Thursday, 29 December 2016

..देणे 'मंगेशा'चे !!

जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी मराठी नवी ऊर्मी, ऊर्जा देणारे आणि अनेक अजरामर कवितांनी रसिकांच्या तीन पिढ्यांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कविवर्य मंगेश केशव पाडगावकर..

भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंद वारा, सावर रे, सावर रे, श्रावणात घननिळा बसरला, असा बेभान हा वारा, निज माझ्या नंदलाला, तुझे गीत गाण्यासाठी, माझे जीवनगाणे, शब्दावाचून कळले सारे, फूल होऊनी गेले, जेव्हा तुझ्या बटांना, अशा एकाहून एक सरस भावगीतांनी रसिकांना भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवले. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं..ही त्यांची विशेष गाजलेली कविता

पाडगावकर यांची काव्यसंपदा

धारानृत्य,जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक, वात्रटीका, सलाम, गझल, भटके पक्षी, बोलगाणी, शर्मिष्ठा, उत्सव, भोलानाथ, मीरा (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद), तुझे गीत गाण्यासाठी, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, वेडं कोकरू, उदासबोध, त्रिवेणी, कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद), मोरू, सूरदास, कविता माणसाच्या माणसासाठी, राधा, आनंदऋतू, सूर आनंदघन, मुखवटे, काव्यदर्शन, तृणपर्णे, गिरकी

कण्हत कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकवणारे पाडगावकर आजोबा आजही तितकेच 'चिरतरुण' आहेत..
३० डिसेंबर २०१६
(चित्र सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स)





          'इतकं दिलतं तुम्ही मला, खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला...'


Thursday, 17 November 2016

World Philosophy Day 2016



न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।


संस्कृती,धर्म,तत्वज्ञान,अध्यात्म ही मानवाच्या विकासाची परिमाणं आहेत.
अज्ञानाच्या अंधकारातून पुढे जाण्यासाठी विचारांची मांडणी करून मानवाला सुजाण,सुसंस्कृत,प्रगल्भ जीवन बनवण्यासाठी तत्वज्ञानाचा 'दिपस्तंभ' नेहमीच मार्गदर्शक ठरत आहे.तत्त्वज्ञानाच्या आजच्या व्याप्तीमध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो. तत्त्वज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान.

the study of the fundamental nature of knowledge,reality and existence, especially when considered as an academic discipline is called as Philosophy ( philosophia - Love of Wisdom )




भारतीय तत्वज्ञान

भारतीय तत्वज्ञान हा एक मोठा असा ज्ञानसागर आहे भारतीय साहित्य हे अनेक ज्ञानशाखा,कला,विद्या यांची खाण आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेखनीय असे आपले वैदीक साहित्य येते ज्यात जगातील सर्व ज्ञानशाखा तर सापडतातच पण ह्या जगाची उत्पत्ती, ईश्वराविषयीचे तत्वज्ञान, व ह्या जगात जगण्याविषय़ीचे व्यावहारिक ज्ञानही मोठ्या प्रमाणात सापडते.
प्राचिन साहित्य हे वेद, ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे, वेदांत, पुर्व व उत्तर मिमांसा, षडदर्शने, त्यानंतर पुराणे, व महाकाव्ये महाभारत, रामायण इ. हे अंतर्भुत होतात.भारतीय संस्कृतीत एकूण बत्तीस विद्या व चौसष्ट कला प्रमुख आहेत.

आर्य म्हणजेच उत्तम, सर्वश्रेष्ठ असा होय व त्या लोकांची भुमी म्हणजेच आर्यावर्त होय़. प्रथम ऋग, नंतर गायनात असलेले मंत्र म्हणजेच सामवेद व त्यानंतर अथर्व व यजुर्वेद. 
ह्या वेदांच्या निर्मिती नंतर त्या वेदांचे अर्थ व स्पष्टीकरणे आपापल्या मतानुसार मांडण्याची परंपरा निर्माण झाली त्यातुन प्रथम उच्च विद्वान ब्राह्मणांनी रचल्याने 'ब्राह्मणके' अशी संज्ञा प्राप्त झाली. नंतर अरण्यात राहाणार्या ऋषींनी लिहिलेली अरण्यके, यानंतर उपनिषदे म्हणजेच ही प्रश्नोत्तर स्वरुपात आहेत. शिष्य प्रश्न विचारतात गुरु अथवा अध्यात्मिक उन्नत प्रश्नांची उत्तरे देतात अशी ह्या उपनिषदांची रचना आहे. उपनिषदांनंतर पुर्व मिमांसा व उत्तर मिमांसा असे दोन वेदांताचे भाग निर्माण झाले. जे जिवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी देते ते दर्शनशास्त्र..
त्यानंतर तत्वज्ञानाचा उच्चांक गाठणा-या  दर्शनशास्त्रांची निर्मिती झाली.

१) वेदान्तदर्शन    - आद्यशंकराचार्य, व्यास (उत्तरमीमांसा) (ब्रह्मसूत्र)  - ज्ञानमार्गाला प्राधान्य
२) पूर्वमीमांसा    - जैमिनी, प्रभाकर,मंडनमिश्र,कुमारील भट्ट - कर्ममार्गाला प्राधान्य
३) सांख्यदर्शन    - कपिलमुनी - विश्व ही नैसर्गिक प्रक्रिया इ
४) योगदर्शन      - हिरण्यगर्भ (योगसूत्र-पतंजली)
५) न्यायदर्शन     - गौतमऋषी - System ऑफ Logic
६) वैशेषिक दर्शन  - जगत हे परमाणूंनी भरलेले आहे.
७) बौद्धदर्शन       - बौद्ध - ईश्वर न मानणारे, पुनर्जन्म मानणारे 
८) जैनदर्शन        - २४ तीर्थंकर
९) चार्वाकदर्शन     - ईश्वर,वेद,पुनर्जन्म न मानणारे




ह्यानंतर येतात ती अठरा पुराणे,
ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव/वायु, श्रीमद्भागवत, देवीभाद्भवत, नारद, मार्कण्डेय, अग्नेय, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वाराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड, ही अठरा पुराणे ही पुराणे गोष्टीरुप असलेली विश्वकोष आहेत. ज्यात प्रचंड माहितीचा सागर आहे.
त्यातील कथा गौण आहेत त्यांचे 'सारांश' हे मुख्य आहेत.

  •     जंगली लोकांना मानवी जीवनाचे सूत्र समजावणारे मनू
  •  संपुर्ण भारतवर्षात 'वैदिक संस्कृतीचा' निर्घोष करणारे दिग्विजयी श्रीमदआद्यशंकराचार्य
  • Father of Indian Philosophy- याज्ञवल्क्य
  •  Father of Indian Soil- कश्यप
  •     संपुर्ण मानवी समाजाचा आणि मानवाच्या भौतिक आणि अध्यात्मिक जीवनात समन्वय घडवुन आणणारे महर्षी अत्रि
  •     वशिष्ठ,विश्वामित्र,जमदग्नी..
  •    पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे पराशर
  •      जगात असा कोणताच विचार नाही जो ह्यांनी मांडलेला नाही ज्यांच्यामुळे विचारांची महत्ता वाढली असे वाङमयपुरुष म्हणजे व्यास
  •   वेदांतील विचार प्राकृत भाषेत पोहोचवणारे व सामान्य माणसांपर्यंत समजावणारे..   'निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम'
  •   स्वामी दयानंद सरस्वतींनी वैदिक साहित्याचा जीर्णोद्धार केला
  •      संपुर्ण जगाला पुन्हा एकदा भारतीय संस्कृति आणि तत्वज्ञानाची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद
  •     संकुचित संकल्पनांना नाकारणारे, स्वतंत्र विचारांचा नवा मार्ग दाखवणारे J.Krishnamurti.
  •    भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक,विदवान आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
  •  संपुर्ण जगासमोर अवतारवाद मांडणारे, Activist Philosopher, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले
     असे कित्येक आचार्य,महर्षी,संत,तत्वज्ञ यांचे भारतीय विचारधारेत महान योगदान आहे.








 पाश्चात्य तत्वज्ञान





 १) प्राचीन दर्शन - ग्रीक

 २) मध्यकालीन दर्शन - आठव्या शतकात साधारण ह्याची सुरवात झाली
    ह्यात विश्वास आणि बुद्धीने प्रचलित सिद्धांत ह्यांची यथार्थता पाहण्यास सुरवात झाली.
    Renaissance ह्याच  काळात झालं.
    १५व्या शतकात ह्या मध्यकालीन दर्शनाचा काळ समाप्त झाला.

 ३) आधुनिक दर्शन - साधारण ह्याची सुरवात सोळाव्या शतकात झाली
   
     विवेकवाद (Rationalism)  -  Descartes,Spinoza,Leibniz
     अनुभववाद (Empericism) -  Berkeley,Hume,Locke
     प्रत्ययवाद (Idealism)        -  Kant,Hegel,Schopenhauer





          
           पाश्चात्य तत्वज्ञानाची सुरवात तशी ग्रीक तत्ववेत्त्यांपासून मानली जाते.
  •   सृष्टीचे मूळ तत्व Thales ने जल ,Anaximander ने अव्यक्त प्रकृति तर Anaximenes ने वायू आहे असे विचार मांडले.
  • गणितीतज्ञ Pythagoras यांच्या विचारानुसार ह्या सृष्टीत अनुरूपता आणि सामंजस्य आहे व ती संगीतात प्रसिद्ध होते असे विचार मांडले.
  •  त्यांनतर नीतिमत्तेला महत्व देणारा, सत्याचा उपासक,संवादाला लोकशाहीचा आत्मा माणणारा, बुद्धी चालविण्यास चालना देणारा एक महान तत्ववेत्ता म्हणजेच Socrates जीवनमूल्यांशी तडजोड न करता 'मृत्युदंड स्वीकारणारा Socrates महान मार्गदर्शक आहे
          The unexamined life is not worth living - Socrates
  •      आधुनिक ज्ञानमीमांसा करणारा Plato. त्याने लिहिलेला 'रिपब्लिक' संवाद आजही मार्गदर्शक आहे
  •     त्यानंतर Aristotle यांनी भौतिकी, आध्यात्म, कविता, नाटक, संगीत, तर्कशास्त्र, राजनीति शास्त्र, नीतिशास्त्र, जीव विज्ञान याविषयी विचार मांडले.
  •     श्रद्धा आणि बुद्धी यांचा मेळ घालणारे Thomas Aquinas
  •       ख्रिस्ती धर्मसुधारणेला चालना देणारे Erasmus
  •   विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे Bruno
  •       मुत्सद्दी व तत्वज्ञ Francis Bacon
  •  परंपरागत भ्रांत समजुतींचा विरोध करून नव सिद्धांत प्रस्थापित करणारा आणि त्या सिद्धांतासाठी मृत्यु स्वीकारणारा Galileo
  •       आधुनिक तत्वज्ञानाचे जनक René Descartes
  •     ईश्वराच्या तत्कालीन कल्पनांना छेद देऊन ईश्वराचे अस्तित्व बुद्धीने सिद्ध करणारा Spinoza
  •     उदारमतवादाचा आग्रह ठेवणारा John Locke
  •      'Monad' ही संकल्पना देणारा बुद्धिवादी तत्वज्ञ Leibniz
  •   आधुनिक 'चिद्'वादाचा जनक Berkeley
  •      परंपरेच्या विरुद्ध लढा देणारे Voltaire
  •     बाह्यवस्तू म्हणजे 'संवेदन समूह' आणि आत्मा म्हणजे 'अंतर्संवेदनांचा समूह' असं विश्लेषण करणारा, इंग्लंडचा   इतिहासकार, 'संशय'वादी तत्वज्ञ David Hume
  •       फ्रेंच राज्यक्रांतीत सिंहाचा वाटा उचलणारे Rousseau
  •       त्यानंतर Critique of Judgment,Critique of Practical Reason,Critique of Pure Reason या  संकल्पना समजावणारे, मानवाच्या संदर्भात सर्वच क्षेत्रात योगदान देणारे महान तत्वज्ञ Immanuel Kant  
  •       अर्थशास्त्रात क्रांती करणारे आणि साम्यवादाचे जनक  Karl Marx
  •       आपल्या प्रखर बुद्धिमतेने मानवी जीवनाच्या अनेक अंगांवर प्रकाश टाकणारे Bertrand Russell




वर्षानुवर्षांच्या या सर्व विचारमंथनातूनच आजच्या मानव समाजाची घडण झाली आहे त्यात तत्वज्ञानचं मोठं योगदान आहे
भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाच्या संघर्षापेक्षा 'समन्वय' साधून मानवी जीवन उन्नत होऊ शकते.   








Friday, 23 September 2016

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले..



Knowning of self is not an event, its Process..
हो मात्र ह्या proces मध्ये आपण असणं महत्वाचं नाही का ?
असं कित्येक वर्ष अविरत सुरु होतं..
दोन वर्ष घरी नव्हतो तेव्हा मात्र ह्यात खंड पडला होता बरं का..
असं कुणीतरी लिहिलं आहे ते खरंच आहे कि,

It is said some lives
       are linked across time..
Connected by ancient calling
       that echoes through the ages..

पुन्हा आता जेव्हा घरी आलो तेव्हा ही जाणीव झाली.. 
अचानक सर्व डोळ्यासमोर तरळलं.. 

जगण्याचं समाधान मिळावं ही तशी प्रत्येकाचीच इच्छा.. त्यानुसार प्रत्येकानेच जपलेलं आपलं वेगळेपण हे ओघाने आलंच.. जिथे राहतो जिथे जगतो तिथली जागा , तिथल्या भिंती पासून माझा शर्ट, माझी वही इ... निर्जीव वस्तूंत का होईना आपसुक नातं तैयार होतंच.. मग जरा का बदल झाला की गडबड सुरु होतेच म्हणून कुणीतरी म्हंटलं आहे ना कि रात्र वैरी कधीच नसते.. वैरी ठरतात त्या सवयी..
असो..! सजीवांशी मात्र नातं निर्माण होतं नसतं तर ते करावं लागतं.. तेही आपल्यातील कलागुणांनीच..

घराच्या बाल्कनीत तासन् तास बसून गप्पांतुन 'लोकवांङ्मय'प्राप्ती हा जणू आमच्या जिव्हाळ्याचा विषय.. लहानपणापासून पक्ष्यांसाठी तांदळाचे दाणे ठेवणे, उन्हाळ्यात पाणी ठेवणें हा तसा बाबांचा नित्यक्रमच..
तुम्ही पाळीव प्राणी पाळता का असं एखाद्याने विचारावे अन् कुठला प्राणी नाही पाळत ?हे उत्तर आम्ही द्यावे हे ठरलेलेच..

साधारण ह्याची सुरवात कधी झाली ते आठवत नाही.. जाणिव मात्र व्हायला लागली.. ती केलेल्या प्रयोगानंतर..
‘’जिचं रूप मोहक विलक्षण आहे.. निसर्गातील कलागुणांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीच ती कदाचित एका जागी जास्त वेळ स्थिरावत नसावी.. मात्र दिसताक्षणीच डोळ्यांत भरणारी.. सूर्यनारायणानंतर येणारी.. मध्यंतरी पतंगाच्या मांज्यामुळॆ असो किंवा मोबाईल टॉवरच्या लहरींमुळॆ दुर्मिळ होत चाललेली.. 'Struggle of Existence' च्या नियमांत आपल्याला बसवून आपली प्रतिकारक्षमता वाढवून पुन्हा डौलात जगणारी.. जिचं कौतुक करावं तितकं कमीच अशी चिऊ ताई.. !!’’

सूर्योदयानंतर दररोज आवर्जून उठवायला येणारी.. वेळेत नाही उठलं तर रागही येतो बरं का इकडे..जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मनमुराद ओरडायचं..‘चिवचिवाट’ ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय ह्याची जाणीव नेमकी तेव्हा झाली..

सुरवातीला वाटलं की योगायोग असेल (असा मनाचा समज)
कधीतरी वाचता वाचता आतल्या खोलीत झोप लागली तर सकाळी त्या खिडकीत न येता आतल्या खिडकीतच प्रकटावं तेही सुप्रभात म्हणायला.. आपणही नात्यात गरज नसताना अशीच परीक्षा घेतो ना एखाद्याच्या विश्वासाची ?

प्रेम, विश्वास, आपुलकी यांचा परिणाम म्हणजेच नातं.. कधीतरी पेरलेलं बीज जेव्हा मोठं होऊन एखाद फळं देतं तेव्हा ते मलाच हवं ही अभिलाषा नसतेच मुळी कुणात.. आपण केलेल्या प्रेमाचं ते प्रतीक असतं.. कुठलाही पाळीव पक्षी-प्राणी अन् त्याच्या लीला पाहणे हा एक सुखद अनुभव आहे.

हा योगायोग आहे का? निश्चितच नाही..
नात्यात आपलंपण ऐकू येतच.. फक्त ‘कान‘ असणं गरजेचं..
आपल्या मनीचे गुज उलघडणारी एखादी 'मनी' असतेच कुठेतरी..
आपल्या हाताने जेवणारा एखादा 'राजा' असतोच कुठेतरी ..
आपल्याच आवाजाची नक्कल करणारा 'हिरवा' जादूगार असतोच कुठेतरी..
कधीतरी खाटिकाकडून वाचलेला अन् नवीन जन्म मिळालेला इवलासा 'ससा' असतोच कुठेतरी..

सध्या कुठलेच प्राणी पाळत नाही कारण वाढत्या वयाबरोबर जसं मनही मोठं होतं गेलं तसं उमगलं..
मानवी’ बंधनापेक्षा ‘निसर्ग’बंधनात त्यांना जास्त भावतं आणि त्यातच त्यांचं ‘स्वातंत्र्य’ जपलं जातं..
पुन्हा नवी पहाट होईल..
पुन्हा एकदा सूर्य उगवेलं..
पुन्हा प्रेमाची पावती घेऊन चिऊ ताई येईलंच..  

पण प्रश्न मात्र हाच असेल
नातं कुठलंही असो !
मग ते टिकवायचं की मोडायचं ? 
उत्तर आपल्या 'इच्छेत' आहे..



Friday, 26 August 2016

‘’ जन्मना जायते जंतु: | संस्कारात् द्विज् उच्यते | ’’


  
 


    केवढासा तो जीव लोभसवाणा.. चेह-यावर समाधानाचं हसू आलेलं.. आईसमवेत शाळेतून घरी येताना आपल्याच मस्तीत रमलेला.. रस्त्यात जेव्हा पाहिलं तेव्हा थोडसं कुतूहल माझ्याही चेहऱ्यावर होतच म्हणा.. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जणू त्यांनी जगच जिंकलं असावं असं भासत होतं..
    निमित्त होत ते शाळेत होणाऱ्या गणितातील विशेष परीक्षेचं.. मुळात असल्या 'एखाद्या' विषयात प्राविण्य मिळवता येणाऱ्या अशा काही परीक्षा असतात हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसतं ही गोष्ट वेगळीच.. असो ! चौकशीअंती समजलं की छोटू दुसरीला आहे.. घरची परिस्थिती छान आहे तशी.. मध्यमवर्गीयच.. तर होणाऱ्या परीक्षेसाठी शाळेतून पाठवण्यासाठी ५ जणांची निवड करण्यात आली आहे.. परीक्षेत प्रथम येणाऱ्यास १००००/-,व्दितीय येणाऱ्यास ५०००/-,तृतीय येणाऱ्यास ३०००/- रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे..
ह्याने न घरी विचारताच त्या परीक्षेसाठी स्वतःहुन नावं दिलेलं होतं (आजच त्या ५ विद्यार्थ्यांच्या पालकांना विध्यार्थ्यांना कुठे परीक्षेसाठी घेऊन जायचं आहे याकरिता बोलावलं होतं तेव्हा त्यांना हा ही परीक्षा देतोय हे समजलं..)
वर्गातून खाली उतरता उतरता तो आईला म्हणाला..
आई :मी खूप अभ्यास करेन,काही करेन..पण पहिलाच नंबर काढेन..
कौतुक आणि आश्चर्यमिश्रित चेहऱ्याने आईने विचारलं : ''का रे ? तू ही परीक्षा देत आहेस हीच मोठी गोष्ट आहे..''
छोटू : ''अगं ते पहिल्या क्रमांकाचं मिळणारं बक्षीस आणि बाबांचे थोडे पैसे त्यात टाकून आपण आपल्या घरात 'Refrigerator' घेऊयात ना.. म्हणजे जी भाजी खराब होते ना ती आपण त्यात ठेवू.. अन्नही वाया जाणार नाही.. आणि माझी 'कॅडबली'ही त्यातच ठेवता येईल..''

त्याच्या उत्तराने लहानपणी मनाला भावलेल्या काही ओळी अचानक नजरेसमोर तरळल्या..

 
‘’हमारे पीछे कोई आए ना आए
हमें ही तो पहले पहुँचना वहाँ हैं
जिन पर हैं चलना नई पीढ़ीयों को
उन ही रास्तों को बनाना हमें हैं I
जो भी साथ आए उन्हे साथ ले ले
अगर ना कोई साथ दे तो अकेले
सुलगा के खुद को मिटा ले अंधेरा


हमारी ही मुट्ठी में आकाश सारा
जब भी खुलेगी चमकेगा तारा II’’



परीक्षा होण्यास अजून अवकाश आहे.. यश मिळेल कि नाही हा नंतरचा भाग..
परंतु मिळालेल्या संस्कारात छोटू मात्र नक्कीच 'पास' झाला आहे.. 
यात मात्र काहीच शंका नाही..