन कसे नवनवीन पदार्थ शिकून येते हे सांगत होती.

जॉबमुळे वेळ मिळत नाही हे मला ठाऊक होतं; पण ब-याच वर्षात ऑफिस सुटल्यावरही वीकेण्डला मी मनमोकळेपणाने कुठे फिरायला गेल्याचं, भूषणशी गप्पा मारल्याचं मला आठवत नव्हतं !! आज सर्वांशी बोलताना मला जाणवलं की इतरांकडे इच्छा आहे, पण सोबत नाही. माझ्याकडे कुणालाही भेटणार नाही इतकी छान ‘सोबत’ही आहे,साथीदार’ही आहे, पण ‘इच्छा’ माझीच नाही. किती महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे माझं. “शहाणपण नेहमी उशिरानेच यावं हिचं नियती असते का..?”  हा विचार करतच मी घरी पोहोचले. मला स्वत:च्याच लक्षात नव्हतं की माझा वाढदिवस आहे ते..

माझ्या आवडीचं जेवण, केक, आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना त्यांच्या कुटुंबियांसोबत भूषणने आमंत्रित केलं होतं, ‘तेही’ मला न सांगता. वाढदिवस दरवर्षीच येतो पण आज माझ्या चेह-यावर मात्र हसू होतं आणि भूषणचं खूप सारं कौतुक. सगळे निघून गेले.

झोपण्यापूर्वी तिला B’day गिफ्ट घेऊन मी गेलो. पाहिलं तर ती उशी मांडीवर घेऊन भिंतीला टेकून बसली होती. पाणावलेले डोळे उघडे होते. मात्र कसल्याशा विचारात ती गढून गेली होती. आज सर्वांसमोरही तिचं वागणं थोडं वेगळं आहे, असं मला जाणवलं. काहीतरी ‘तिचंच’ सुरु आहे असं मला समजलं.

माझं कुठेच लक्ष नव्हतं, वाढदिवस झाला तशी मी माझ्या रूममध्ये जाऊन बसले..

सारं वैभव माझ्यापाशी होतं; पण समाधान नव्हतं. मला अचानक सारं आठवलं..

भूषणशी झालेली पहिली भेट,
बसने प्रवास करताना एकमेकांना लागलेले धक्के,
सप्तपदी घेताना त्याला माझं आवडलेलं लाजणं,
एकदा लस्सी पिताना माझा चेहरा पुसतानाचा त्याच्या चेह-यावरील भाव,
चालत बोलत असताना कटाक्षाने मन लावून पायातील पैंजणांचा आवाज ऐकणारा तो,
मी कधीच रडू नये म्हणून नेहमी हसवणारा माझा जोकर,
सोबत होतं मला वेळ न देता आल्याचं शल्य..
अगदी लग्नानंतरही मला दोष न देता स्वत:च सहन करणारा माझा प्रिय सखा..
खूप कारणं होती जवळ जाण्याची.. पण मीच का दूर राहिले ?   

इतक्यात तिची नजर माझ्याकडे गेली. दाटलेलं आभाळं, सुचलेले शब्द, भावनांची गर्दी..सारं काही अगणित ! नवनवीन कल्पनांना ओढ पावसाचीच होती. तिने माझा हात हातात घेतला आणि तिच्याजवळ बसवलं. फार काही अपेक्षा नव्हत्याच, व्याकुळ नजरेने माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. जणू काहीसं स्वत:चच प्रतिबिंब उमटलं होतं तिच्या चेह-यात.

'मनात' स्मृतींची कोलाहल होत असते, 'विचारांत' सतत वादळे निर्माण होत असतात आणि त्यामुळेच 'डोळ्यांत' पाऊस निर्माण होत असतो. ती माझ्या मिठीत ओक्साबोक्शी रडत होती. सरसरणा-या वा-यांतून, गडगडणा-या ढगांतून आयुष्यात 'नव'निर्मितीच होत असते. तिचं ते रूप डोळ्यांसमोर समोर होतं. बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. सा-या दुःस्वप्नांना निरोप देऊन, सूर्य आजही उगवत होता.
आयुष्यात चढ-उतार असतातच पण त्यातही सुखाच्या आशा पल्लवित करणारा हा पाऊस मला दिलासादायक वाटला.

बदललं काहीच नव्हतं, तरीही आदर्श न मानता 'आदर' करायला, तोडण्यापेक्षा 'जपायला', नेहमीच बोलण्यापेक्षा 'ऐकायला', समजावण्यापेक्षा 'समजायला' आम्ही लागलो होतो.

समाप्त








Time-प्लीज

(भाग ३)





Wednesday, 31 May 2017

Time-प्लीज..


 Time-प्लीज

 (भाग २) 





कधी कधी खरंच  विचार केला ना की प्रश्न पडतो,स्वतःच्या मनानुसार खरंच जगायला मिळतं का ?
एकत्र आल्यावर जबाबदा-या नव्यानं कळतात का ? आपल्यात असलेल्या क्षमतेची ओळख पुन्हा नव्याने कळते का ? पुस्तकांत वर्णिलेलं आयुष्य -या आयुष्यात नसतंच.. -या आयुष्यात जगताना येणारे अनुभवच खरे असतात.
 
कधी सोबत म्हणून, तर कधी गरज म्हणून, तर कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून सोबत हवी असते. त्यातच मजा अनुभवायची असते,स्वतः च सुख शोधण्याचा प्रवास असतो तो.. आयुष्यावर पुन्हा एकदा नव्यानं प्रेम करण्यासाठीचा प्रवास.. अशा वेळीसोबत’ असली की नात्यांचे दोर आणखीनचघट्ट’ होतात.

वैदेहीला सोबत माझीही आवडत होतीच, पण तिला वेळ नव्हताच. लग्नाआधी Good Morning चे नियमित Message करणारी ती.. आता साधं तिचं माझ्याकडे बघुन हसणं देखील दुर्मिळ झालं होतं.  

अभ्यासात, तिच्या कामात ती हुशार होतीच. यश तिला मिळतंच होतं;  पण घर सांभाळण्यात तिचा थोडा हातभारही मला गरजेचा वाटला  होता. तिनं अगदीच काही नाही, निदान  माझं कौतुक करावं इतकीच माझी माफक अपेक्षा होती. तिला नेमकं काय करायचं होतंआपल्याला जे आवडतं ते करावं की स्पर्धेच्या युगात आवडीला मुरड घालून जे भेटेल ते मिळवत यश मिळवावं हे निवडणं कठीण झालं होतं. विचारांना प्रवाही नाही केलं तर त्याचं  डबकं साचतं. अगदीच काही आमची जोडी इतकी परस्परविरोधी नव्हती की मी अडाणी, दारू पिऊन मारझोड करणारा वगैरे.. मला इतकंच वाटत होतं की तिने जे तिला आवडतं ते करावं आणि गतिशील व्हावं.

लग्नाआधी मला नुकताच जॉब मिळाला होता. प्रोबेशन मध्ये असताना मित्र म्हणायचे अरे सुट्टी काही मिळणार नाही. तरीही आम्ही भेटायचो. ती सुद्धा लांब ऑफिस ला होती तेव्हा वेळ काढून यायची.. किती आनंदाचे क्षण होते ते.. आता साधं सोबत जेवायला सुद्धा वेळ नसतो तिला.. ती येते तेव्हा मी झोपलेला असतो अन् मी जातो तेव्हा ती झोपलेली

स्त्री संवेदनशील असते आणि पुरुष निर्णयक्षम ! पण नेमकं संवेदनशीलतेचाही इथे उपयोग नव्हता आणि माझ्या कुठल्याही घेतलेल्या  निर्णयाचासुद्धा.. संबंधांना संशयात बघायचं सामर्थ्य नेमकं येतं तरी कुठून ? प्रश्न खरे येथेच निर्माण होतात.

तिला मला एवढीच जाणीव करून द्यायची होती की ,मान्य आहे प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी,आवड वेगळी,अपेक्षा वेगळी आणि व्यक्त होण्याचे मार्ग देखील वेगळे, पण एक तरी गोष्ट असेलच ना ?  

जी तुला माझ्यात आणि मला तुझ्यात गुंतवून ठेवत असेल..?”

“बराच वेळ गेलाय पण मी चुकलीय हे त्याला कसं सांगू ? तो तर मला नेहमीच सांभाळून घेत आलाय मग मी व्यक्त कसं होऊ ? लग्नाला दहा वर्ष झाली, करिअरपायी मी मूल नको असं त्याला म्हंटलं आता वाटतंय की बरं झालं असतं मूल असतं तर त्याच्याजवळ जाऊन निदान मनमोकळेपणाने मनसोक्त रडता तरी आलं असतं.”

पैसा ,सौंदर्य इ. ने नाही तर प्रेम ‘विश्वासानेच’ निर्माण होतं, हे पुन्हा नव्याने अनुभवायचं होतं. मासा पाण्यात पोहतो, त्याला पोहण्याचे क्लास नाही लावावे लागत; सुगरण कुठेही डिग्री घेत नाही, तरी उत्कृष्ट घर बांधते; कोकिळा कुठेही गाण्याच्या क्लासला नाही जात, तरी उत्तम गाते. अगदी तसंच जबरदस्ती नाही, शिकवूनही नाही, तर आतूनच यावं लागतं तरच ते टिकतं ‘असं’ प्रेम मला पुन्हा हवं होतं; तेही वैदेहीकडूनच!!

मनावर वेळ न देण्याची 'धूळ' साचली होती इतकंच..!

अगदीच पाण्याचे सर्व  थेंब गळून ओंजळ रिकामी व्हावी, इतकं शुष्क  नातं झालं नव्हतंच. तिलाही ते जाणवत होतं आणि मलाही की एकमेकांशिवाय आमचं जीवन अपूर्णच आहे. साचलेली धूळ तिने अलगद बाजूला सारून माझ्या पुन्हा  जवळ यावं यासाठी तिला एवढंच सांगायचं होतं की.. 

''स्वतःच्या Limitations आणि स्वतः साठीच्या Limitations समजल्या की आपण सहज म्हणू शकतो.. Don’t Worry ! Be Happy..!!


क्रमश:

Tuesday, 30 May 2017

Time-प्लीज..


आहाहा.. काय ते लोभसवाणं रूपं होतं तिचं !! जणु पाऊस येताच मयूरपक्ष्यानं नृत्य करावं असं.. बाह्यशृंगार,सजावट नव्हतीच..पण प्रात:काळी तिला पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत जाणवलं - 'विलक्षण कारुण्य.'
'' एक तेरे अदा कि, रौदाद हो गए है हम, मस्ती में एक हसीं को, खुदा कह गए  है हम ''
कुठेतरी ऐकलेली शायरी जणु तिच्यासाठीच बनली असावी असंच मला वाटलं
मी काहीच बोलता फक्त बघुन हसलो.

भेटीगाठी तर नियमित होत होत्याच पण आज नेमकं कुठून बोलणं सुरु करावं हेच समजत नव्हतंमग शेवटी मीच काहीतरी विचारायचं म्हणून म्हंटलं,कसं चाललंय जॉबचं ? कधी वर, कधी खाली कधी मोबाईलमध्ये डोकं खुपसत, कधी ओढणीशी खेळत.. असं कितीही गुंतलेलं असलं तरी तिची नजर माझ्याकडेच स्थिरावली होती. एकमेकांना सारं काही ठाऊक होतं आणि जाणवलं ही होतं. फारसा विलंब करता फक्त स्वीकारायचं होतं.. कधीही 'अस्वीकार' करण्याचं बंधन..

आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. मला कंपनीने मॅनेजिंग डिरेक्टर म्हणुन बढती दिली होती, त्याची पार्टी होती. समाजातील प्रतिष्ठीत  व्यक्ती,मित्रमंडळी, नातेवाईक सर्व हजर होते. आमच्या 'सौ'नादेखील  रीतसर आमंत्रण होते आणि मी सुद्धा दहावेळा फोन केला होता, “आज तुला यायचं आहे हा..”.

ती आलीच नाही , फोनही लागत नव्हता. मी मनाची समजूत घातली, ती कामात असेल म्हणून जमलं नसेल कदाचित. सगळ्यांना ती आजारी आहे असं सांगून वेळ मारून नेली खरी ; पण मला तिचा प्रचंड राग आला होता. कारणहे असं’ करण्याची तिची पहिलीच वेळ नव्हती. खूपदा असं झालं होतं आणि कळस म्हणजे  नुकत्याच झालेल्या आमच्या लग्नाच्या 'दहाव्या' वाढदिवसाला  देखील तिने असंच केलं होतं.

सर्व आटोपून  मी घरी तिच्यासाठी जेवण घेऊन गेलो. आणि बघतो तर काय,ही खुशाल झोपली होती. वाटलं गदागदा हलवून तिला उठवावं आणि जाब विचारावा की निदान मला अभिनंदन तरी करायला यावं असं वाटलं नाही का तुला ? तिने माझ्यासाठी चिट्ठी लिहिली होती.. 'सॉरी डिअर, मला यायला उशीर झाला. मी दमली होती म्हणून नाही आले तुझं खूप खूप अभिनंदन.. Good  Night.. ‘

एकदा येण्याची चूक मलाही मान्य झाली असती.पण चिठ्ठीचा हा उपायनेहमीचाच’ असल्याने मला त्याचं फारसं काहीच वाटलं नाही. मी हा असाच.. नातेवाईक मला बायकोच्या आधीन गेलेला प्राणीदेखील म्हणतात.

मी भूषण ! BE झालेला मध्यमवर्गीय कुटुंबातला, घरात दोघे भावंडं आणि आईबाबांसोबत राहणारा, एका MNC  मध्ये काम करणारा, मला फारसं भांडता येत नाही हाच मुद्धा माझ्या आईलासुद्धा पटणारा..

वैदेही! माझी पत्नी, Bsc.IT झालेली, कुटुंबातील  एकुलती एक , सतत काहीतरी नवीन करायची आवड असलेली, जिद्दी, महत्वाकांक्षी ,कामातच मन रंगवणारी एक स्वछंदी मुलगी..  आमचं लग्न आधीअरेंज’ झालं मग आम्ही एकमेकांच्याप्रेमात’ पडलो.

ती झोपली होती; बाजूला मी शांत उभा होतो. आज अशी वेळ आली होती की एकत्र राहत  असलो तरी एकाच घरात दोन अनोळखी राहत असल्याची जाणीव मला झाली.

वैदेही.. तिचं स्वतःच असं वेगळं विश्व जरी असलं तरी त्यात मीदेखील होतो.. तिला वेळ देणं फारसं जमत नव्हतं. त्या दिवशीच्या प्रसंगांनंतर एकदा तिचाच मॅसेज आला.. आज वेळ आहे का तुला ? मरीन ड्राईव्ह ला भेटूयात का ? मी काहीही विचार करता हो म्हणालो. आज ती वेळेआधी आली होती, मग इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. ती काहीच बोलत नव्हती.. मी विचारलं काही हवंय का ? काही सांगायचं आहे का ?

ती एवढंच म्हणाली.. ''माझं मुकेपण  जर तुला समजलं नसेल तर माझे शब्दही तुला कळणार नाहीत..!!''

मला आठवलं..
 ''जब तुलू आफताब होता है, गम के सागर उछाल देता हूँ,
 ताझकीरा जब वफा का होता है, मैं तुम्हारी मिसाल देता हूँ ''


क्रमश:







Time-प्लीज

 (भाग १)