Friday, 25 December 2015

'शिव-समर्थ' योग..


स्वराज्यातील मावळे उभे करण्यासाठी रामदास स्वामींनी उभारलेल्या हनुमान मंदीर आणि
व्यायामशाळा यांचा मोलाचा वाटा होताच... बिकट प्रसंगी अफजल खानाच्या आगमनाची चाहुल देणारे हे रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांस पाठवलेले हे 'गुप्तपत्र'..

" विवेंके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणोन..
पुढील भविष्यार्थी मन
हाटोच नये !!

चालो नये असन्मार्गी
त्यता बाणल्या अंगी..
घुवीर कृपा प्रसंगी
दास महात्म्य वाढवी !!

जनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार..
घालिताती येर झार
लाविले भ्रमण जगदिशे !!

दिमाया मूळ भवानि
हेचि जगाची स्वामिनी..

एकांती विवंचना करोनी,
इष्ट योजना करावी !! "

प्रत्येक चरणातील 'आद्याक्षर' वाचल्यास ह्यातील प्रसंगावधानता दिसून येईल.

Wednesday, 23 December 2015

'गोपाळा..गोपाळा..देवकीनंदन गोपाळा..!'

''भुकेलेल्यांना=अन्न, तहानलेल्यांना=पाणी, उघड्यानागड्यांना=वस्त्र गरीब मुलामुलींना=शिक्षणासाठी मदत,बेघरांना=आसरा,अंध,पंगू रोगी यांना=औषधोपचार,बेकारांना=रोजगार,
पशु-पक्षी,मुक्या प्राण्यांना=अभय, गरीब तरुण-तरुणींचे=लग्न,दुःखी व निराशांना=हिंमत,गोरगरिबांना=शिक्षण.
हाच आजचा रोकडा धर्म आहे!हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!''
असे सांगणारा हा महापुरुष महाराष्ट्राच्या इतिहासात सतत ५० वर्षे कार्यरत होता.निरक्षरता,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता यांवर कडाडून प्रहार करणारे हे चरित्र म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर.अमरावती येथे शेणगाव नावाच्या गावात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला.चिंध्यांची गोधडी हेच त्यांचे वस्त्र,पायात पादत्राणांचे तुटके जोड,खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू अश्या अपरिग्रह वृत्तीने जगणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत म्हणजे गाडगे महाराज..








                  'गोपाळा!गोपाळा!देवकीनंदन गोपाळा..'म्हणत लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे बाबा म्हणत,‘मी कोणाचा गुरू नाही,मला कोणी शिष्य नाही.’आचार्य अत्रे म्हणत,'सिंहाला पाहावे वनात,हत्तीला पाहावे रानात,गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात..!' डॉ.बाबासाहेब आंबेडकरही बाबांची विचारपुस करीत असत.धर्मांतराचा निर्णय घेताना आंबेडकरांनी बाबांना मत विचारले तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,''ते तुमचे तुम्ही पहा,पण दोन रस्ते टाळा. भारताबाहेरून आलेले रस्ते सोडून द्या. तुमच्यामागे लक्षावधी लोक आहेत.या लेकरांची दिशाभूल होणार नाही एवढी काळजी घ्या.' 'बाबा Socratesप्रमाणे 'Dialectical Method'ने कीर्तन करीत.संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
           कर्मवीर भाऊराव पाटील बाबांना आप्त वाटत. ज्यावेळी अनुदानाचा प्रश्न उद्भवला,त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यास बाबांनी भेटुन मदतीची सूचना केली,पुढे अखंड महाराष्ट्रात 'रयत शिक्षण संस्था' नावाची चळवळ उभी राहिली.कर्मवीरांनी कृष्णा-कोयनेच्या संगमावर वसलेल्या कराड शहरात 'सदगुरू गाडगे महाराज महाविदयालया'ची स्थापना करून कृतज्ञता व्यक्त केली.'गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी आहे.'असे गो.नी.दांडेकरांनी म्हंटले आहे. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत,आपले तत्त्वज्ञान पटवून देत.त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
शहरांत उपचारासाठी येणा-या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा,गोरगरीबांसाठी अन्नछत्रे,दुष्काळग्रस्तांना मदत,निर्धन विद्यार्थ्यांसाठी शाळा व वसतिगृहे काढून ज्ञानमंदिराकडे नेणारा, माणसांत भगवंत पाहणारा, माणसांच्या सभोवतालच्या स्वच्छतेबरोबरच 'मानसिक व बौद्धिक' स्वच्छता  करणारा हा कर्मयोगी '२० डिंसेंबर १९५६' या दिवशी सेवामुक्त झाला.
    'डेबू', 'देवकीनंदन गोपाळा' हे गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहेत.गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते.
पुरस्कार :
महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
 The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
 आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
 कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
 गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
 गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
 गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
 दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
 मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
 मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
 लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
 श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
 श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
 श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट,   अकोला (१९९४)
 श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
 श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
 श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
 श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
 संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
 संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)





Thursday, 17 December 2015

" Oh! How great is LOVE... and How little am 'I' ! "


''न समजलेल्या ओळींना खूप काही अर्थ असतात...
 उस्फुर्तपणे प्रकटलेल्या भावना व्यर्थ नसतात.. '' 
 नातं कुठलंही असो, प्रत्येकाशी जोडलेला संबंध असो.. त्यात 'प्रेम' असलं तरच ते टिकतं..
''आयुष्य जगण्याला लढण्याच तेज हवं असतं..
स्वप्नांची भरारी घेण्यासाठी पंखांना उडण्याच बळ हवं असतं…
जगतात तर काय 'निर्जीव' यंत्रे देखील हो..
पण 'जीवा'ला जगण्यासाठी मात्र 'प्रेम'च हव असतं..''
कधी,केव्हा,कसं,कुठे होईल ते माहित नाही..पण शोधलं कि सापडतंच..!
वय कुठलंही असो..दिनदर्शिकेच्या तारखांना काळाचे कोणतेच संदर्भ नसतात.
मोकळेपणाने बोलत जावं ह्याचा अर्थ असा नाही कि जगापुढे आपलं सगळं आयुष्यच उघडून ठेवावं.
स्थळ,काळ,व्यक्तींचं तारतम्य पाळणं मात्र ह्यात गृहीत आहे...अर्थात परिणामांची भीती न बाळगता !!

कधी भावनेच्या आहारी जाऊन दाखवलेलं धाडस केविलवाणं होऊ शकत.अथवा त्यात सहजभाव नसेल तर गोंधळ होऊ शकतो,
नाहीतर जे बोलायला हवं ते आयुष्यभर बोललं जात नाही. आत्मसन्मानाचा हळुवारपणाही त्यात जपला जात नाही..म्हणून 'सत्या'च्या पायरीवरच प्रेम होऊ शकतं.
संबंध जपताना प्रेमाचंच 'खत'पाणी घालायला हवं; कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात..नाहीतर संशयाची बांडगुळ वाढायला जरासाही वेळ लागत नाही आणि राग-द्वेष ह्यांच्यामार्फत हा वटवृक्ष पोखरायला..

दृष्टीतून आश्वासन,स्पर्शातुन मायेची ऊब,चुकांतून समजण्याची वृत्ती,शरण नव्हे तर समर्पणाचा भाव संपला ना..तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत नाही. म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला…कि 'जगण्याचा' त्रास होत नाही.

प्रेमाचे अनेक पदर आणि छटा उमजत जाणं हा एक समृद्ध प्रवास असू शकतो.ह्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला नवीनच आनंद देत असतो.भावनांचे रेशमी बंध अलगद उलघडत जातात, मग पती-पत्नीच्या नात्यांत फक्त 'व्यापार' वा स्वार्थ इतकाच प्रेमाचा मुक्काम ठरत नाही तर आयुष्याला प्रवाही करणारं ते एक माध्यम ठरतं.
कुणीतरी म्हंटलय ना,''मनाची दारं उघडी हवीत.अनुभवांना सामोरं जायला हवं.भीतीनं दार बंद करून घेऊन फटीतून पाहिलं तर आकाश तेवढंच दिसणार ! त्याची व्याप्ती कळ्णार नाही. मात्र संपूर्ण दार उघडलं तरच ती नजर विस्तारते. उमगतं,प्रेम म्हणजे स्वीकार,सहजता,सन्मान,विश्वास,अवकाश आणि आनंद..''

ते पवित्रही हवं..निस्सीमही हवं अन् आल्हाददायकही..म्हणजेच जितकं ते कमवायला हवं तितकच ते दयायलाही हवं. भक्तीत, 'Expectational Love'ने सुरु होणारा हा प्रवास Emotional Loveपासुन ते Intellectual Loveपर्यंत करता-करता, 'Eternal Love'मध्ये त्याचं 'परिणीत होणं' हीच खरी जीवनाची सार्थकता आहे.

कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..'Anything For You..Here' And 'Handle With Care' असेल तर प्रेम फक्त टिकत नाही तर ते हृदयात रहातं आणि वाढतंच जातं..असो! शब्दांच्या ह्या पसा-यात थोडीशी धूळ झटकली इतकंच.ज्याचं त्यानंच शोधायला हवं.कारण प्रेमात पडायचं(?).. नव्हे तर 'जगायचं' असतं. चर्चा करुन Between the Lines 'ते' शोधण्यापेक्षा थेट 'अनुभवायचं' असतं. 

रामरक्षा


गणेश नमन
नमन तुज गणेशा
बुध कौशिक ऋषी विशेषा
श्री सीतारामचंद्र देवता।
अनुष्ठूपछंदा, शक्ती सीता
श्रीमद हनुमान कीलकम।
श्रीरामचंद्रा व्हावे प्रीतम
जपावे सदा या स्तोत्रा
श्रीराम तोजी तो त्राता।

प्रार्थना
ध्यान करा ज्याचे बाहू अजान बाहू
धरी करी जो चापबाण,राम पाहू
बसे बद्ध पद्मासनी,पितांबर जो नेसला
नेत्र कमलदलापरी, वदनी प्रसन्नता
वामांकी असे सीता,करी मुखावलोकना
नील मेघापरी कांती जयाची,अलंकारधारी
जटामंडल धरी शिरी, वंदावा तो राम रामप्रहरी। 

रामरक्षा
चरित रघुनाथाचे असे शतकोटी श्लोकांचे। 
एकेक अक्षर जयातील,
होई महापाप नाशाचे।।

शामवर्ण जयाचा नीलकमलापरी,
असा राम राजीव लोचनी।
जानकी लक्ष्मण जयासंगे,
जटामुकुट दिसे शोभूनी।।

तलवार जया हाती,
पाठी राहे बाणभाता।
दुजा हाती चापबाण,
करुनी संहार दानवांचा।
होई जगाचा त्राता।।
 करी जे पातकांचा नाश,
पुरवी  सर्व कामना।
करुनी ध्यान प्रभूचे,
हे रामरक्षा स्तोत्र ह्मणा।
रघुराज वंशी जन्माला जो,
तो राम करो मस्तकाचे रक्षण।
दशरथाचा पुत्र तो राम,
करील मम भाल रक्षण।।

कौसल्या पुत्र जो राम,
राखो माझे  नयन।
विश्वामित्र प्रिय तो रघु,
कान करो सदा श्रवण।।
करो ती रक्षण नाकाचे,
भ्राता लक्ष्मणाचा करो रक्षण मुखाचे।
सकल विद्या जयाला ज्ञात
तो विद्यानिधी राखो रसना।
करी भरत जयाला वंदन
तो राम मम कंठा रक्षिल ना।।
दिव्य अस्त्रे जया स्कंधी,
तो राखेल मम खांदे ।
केले भंग शिवधनु जयाने,
तो राम रखो मम बाहू आनंदे।।

सीतापती राम जो,
करा रक्षण मम करांचे,
जिंकले जयाने परशुरामा,
करील रक्षण मम हृदयाचे।।
जिंकले जयाने खर नामे दानव,
तो राम रक्षो मम मध्य अंगा। 
देई अभय जो जांबवना,
राखील मम नाभी स्थाना।।

स्वामी जो सुग्रीवाचा,
तो रक्षो प्रदेश कटीचा।
तो रामप्रभू मारुतीचा,
करील रक्षण मम जांघाचा।।
जो रघुत्तम करी नाश दानवांचा,
तो राम रक्षील ऊरू साचा।

जयाने बांधला सेतू सागरी,
गुडघ्यांचे करी रक्षण तो राम।
जयाने वधिला लंकापती रावण,
तोच राखेल पोट-या उत्तम।। 
बिभीषणाला दिले जयाने राजपद,
तोचि रोखेल मम पदाला।
देई आनंद जो सकला,
तो राम रक्षील सर्व शरीराला।।

जो करील पठण या स्तोत्राचे
तो रामबल योगे पावेल सकल साचे।।
तो होईल चिरायू सुखी,
वाढेल तयाचा कुलवंश।
सर्व कार्यी मिळेल विजय,
विनयाने शोभेल जयाचा वंश।।

रामनामाने होई जायचे रक्षण,
त्या मानवाचे जाणा हे लक्षण।
पाताळ,भूमी वा आकाशी,
खल तयाचे करती न अवलोकन।।

राम,रामभद्र वा रामचंद्र,
या नामाने करी जो स्मरण।
त्या मानवाला स्पर्शती न पापे,
सुखे मिळती तयाला,
मोक्षे होई पावन।।

जिंकाला सकल जगता,
तो मंत्र राही सफल रामनामाचा।
त्या मंत्राने मंतरलेला गोफ,
करी धारण कंठी,
पावेल सकल सिद्धी जाण।।

इंद्रवज्र जसे संरक्षक राहे,
तैसेच हे रामकवच रक्षक पाहे।
करी स्मरण जो या स्तोत्राचे,
आज्ञा पाळती सकल जन।
लाभेल तयाला जय सर्वदा,
होईल तयाचे कल्याण।।
ही रामरक्षा स्वप्नी सांगती,
स्वये शंकर बुध कौशिका प्रती।
तैसीच काढली लिहुन,
येता जाग प्रभाती।।

वन हे जणू कल्पवृक्षांचे,
करी दूर जे सर्व आपदा।
त्रैलोकी जो मनोहारी राम,
प्रभू आमचा, लागो तया पाद।।
तरुण, रूपसंपन्न सुकुमार जो,
तरीही तो महाबलशाली झाला।
पुंडरीकाप्रमाणे जयाचे अक्ष,
केले तयाने परिधान कृष्ण जीनाला।।

सेवती कंदमुळफल जे,
जितेंद्र, तपस्वी अन ब्रम्हचारी।
केला संहार राक्षस कुलांचा,
ते रामलक्ष्मण चापबाण धारी।।

रघुकुली पुत्र दशरथाचे,
श्रेष्ठ सर्वधनुर्धरामाजी।
ते बंधु करोत रक्षण
प्राणीमात्रांचे या जागामाजी।।

सदैव सज्ज धनुष्य बाण हाती,
अक्षय भाता राहे जया पाठी।
ते राम लक्ष्मण चालोत पुढे,
मार्गी माझ्या रक्षणा साठी।।

अंगी कवच करी धारण,
चापबाण,जया हाती तलवार।
आमचा मुर्तिमंत मनोरथ जणू,
लक्ष्मणासह राम करो रक्षण वारंवार।।

राम दाशरथी जो शूर,
जयाचे अनुचर लक्ष्मण करी।
काकुस्थ कुळीचा पुरुष पूर्ण,
कौसल्यासूत रघुत्तम तो हरी।।

जाणी जो वेदांतविद्या,
तो पुराण पुरुषोत्तम।
जानकीचा वल्लभ तो राम,
वैभवशाली दावी अतुल पराक्रम।।

श्रद्धेने करी जो नित्य,
जप माझ्या या नामाचा।
लाभेल त्याला अश्वमेधाहून,
पुण्य,यात काय संशय तो कशाचा।।

दूर्वदलापरी शामवर्ण जयाचा,
नेत्र पद्मापरी,पितांबरधारी।
त्या रामनामाची करती स्तुती,
ते मनुज संसारातुनी मुक्त होती।

रघुकुल श्रेष्ठ लक्ष्मणाचा भ्राता,
तो रघुवर सीतापती सुंदर। 
काकुस्थ कुलोत्पन दया सागर,
तयासी प्रीय होत ते वीप्रवर ।।
राजेंद्र, सत्यप्रिय तो दाशरथी,
शामल आनंददायी ती शांतिमुर्ती।
रघुकुल तिलक, जयाने वधिला
रावण, त्या रामाला आनंदे वंदती।।

रामा,रामभद्रा वेधसे,
रघुनाथा,नाथा नामे जो बोधिला।
करुनी प्रणाम त्या देवा,
तो सीतापती आम्ही नमिला।।

श्रीराम राम रघुनंदन राम राम। 
श्रीराम राम भरताग्रज राम राम। 
श्रीराम राम रणगर्जनी राम राम। 
श्रीराम राम शरण तुला राम राम। 
श्रीराम चंद्र चरण स्मरतो मनापासुनी। 
श्रीराम चंद्र चरण स्तवितो मी गाऊनी।
श्रीराम चंद्र चरण नमितो शिर लवूनी।
श्रीराम चंद्र चरण शरण मी रात्रंदिनी। 

माता राम मम पिता रामचंद्रा,
स्वामी राम मत्सखा राघवेंद्रा।
मम सर्वस्व राहे तो रामचंद्र,
त्या राघवा नमस्कार माझा।।

दक्षिणेस लक्ष्मण जयाच्या,
वामांगी राहे जनकात्मजा।
पुढे उभा मारुतीराया,
त्या राघवा नमस्कार माझा।।

देई आनंदा जनांना जो,
रणात देई धीर तो रणशूर।
राजीव नेत्री असे जे कारुण्यरूप, 
श्रीरामाला वंदन भरुनी ऊर।।

मनाप्रमाणे गती जयाची,
वेग राहे पवनापरी।
जितेन्द्र, बुद्धीमंतात श्रेष्ठ जो।
तो वानर युथांचा पुढारी।
त्या वातात्मजा शरण जावे,
राहे जो रामदूत सर्वतोपरी।।

कविता शाखावरी बैसोनी,
रामनामाचे करी जो गुंजन।
त्या मधुर मधुराक्षरांना देई रूप,
वाल्मिकी करी कोकिल कुंजन।।

जो आपदांचा नाश करी,
जो दाता सर्व संपदांचा।
देई आनंद जो जनलोका,   
करतो नमन मी साचा।।

करता गर्जना रामनामाची,
जळती बीजे या भवसागरी।
देऊनी सकल सुख संपदा,
ते नाम यमदूता धडकी भरी।।

राम राजमणी सदा विजयी,
त्या रामाला सदा भजावे।
जयाने मारिला निशाचर चमू ,
त्या रामाला सदैव नमावे।।
नसे दुजा श्रेष्ठ रामाहुनी
त्या रामाचे राहे मी दास।
चित्त माझे राहे रामठायी,
तो राम उद्धरी मज आज।।  

हे मनोरमे, सांगती शिव गौरीप्रती।
मी भजतो सदैव रामनामाते।
आनंदायी ते नाम मनारमवी,
ते नाम राहो मुखी सदा ते।। 

याप्रमाणे बुधकौशिक कवीने।
रचले हे स्तोत्र आनंदाने।
ते रामरक्षा स्तोत्र या परी,
होई संपूर्ण, गावे आनंदाने।।  

Sunday, 13 December 2015

गदिमांर्पण..

गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची?
काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.
पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे?
माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....

कालपुरुषा तु स्वत: थकशील,
थेरडा होशील पण,
आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.
आम्ही लढतच राहु.
हे आव्हान घे माझे
-एका कलाकाराचे!

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

हस्ति सर्व संपदा,
मस्तकात शारदा
असे असून दिनसा,
झुरसी काय व्यर्थ तू,
माणसा समर्थ तू!

पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या

प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा,
हेच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची

आता नुरे यातिगोत, धर्म एक भागवत
मोक्षमार्गाची माऊली, चंद्रभागा संतोषली
तीर्थी नाहताती संगे, शुद्ध-मळीणांची अंगे
साने समत्व बाहिले, श्रेष्ठ सानपणा ल्याले

पळून गेलेल्या काळाच्या कानात
माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे

"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"

गीत हवे का गीत?
एका मोलें विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत
गिऱ्हाईकाच्या लहरीखातर
कातुनि मी आणियले अक्षर
सुरेख केल्या बघा बाहुल्या वरी बांधिली फीत..

नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा!







पु.लं.म्हणतात,"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत. माणसाच्या मनाचे लहान मोठेपण, राग-द्वेष घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते. हजारो माणसे एक गाणे जेंव्हा आनंदाने गातात, त्या वेळेला त्या हजारांचे अंत:करण एक होते. माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली. म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार (Madgulkar Boys) आहोत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. "एका तळ्यात होती" (चित्रपट - सुखाचे सोबती) आणि "सैनिक हो तुमच्यासाठी" (चित्रपट - पाहू रे किती वाट) ही गाणी ऐकून डोळा पाणी न आलेला त्यावेळचा रसिक शोधूनच काढावा लागेल. ही दोन्ही गाणी ऐकताना माझ्या डोळ्यात तर आजही पाणी येते.

कुसुमाग्रज म्हणतात,"माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली, अस्सल मराठी स्वरुपाची, कलंदर शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते." तर पु भा भावे म्हणतात, "वास्तवतेतील गूढत्व आणि साधुत्व पहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते. माडगूळकरांच्यापाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे. ते नुसते आकाशाकडे पाहत नाहीत, तर आकाशतत्त्वाकडे पाहतात. ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले."

लेखक पु.भा.भावे,
''वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.''

कविवर्य बा.भ.बोरकर,''आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.''

यशवंतराव चव्हाण
''गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.''



लघुकथा
१) लपलेले ओघ
२) बांधावरल्या बाभळी
३) कृष्णाची करंगळी
४) बोलका शंख
५) वेग आणि इतर कथा
६) थोरली पाती
७) तुपाचा नंदादीप
८) चंदनी उदबत्ती
९) भाताचे फूल
१०) सोने आणि माती
११) तीन चित्रकथा
१२) कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)
१३) तीळ आणि तांदूळ
१४) वाटेवरल्या सावल्या
१५) मंतरलेले दिवस (राज्य पुरस्कार)
१६) तीन चित्र-कथा

काव्यसंग्रह
१) सुगंधी वीणा
२) जोगिया (राज्य पुरस्कार)
३) काव्यकथा
४) चार संगितिका
५) चैत्रबन (राज्य पुरस्कार)
६) गीतरामायण (इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, सिंधी, बंगाली, कानडी, तेलगू, कोकणी, ब्रेल भाषांतरित)
७) गीतगोपाल
८) दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार)
९) गीतसौभद्र
१०) पूरिया
११) वैशाखी
१२) अजून गदिमा


बालवाङमय

१) दे टाळी ग घे टाळी (केंद्र पुरस्कार)
२) ऊभे धागे आडवे धागे
३) शशांक मंजिरी
४) नाच रे मोरा


कादंबरी

१) आकाशाची फळे
२) ऊभे धागे आडवे धागे

संकीर्ण
   
१) तुलसी रामायण (गद्य भाषांतर)
२) गदिमा नवनीत (वेचे)

नाटक

१) युध्दाच्या सावल्या

संपादित मासिके
१) शब्दरंजन
२) अक्षर
३) धरती



 आवर्जून वाचावीत अशी गदिमांवरील पूस्तके

१) आकाशाशी जडले नाते : विद्याताई माडगूळकर
२) मंतरलेल्या आठवणी : श्रीधर माडगूळकर
३) आठवणीतील अण्णा - गदिमा : राजा मंगळवेढेकर
४) गदिमांच्या सहवासात : म.गो.पाठक


www.gadima.com

"ज्ञानीयाचा तूक्याचा तोच माझा वंश आहे..माझीया रक्तात ईश्वराचा अंश आहे" -गजानन दिगंबर माडगुळकर.

१४ डिसेंबर १९७७
...त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन...








"तो राजहंस एक......"
- सुमित्र माडगूळकर
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर!.
"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,होते कुरुप वेडे पिल्लु तयात एक.... "
गदिमांचे एक सुंदर गीत,आपल्या प्रत्येकात एक कुरुप पिल्लू दडलेले आहे,आपण डावलले जातो आहोत ही भावना कधी न कधी आपल्या आयुष्यात कुरुप बदकाच्या पिल्लाच्या रुपाने भावतरंगातून मान नक्कीच वर काढते.
आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता,गदिमांचा जन्म अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब कुलकर्णी परिवारात झाला,आटपाडी जवळचे माडगूळे हे गदिमांचे गाव,वडिल औंध संस्थानात कारकून होते,गदिमांचे आजोबा मोठे कर्तुत्ववान,ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले "बाळ,यापुढे काळ कठीण आहे,तुझा नवरा साधू-संत आहे,आज मिर्ची आणली तर चार दिवसांनी मीठ आणेल...तुलाच यापुढे खंबिर व्हायला हवे..." झालेही तसेच,अठराविश्व दारिद्र्य गदिमांची वाटच पहात होते,न देवाने रुप दिले होते न आर्थिक सुबत्ता,दहावीत गणिताने घात केला व पुढे शिकावे इतका पैसा व बळ ही त्यांच्या जवळ नव्हते पण एक दिवस घडलेल्या प्रसंगाने त्यांच्यातला राजहंस जागा झाला.
गदिमांच्या वडलांची 'कुडंल' या गावी बदली झाली होती,गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य,गावाजवळच्या ओढ्यामधून पाणी भरुन आणायला लागायचे,गदिमांनी कुमार वयात प्रवेश केला होता,अर्धवट वय ज्यावेळी,मनात एक धगधग असते,अन्याय-गरीबी,जग सगळ्यां विषयी एक विचित्र पेटती भावना मनात उत्पन्न होत असते,याच वयात एक दिवस गदिमा असेच गावातल्या पोरांबरोबर हुंदडत चालले होते,समोरुन ओढयावरुन कळशीत पाणीभरुन त्यांचे वडिल घराकडे चालले होते,त्यांना दम्याच्या त्रास होता,धापा टाकतच ते चालले होते....
गदिमांनी ते बघितले व त्यांचा राग मस्तकात गेला,तावातावाने ते वडिलांजवळ गेले व कळशी त्यांचा हातातून ओढून घेतली,तसेच तडक घरी गेले,कळशी ठेवली,व घरातले प्रत्येक भांड न भांड त्यांनी ओढ्यावरुन पाणी आणून भरायला सुरवात केली,अगदी वाटी-पेल्यांपर्यंत सर्व भरुन झाले,गदिमांची आई हे सर्व बघत होती ती हसुन म्हणाली
"अरे अण्णा,आता देवाची पळी तेव्हडी भरायची राहिली रे,तुझे वडील पाणी भरत होते तर पुरत नव्हते,आज तु पाणी आणलेस तर घरात पाणी ठेवायला जागा राहीली नाही...."
आईच्या बोलण्यातली सुचकता गदिमांनी अचूक ओळखली,आपले वडिल आता थकले आहेत,संसाराचा भार त्यांना एकट्याला पेलवत नाहीये आपल्यालाही आता काहीतरी करायला हवे याची जाणीव त्यांना झाली व वयाच्या केवळ १७-१८ व्यावर्षी ते घर सोडून पुढच्या वाटचालीसाठी कोल्हापूरला चित्रपटसृष्टीत आले.
पुढे काही दिवसांनी गदिमांच्या वडिलांची कुंडल गावावरुन बदली झाली,त्याकाळात बैलगाड्यांवरुन सामान नेत असत,कुलकर्णी कुटुंब आवरा-आवरी करुन निघाले पण गावातल्या लोकांनी गाड्या अडवून धरल्या,गावात देणी खूप झाली होती,व ती फेडल्याशीवाय जायचे नाही असे सावकार लोक सांगत होते,मोठी पंचाईत झाली,गदिमांच्या आईने छोट्या व्यंकटेश (गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर) ला सांगीतले
"अण्णा ला पत्र पाठवून बोलावून घे",
त्यांनी गदिमांना पत्र लिहीले,छोटा व्यंकटेश दररोज संध्याकाळी एसटीच्या वाटेवर डोळे लाऊन आपल्या भावाची वाट पहायचा,त्याला खात्री होती आपला आण्णा येईल व आपल्याला संकटातून सोडवेल,३-४ दिवस झाले व एके संध्यांकाळी आपल्या लाडक्या अण्णाची सावळी आकृती दुरुन येताना दिसली.गदिमा आले व त्यांनी गावातली सर्व देणी एकहाती देऊन टाकली व गदिमांच्या कुटुंबाच्या गाड्या कुंडल गावातून बाहेर पडल्या.
काही दिवसांपूर्वी तावातावाने वडीलांच्या हातून कळशी घेणार्या गदिमांच्यातल्या कुरुप पिल्लाचा आज राजहंस झाला होता,याच राजहंसाने पुढे मराठी साहित्यात व मराठी चित्रपटसृष्टीत एक स्वता:चे अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले,
"ज्योतीने तेजाची आरती" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...
मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.
हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला,व्ही.शांताराम यांचा 'दो आंखे बारह हाथ','नवरंग','गूंज ऊठी शहनाई','तूफान और दिया' हे चित्रपट गदिमांचेच!.अगदी गुरुदत्त च्या 'प्यासा' ची मूळ कथा असो,राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चन चा 'ब्लॅक',मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती.हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे.
मराठी साहित्यात गदिमांनी कवी,कथालेखक, कादंबरीकार, नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला जवळजवळ ३७ पुस्तके गदिमांच्या नावावर आहेत,प्रत्येक चित्रपटाची कथा ही कादंबरीच असते,गदिमांनी अशा १५७ पटकथा लिहील्या त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर २०० पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील!
गदिमांनी स्चातंत्रलढयातही भाग घेतला होता,खूप मोठया कुटुंबाची जवाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र यामुळे गदिमांनी स्वातंत्र लढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने,पोवाडे लिहून जनजागृती केली,सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.
गदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मीकी' ही पदवी ज्याच्या मुळे प्राप्त झाली ते महाकाव्य गीतरामायण,'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत,कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले 'गीतगोपालही' गीतरामायणाच्या तोडीस तोड आहे.पुरस्काराच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची.
१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह,इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते,अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.
'माणसाच्या ह्रदयात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे'.

 ''एक धागा सुखाचा,शंभर धागे दुखा:चे!
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे!!''