Thursday, 14 July 2016

नित्यनेमे वाहे 'श्रद्धे'ची ही गंगा.. तुझ्या 'अंत'रंगा स्पर्शू पाहे..





विज्ञानाचा आणि अध्यात्माचा मिलाफ घडवून आणणारी ही वारी...रिंगण, वारी, घोडा नाचवीत मजल करीत पंढरीची वारी करण्याची परंपरा जेवढी जुनी तेवढीच अभंगांच्या वाटेने विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपराही जुनी आणि रसाळ. जसा ज्याचा  ध्यास तसा त्याचा विठ्ठल आणि म्हणूनच पंढरीच्या वारीसाठी भले दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर लाखो वारकरी निघाले तरी त्या पंढरीच्या वाटेवर मात्र जो तो आपापल्या विठ्ठलासोबत असतो एकेकटा..
वारी म्हणजे यात्रा आणि दिंडी म्हणजे त्यातील पथक... वारीची प्रथा जुनीं असली तरी दिंडी ही संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू झाली. वारीतील दिंड्यांची एक शिस्तबद्ध अशी रचना असते. वैदिक धर्मा मध्ये ज्याप्रमाणे गीता उपनिषद ब्रम्हसूत्र या प्रस्थानत्रयीचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच वारकरी संप्रदायात श्रीज्ञानेश्वरी, श्रीभागवत, श्रीतुकारामगाथा या प्रस्थानत्रयीचं महत्त्व आहे. चालताना, भजन म्हणताना पावली खेळली जाते. यातून पायांच्या स्नायूंना अशाप्रकारे व्यायाम मिळतो कि इतक्या दिवसांच्या चालण्याचा थकवा दूर होतो. या पावल्या जणू शरीराला चार्जिंग देण्याचे काम करतात. यात सर्वांत लोकप्रिय खेळ असतो तो फुगडी... फुगडी झाल्यावर फुगडी खेळलेले वारकरी एकमेकांच्या पाया पडतात...
             पंढरीच्या लोकां नाही अभिमान पाया पडे जन एकमेकां ॥
वारीतला सर्वांत आकर्षणाचा भाग म्हणजे रिंगण. परंपरेनुसार रिंगणाच्या ठिकाणे ठरलेली असतात. खेळ खेळताना प्रत्येक वारकरी हरिपाठात, नाथांच्या भारुडात, तुकोबांच्या अभंगात, माऊलींच्या विरहिणीत, मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगात तल्लीन होत असतो.
           नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा रेखेळीया सुख देईल विसावा रे
भरगच्च भरलेल्या सभागृहात रंगमंचावर विठ्ठलनामाचा गजर टिपेला पोहोचला  असताना तिथे धावून येणारा विठ्ठल जेवढा जनात असतो तेवढाच प्रत्येकाच्या मनातही असतो..



टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे होउनी निःसंग

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

 


Thursday, 7 July 2016

८ जुलै : साहसदिन (त्रिखंडात गाजलेली स्वातंत्र्यवीर सावरकरांची मार्सेलिसची उडी)



फेकिता देह मी सागरी.....
घेतले प्राण हातावरी। फोडुनी क्रूर कारातरी।
फेकिता देह मी सागरी॥
मुक्त मी या क्षणी। तोडुनी दावणी।
ना क्षिती यापुढे जीव घेवो कुणी। वाहुनी दैव माथ्यावरी।।१॥
स्वस्थ शत्रु मनी। रोखुनी संगिनी।
मान फासावया नेतसे बांधुनी। उर्मि आली तशी अंतरी।।२॥
मुक्तिचा भक्त मी। कोंडलेला तमी।
गौ गवाक्षातुनी जम्नभू ते नमी। छत्रवारी उषा अंबरी।।३॥
नष्ट हो दुर्दशा। बंधनाची निशा।
भारता भानुचार रश्मि दावो उषा। अर्ध्य सुर्यासी देण्याकरी।।४॥
सिध्द मी चेतना। तुच्छ मानी तना।
वध्य ना छेद्य ना शोष्य ना क्लेश ना। निर्भय नाव रे संगरी॥५॥
मारण्याला मला। शत्रु ना जन्मला।
येत जो मारण्या तोच भांबावला। दूर जाई भयाने अरी॥६॥
तोफ बंदूक वा। सैनिकांचा थवा।
अवती भोवती चालू दे तांडवा।
सत्य मी नित्य मी भूवरी॥७॥


सागर भेट ....
स्पर्शाने त्या सागर शरीरी उठला गोड शहारा
शिरी घेऊनी नाचे तो त्या मृत्युंजय वीरा ॥धृ॥
अवघे जलचर अचल जाहले
काळालाही भान उरले
कार्य आपुले विसरून गेला काही क्षण वारा ॥१॥
स्वातंत्र्यवीरांचे पाहूनी बंड
वडवानलही होई थंड
सागरतळीच्या रत्नांचाही उतरून गेला तोरा ॥२॥
सूर्य, चंद्र, नक्षत्र नी तारे
स्तिमित झाले देवही सारे
भारतप्रेमी अत्यानंदे करिती जयजयकारा ॥३॥
अशा वीराशी आपुले नाते
कधी ना विसरू आपण त्याते
सागरभेटीच्या शतस्मृती
दिनी मानाचा मुजरा ॥४॥



स्पर्शाने त्या सागर शरीरी उठला गोड शहारा
शिरी घेऊनी नाचे तो त्या मृत्युंजय वीरा
त्रिखंडात गाजलेली उडी .....
ही अशी उडी बघताना
कर्तव्य मृत्यू विसरला
बुरुजावर फडफडलेला
झाशीतील घोडा हसला॥ १॥
वासुदेव बळवंतांच्या
कंठात हर्ष गदगदला
क्रांतीच्या केतूवरला
अस्मान कडाडून गेला
दुनियेत फक्त आहेत
विख्यात बहाद्दर दोन
जे गेले आईकरिता
सागरास पालांडुन
हनुमंतानंतर आहे
या विनायकाचा मान
लावुनिया प्राण पणाला
अस्मान कडाडून गेला ४॥