Showing posts with label Pragmatic (Re)VIews. Show all posts
Showing posts with label Pragmatic (Re)VIews. Show all posts

Friday, 13 January 2017

संक्रांत ते व्हॅलेन्टाईन.. एक 'उत्तरा'यण !!

          गेल्या दोन महिन्यांपासून बॅंका नि एटीएमसमोर लागलेल्या रांगा आता काहीशा आक्रसल्या आहेत.एटीएममधून दोन-अडीच हजारांऐवजी चार-साडेचार हजार रुपये मिळू लागल्यानं गर्दी ब-यापैकी घटलीय.आठ नोव्हेंबरच्या रात्रीनंतर आपल्याच जुन्या नोटांना दूर सारण्याचं अन्‌ त्यांच्या बदल्यात नव्या नोटांना आपलसं करण्यासाठी जो तो झटत होता.थंडीतल्या दुपारीही घामानं निथळलेल्या अवस्थेत प्रत्येक जण स्वतःच्या मताचे अन्‌ देशाच्या हिताचे 'अर्थ' नि 'कारण' शोधत राहिला.कालच्या नोटा नकोशा झाल्या होत्या, नव्या हाताशी येतही नव्हत्या.ही जीवघेणी घालमेल ज्याच्या वाट्याला आली नाही, असा 'नोटवाला' सांप्रत देशी सापडणार नाही. नव्या नोटेच्या गुलाबी स्वप्नाची ही वाट तशी काटेरी, तरी प्रत्येकासाठी अटळ होती. बॅंका, एटीएमच्या रांगांतून हाती लागलेली एखादी गुलाबी नोट शर्टाच्या खिशात अलगद ठेवून पुढं निघालेल्या तमाम मराठी जनांच्या दृष्टीला एका नव्या सिनेमाचं पोस्टर पडलं नि गुलाबी खिशाखालच्या हृदयाचे कप्पे उगाच धडधडू लागले. जणू काहीतरी प्रचंड वेगानं बाहेर येऊ पाहत होतं अन्‌ काहीतरी त्याला तेवढ्याच जोमानं रोखत होतं. समोरचं पोस्टर विचारंत होतं, "ती' सध्या काय करते..? अन्‌ इकडे दिलाचं प्रत्येक कंपन त्याचं उत्तर मागत होतं.जुन्या नोटांचं दुःस्वप्न मोठ्या निकरानं पिटाळून लावत नव्या, गुलाबी नोटांच्या स्वप्नपूर्तीत रमलेल्या जीवांचा आता दुस-याच गुलाबी स्वप्नानं पाठलाग सुरू केला होता..

          सुखाच्या झोपेचं स्वप्न पाहावं, इतकी जर ती दुर्मिळ झाली असेल, तर झोपेत पडणा-या सुखस्वप्नांचा विचारच न केलेला बरा..! दुनियादारीत पिचलेल्या प्रत्येक जीवाला आधार असतो, तो अशा सुखस्वप्नांचा. आणि अशा स्वप्नांनीच त्याच्या भावविश्‍वाभोवती फेर धरलेला असतो. हा फेर त्याला जगण्याच्या रहाटगाडग्यातून सोडवत असतो नि कळत- नकळत गुंतवतही राहतो. भूतकाळातल्या कटू आठवणींना तो स्वप्नात येऊ देत नाही नि सुखद स्मृतींना काही केल्या जाऊ देत नाही. अर्थात हा अवखळ खेळ त्याचं मन खेळंत असतं. बहिणाबाईंनी त्याला "वढाळ वढाळ' संबोधत, कितीही हाकललं तरी फिरुन फिरुन उभ्या पिकात शिरणा-या गुराची उपमा दिली. पुन्हा पुन्हा त्याच त्या गोष्टीकडं ओढ घेण्याची त्याची खोड काही जात नाही. या चंचल मनानं दिसाउजेडी वा गाढ झोपेत पाहिलेली स्वप्नं ही कित्येकांच्या भावविश्‍वाला समृद्ध करीत असतात. आयुष्यात "सेटल' झालेल्या, होऊ लागलेल्या नि चाळशी ते पन्नास-पंचावन्नच्या मधल्या वयात रेंगाळणाऱ्यांना तर अशा सुखस्वप्नांची जणू आसच लागलेली असते. कामाच्या ठिकाणी वाढलेला ताणतणाव, सार्वजनिक वातावरणातली कमालीची दांभिकता नि बेबनाव अन्‌ घरात अपेक्षा, मागण्या-गा-हाण्यांचा जमाव.या अटळ वाटेवर कधीतरी अवचित एक पोस्टर समोर उभं राहतं नि गूढ हसत विचारतं... "ती' सध्या काय करते? ते पाहणा-यापैकी कित्येकांच्या हृदयाची उगाच क्षणभर धडधड होते... अन्‌ आयुष्याच्या सिनेमाचा फ्लॅशबॅक सुरू होतो...

         गेल्या दहा-पंधरा दिवसांत मराठीजनांच्या भावविश्‍वाला "ती' सध्या काय करते? या एकाच प्रश्‍नानं कवेत घेतलंय. सोशल मीडियात हा प्रश्‍न हॅशटॅग करुन वा अगदी सहज विचारुन त्यावर आपापल्या पद्धतीनं उत्तरं देणा-यांच्या नि शोधणा-यांच्या प्रतिभेला खरं तर सलामच केला पाहिजे. सिनेमाच्या दिग्दर्शन वा अभिनयातून कदाचित जे व्यक्त झालं नसेल, ते ते सारं केवळ कल्पनाविलासाने सांगण्या-या, मांडणा-या, चितारणा-या पोस्ट पाच-सहा इंचांच्या स्क्रीनवरुन बोटाबोटाने पुढं सरकताहेत. त्यातही शाळेत जायला नको म्हणणा-या आपल्या गुबगुबीत "पेढ्या'ला घेऊन स्कूल बसची वाट पाहत थांबलेली "ती'..बसमधून कुण्या "बर्फी'ने या पेढ्याला हाक मारताच तो डोळे पुसत तिकडे धावतो अन्‌ आपल्या या सुपुत्राकडे "ती' माऊली अचंबितपणे पाहत राहते..ही सात-आठ ओळींची गोष्टही दोन पिढ्यातल्या बदलत्या भावविश्‍वाचं नेमकं वर्णन करणारी... कुठून सुचतं हे सगळं सोशल मीडियात वावरणा-यांना, हेही नवं कोडं! अनेक जण "ती' सध्या काय करते, यापेक्षा "ही' सध्या काय करते, हे जास्त महत्वाचं असल्याचं काहीशा उपरोधिक, पण सावध शैलीत सांगत आहेत. आपला मोबाईल "अंडर व्हिजिलन्स' असण्याच्या धास्तीतून आलेली असुरक्षितताही त्याला कारणीभूत असावी! त्यातच "ही'च्या आग्रहामुळं हा सिनेमा बघायला जायची एखाद्यावर वेळ आली अन्‌ तो संपेपर्यंत "ही' पडद्यापेक्षा सारखं त्याच्याकडंच बघत असेल, तर आपण "त्या' गावचेच नाही, अशा स्थितप्रज्ञपणे बसून राहण्यासाठी जे उच्चप्रतीचं कौशल्य लागतं, ते साधनेशिवाय लाभणं केवळ अशक्‍य! ज्यांच्या नॉस्टॅल्जियात अशी कुणी "ती' रुंजी घालत असेल अन्‌ तरीही जे निर्विकार असतील, त्यांनी एक तर अशी साधना साधली असेल अथवा ते "ही'च्याशी सर्वार्थाने एकरुप झाले असतील.या दोन्ही गोष्टी तशा असामान्यत्वाची झलक दाखवणा-या...

         "ती' असते कुठं, करते काय, असे प्रश्‍न पडणा-या आजच्या प्रौढ पिढीच्या हाती "त्या' काळी ना मोबाईल होते, ना व्हाटस्‌ ऍप, फेसबुक..अनेकांना या गोष्टी तेव्हा नव्हत्या,याची खंतही असेल. "त्या' गरजेच्या वेळी असलं "माध्यम' असतं, तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं, असंही अनेकांना उगाच वाटू शकतं. अर्थात ही "माध्यमे' तेव्हा नव्हती, यात धन्यता मानणा-यांचीही कमी नसेल अन्‌ त्यात अनेकांच्या "ती'चाही समावेश असू शकतो! पण, शालेय अथवा महाविद्यालयीन जीवन पंचवीस-तीस वर्ष मागे सोडलेली पिढी नव्या माध्यमांतही चांगलीच रमली आहे, हे जास्त महत्वाचं. कुठून कुठून मोबाईल नंबर मिळवून अनेक जुन्या मित्रांचे, शाळा- महाविद्यालयांचे, विशिष्ट वर्षाच्या बॅचचे व्हाटस्‌ ऍप ग्रूप तयार झाले आहेत. अनेकांच्या फेसबुक वॉलवरही जुन्या मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमलेला असतो. तिथं शुभेच्छा, गप्पा अन्‌ माहितीची देवाणघेवाणही सुरू असते. त्यातूनच मग शाळा-महाविद्यालयांमध्ये जुन्या वर्गांचे गेट टुगेदर होतात. त्या निमित्ताने काहींना सध्या "ती' काय करते, हेही ब-यापैकी कळतं. तरीही व्हाटस्‌ ऍप, फेसबुक अथवा अशा गेट टुगेदरमधून होणा-या भेटीगाठींमध्ये अशा सगळ्यांनाच "ती' भेटते असंही नाही. संसाराच्या दुनियादारीशी इमानदारी राखंत अशांचं मन "ती'च्या ठावठिकाणाचा वा नुसतंच कुठंतरी सुखात असण्याचा ठाव घेत राहतं...

       "ती'चा शोध ज्याला घ्यायचा त्यानं जरुर घ्यावा, पण त्यातून आपल्या नव्या पिढीच्या हाती निरपेक्ष नि कसदार संबंधांचा ठेवा देण्याची कलाही साधता आली पाहिजे. ज्यांची मुलं-मुली आता "त्या' वयात आली असतील, येत असतील अशांनी त्यांच्याशी वागता-बोलताना आपल्या तरुणपणातल्या मानसिक अवस्थेची आठवण ठेवली, तरी आई-बाप नि मुला-मुलींमध्ये मैत्रीचा नवा बंध निर्माण होईल. कारण "ती' सध्या काय करते? याच्या उत्तराचा शोध कदाचित क्षणात लागेलही अथवा तो आयुष्यभर सुरूही ठेवता येईल...प्रश्‍न आहे तो,या स्वप्नरंजनाच्या पलीकडं जावून खऱ्या आयुष्यात कुठं थांबायचं हे ओळखण्याचा. भूतकाळातल्या सुखस्मृतीत काही काळ रमलंही पाहिजे, अनेकदा त्यातून नवं काहीतरी हाती लागतं. फक्त तिथं रेंगाळायचं किती, हेही महत्वाचं."तिचा' वा "त्याचा' शोध घ्यायला, एकमेकांविषयी जाणून घ्यायला कुणाची काही हरकत असण्याचं कारण नाही, पण त्यातून पुढं तयार होणाऱ्या नव्या नात्याला भावनिक नि वैचारिक परिपक्वतेची फळं लगडली, तर त्या शोधाला काही अर्थ आहे...

  -विजय बुवा


   




        सकस विचारांच्या मातीत मनाची मशागत झाली की अशी फळं आपोआप हाती येतात. 'दिल-ए-नादॉं तुझे हुऑ क्‍या है...' असं विचारणाऱ्या गालिबपासून मन मोकाट मोकाट त्याच्या ठाई ठाई वाटा...असं मानणा-या बहिणाबाईंपर्यंत अनेकांनी मनाला मेंदूवर स्वार होऊ देऊ नका, हेच तर सांगितलंय.या मनावर स्नेहाचा, गोडीचा संस्कार करणा-या संक्रांतीपासून अदृश्‍य ओढीच्या व्हॅलेन्टाईनपर्यंत.."ती' सध्या काय करते? यांसारख्या आयुष्यात पडणा-या सा-या प्रश्‍नांचे "उत्तरा'यण अशा विवेक-विचारांच्या प्रगल्भतेनेच पूर्ण होऊ शकते.आपल्याला गवसलेल्या शुभ्र वास्तवाच्या हातात हात घालून फुलांची वाट चालायची की आपल्यापासून दुरावलेल्या नि आभासी बनलेल्या गुलाबी स्वप्नाचा काटेरी पाठलाग सुरू ठेवायचा..? काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस...





Thursday, 17 November 2016

World Philosophy Day 2016



न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।


संस्कृती,धर्म,तत्वज्ञान,अध्यात्म ही मानवाच्या विकासाची परिमाणं आहेत.
अज्ञानाच्या अंधकारातून पुढे जाण्यासाठी विचारांची मांडणी करून मानवाला सुजाण,सुसंस्कृत,प्रगल्भ जीवन बनवण्यासाठी तत्वज्ञानाचा 'दिपस्तंभ' नेहमीच मार्गदर्शक ठरत आहे.तत्त्वज्ञानाच्या आजच्या व्याप्तीमध्ये तत्त्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होतो. तत्त्वज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान.

the study of the fundamental nature of knowledge,reality and existence, especially when considered as an academic discipline is called as Philosophy ( philosophia - Love of Wisdom )




भारतीय तत्वज्ञान

भारतीय तत्वज्ञान हा एक मोठा असा ज्ञानसागर आहे भारतीय साहित्य हे अनेक ज्ञानशाखा,कला,विद्या यांची खाण आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेखनीय असे आपले वैदीक साहित्य येते ज्यात जगातील सर्व ज्ञानशाखा तर सापडतातच पण ह्या जगाची उत्पत्ती, ईश्वराविषयीचे तत्वज्ञान, व ह्या जगात जगण्याविषय़ीचे व्यावहारिक ज्ञानही मोठ्या प्रमाणात सापडते.
प्राचिन साहित्य हे वेद, ब्राह्मणके, अरण्यके, उपनिषदे, वेदांत, पुर्व व उत्तर मिमांसा, षडदर्शने, त्यानंतर पुराणे, व महाकाव्ये महाभारत, रामायण इ. हे अंतर्भुत होतात.भारतीय संस्कृतीत एकूण बत्तीस विद्या व चौसष्ट कला प्रमुख आहेत.

आर्य म्हणजेच उत्तम, सर्वश्रेष्ठ असा होय व त्या लोकांची भुमी म्हणजेच आर्यावर्त होय़. प्रथम ऋग, नंतर गायनात असलेले मंत्र म्हणजेच सामवेद व त्यानंतर अथर्व व यजुर्वेद. 
ह्या वेदांच्या निर्मिती नंतर त्या वेदांचे अर्थ व स्पष्टीकरणे आपापल्या मतानुसार मांडण्याची परंपरा निर्माण झाली त्यातुन प्रथम उच्च विद्वान ब्राह्मणांनी रचल्याने 'ब्राह्मणके' अशी संज्ञा प्राप्त झाली. नंतर अरण्यात राहाणार्या ऋषींनी लिहिलेली अरण्यके, यानंतर उपनिषदे म्हणजेच ही प्रश्नोत्तर स्वरुपात आहेत. शिष्य प्रश्न विचारतात गुरु अथवा अध्यात्मिक उन्नत प्रश्नांची उत्तरे देतात अशी ह्या उपनिषदांची रचना आहे. उपनिषदांनंतर पुर्व मिमांसा व उत्तर मिमांसा असे दोन वेदांताचे भाग निर्माण झाले. जे जिवनाकडे पाहण्याची योग्य दृष्टी देते ते दर्शनशास्त्र..
त्यानंतर तत्वज्ञानाचा उच्चांक गाठणा-या  दर्शनशास्त्रांची निर्मिती झाली.

१) वेदान्तदर्शन    - आद्यशंकराचार्य, व्यास (उत्तरमीमांसा) (ब्रह्मसूत्र)  - ज्ञानमार्गाला प्राधान्य
२) पूर्वमीमांसा    - जैमिनी, प्रभाकर,मंडनमिश्र,कुमारील भट्ट - कर्ममार्गाला प्राधान्य
३) सांख्यदर्शन    - कपिलमुनी - विश्व ही नैसर्गिक प्रक्रिया इ
४) योगदर्शन      - हिरण्यगर्भ (योगसूत्र-पतंजली)
५) न्यायदर्शन     - गौतमऋषी - System ऑफ Logic
६) वैशेषिक दर्शन  - जगत हे परमाणूंनी भरलेले आहे.
७) बौद्धदर्शन       - बौद्ध - ईश्वर न मानणारे, पुनर्जन्म मानणारे 
८) जैनदर्शन        - २४ तीर्थंकर
९) चार्वाकदर्शन     - ईश्वर,वेद,पुनर्जन्म न मानणारे




ह्यानंतर येतात ती अठरा पुराणे,
ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव/वायु, श्रीमद्भागवत, देवीभाद्भवत, नारद, मार्कण्डेय, अग्नेय, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वाराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड, ही अठरा पुराणे ही पुराणे गोष्टीरुप असलेली विश्वकोष आहेत. ज्यात प्रचंड माहितीचा सागर आहे.
त्यातील कथा गौण आहेत त्यांचे 'सारांश' हे मुख्य आहेत.

  •     जंगली लोकांना मानवी जीवनाचे सूत्र समजावणारे मनू
  •  संपुर्ण भारतवर्षात 'वैदिक संस्कृतीचा' निर्घोष करणारे दिग्विजयी श्रीमदआद्यशंकराचार्य
  • Father of Indian Philosophy- याज्ञवल्क्य
  •  Father of Indian Soil- कश्यप
  •     संपुर्ण मानवी समाजाचा आणि मानवाच्या भौतिक आणि अध्यात्मिक जीवनात समन्वय घडवुन आणणारे महर्षी अत्रि
  •     वशिष्ठ,विश्वामित्र,जमदग्नी..
  •    पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणारे पराशर
  •      जगात असा कोणताच विचार नाही जो ह्यांनी मांडलेला नाही ज्यांच्यामुळे विचारांची महत्ता वाढली असे वाङमयपुरुष म्हणजे व्यास
  •   वेदांतील विचार प्राकृत भाषेत पोहोचवणारे व सामान्य माणसांपर्यंत समजावणारे..   'निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम'
  •   स्वामी दयानंद सरस्वतींनी वैदिक साहित्याचा जीर्णोद्धार केला
  •      संपुर्ण जगाला पुन्हा एकदा भारतीय संस्कृति आणि तत्वज्ञानाची ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद
  •     संकुचित संकल्पनांना नाकारणारे, स्वतंत्र विचारांचा नवा मार्ग दाखवणारे J.Krishnamurti.
  •    भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक,विदवान आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
  •  संपुर्ण जगासमोर अवतारवाद मांडणारे, Activist Philosopher, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले
     असे कित्येक आचार्य,महर्षी,संत,तत्वज्ञ यांचे भारतीय विचारधारेत महान योगदान आहे.








 पाश्चात्य तत्वज्ञान





 १) प्राचीन दर्शन - ग्रीक

 २) मध्यकालीन दर्शन - आठव्या शतकात साधारण ह्याची सुरवात झाली
    ह्यात विश्वास आणि बुद्धीने प्रचलित सिद्धांत ह्यांची यथार्थता पाहण्यास सुरवात झाली.
    Renaissance ह्याच  काळात झालं.
    १५व्या शतकात ह्या मध्यकालीन दर्शनाचा काळ समाप्त झाला.

 ३) आधुनिक दर्शन - साधारण ह्याची सुरवात सोळाव्या शतकात झाली
   
     विवेकवाद (Rationalism)  -  Descartes,Spinoza,Leibniz
     अनुभववाद (Empericism) -  Berkeley,Hume,Locke
     प्रत्ययवाद (Idealism)        -  Kant,Hegel,Schopenhauer





          
           पाश्चात्य तत्वज्ञानाची सुरवात तशी ग्रीक तत्ववेत्त्यांपासून मानली जाते.
  •   सृष्टीचे मूळ तत्व Thales ने जल ,Anaximander ने अव्यक्त प्रकृति तर Anaximenes ने वायू आहे असे विचार मांडले.
  • गणितीतज्ञ Pythagoras यांच्या विचारानुसार ह्या सृष्टीत अनुरूपता आणि सामंजस्य आहे व ती संगीतात प्रसिद्ध होते असे विचार मांडले.
  •  त्यांनतर नीतिमत्तेला महत्व देणारा, सत्याचा उपासक,संवादाला लोकशाहीचा आत्मा माणणारा, बुद्धी चालविण्यास चालना देणारा एक महान तत्ववेत्ता म्हणजेच Socrates जीवनमूल्यांशी तडजोड न करता 'मृत्युदंड स्वीकारणारा Socrates महान मार्गदर्शक आहे
          The unexamined life is not worth living - Socrates
  •      आधुनिक ज्ञानमीमांसा करणारा Plato. त्याने लिहिलेला 'रिपब्लिक' संवाद आजही मार्गदर्शक आहे
  •     त्यानंतर Aristotle यांनी भौतिकी, आध्यात्म, कविता, नाटक, संगीत, तर्कशास्त्र, राजनीति शास्त्र, नीतिशास्त्र, जीव विज्ञान याविषयी विचार मांडले.
  •     श्रद्धा आणि बुद्धी यांचा मेळ घालणारे Thomas Aquinas
  •       ख्रिस्ती धर्मसुधारणेला चालना देणारे Erasmus
  •   विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे Bruno
  •       मुत्सद्दी व तत्वज्ञ Francis Bacon
  •  परंपरागत भ्रांत समजुतींचा विरोध करून नव सिद्धांत प्रस्थापित करणारा आणि त्या सिद्धांतासाठी मृत्यु स्वीकारणारा Galileo
  •       आधुनिक तत्वज्ञानाचे जनक René Descartes
  •     ईश्वराच्या तत्कालीन कल्पनांना छेद देऊन ईश्वराचे अस्तित्व बुद्धीने सिद्ध करणारा Spinoza
  •     उदारमतवादाचा आग्रह ठेवणारा John Locke
  •      'Monad' ही संकल्पना देणारा बुद्धिवादी तत्वज्ञ Leibniz
  •   आधुनिक 'चिद्'वादाचा जनक Berkeley
  •      परंपरेच्या विरुद्ध लढा देणारे Voltaire
  •     बाह्यवस्तू म्हणजे 'संवेदन समूह' आणि आत्मा म्हणजे 'अंतर्संवेदनांचा समूह' असं विश्लेषण करणारा, इंग्लंडचा   इतिहासकार, 'संशय'वादी तत्वज्ञ David Hume
  •       फ्रेंच राज्यक्रांतीत सिंहाचा वाटा उचलणारे Rousseau
  •       त्यानंतर Critique of Judgment,Critique of Practical Reason,Critique of Pure Reason या  संकल्पना समजावणारे, मानवाच्या संदर्भात सर्वच क्षेत्रात योगदान देणारे महान तत्वज्ञ Immanuel Kant  
  •       अर्थशास्त्रात क्रांती करणारे आणि साम्यवादाचे जनक  Karl Marx
  •       आपल्या प्रखर बुद्धिमतेने मानवी जीवनाच्या अनेक अंगांवर प्रकाश टाकणारे Bertrand Russell




वर्षानुवर्षांच्या या सर्व विचारमंथनातूनच आजच्या मानव समाजाची घडण झाली आहे त्यात तत्वज्ञानचं मोठं योगदान आहे
भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाच्या संघर्षापेक्षा 'समन्वय' साधून मानवी जीवन उन्नत होऊ शकते.   








Thursday, 14 July 2016

नित्यनेमे वाहे 'श्रद्धे'ची ही गंगा.. तुझ्या 'अंत'रंगा स्पर्शू पाहे..





विज्ञानाचा आणि अध्यात्माचा मिलाफ घडवून आणणारी ही वारी...रिंगण, वारी, घोडा नाचवीत मजल करीत पंढरीची वारी करण्याची परंपरा जेवढी जुनी तेवढीच अभंगांच्या वाटेने विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपराही जुनी आणि रसाळ. जसा ज्याचा  ध्यास तसा त्याचा विठ्ठल आणि म्हणूनच पंढरीच्या वारीसाठी भले दिंड्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर लाखो वारकरी निघाले तरी त्या पंढरीच्या वाटेवर मात्र जो तो आपापल्या विठ्ठलासोबत असतो एकेकटा..
वारी म्हणजे यात्रा आणि दिंडी म्हणजे त्यातील पथक... वारीची प्रथा जुनीं असली तरी दिंडी ही संत ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्यापासून सुरू झाली. वारीतील दिंड्यांची एक शिस्तबद्ध अशी रचना असते. वैदिक धर्मा मध्ये ज्याप्रमाणे गीता उपनिषद ब्रम्हसूत्र या प्रस्थानत्रयीचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच वारकरी संप्रदायात श्रीज्ञानेश्वरी, श्रीभागवत, श्रीतुकारामगाथा या प्रस्थानत्रयीचं महत्त्व आहे. चालताना, भजन म्हणताना पावली खेळली जाते. यातून पायांच्या स्नायूंना अशाप्रकारे व्यायाम मिळतो कि इतक्या दिवसांच्या चालण्याचा थकवा दूर होतो. या पावल्या जणू शरीराला चार्जिंग देण्याचे काम करतात. यात सर्वांत लोकप्रिय खेळ असतो तो फुगडी... फुगडी झाल्यावर फुगडी खेळलेले वारकरी एकमेकांच्या पाया पडतात...
             पंढरीच्या लोकां नाही अभिमान पाया पडे जन एकमेकां ॥
वारीतला सर्वांत आकर्षणाचा भाग म्हणजे रिंगण. परंपरेनुसार रिंगणाच्या ठिकाणे ठरलेली असतात. खेळ खेळताना प्रत्येक वारकरी हरिपाठात, नाथांच्या भारुडात, तुकोबांच्या अभंगात, माऊलींच्या विरहिणीत, मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगात तल्लीन होत असतो.
           नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा रेखेळीया सुख देईल विसावा रे
भरगच्च भरलेल्या सभागृहात रंगमंचावर विठ्ठलनामाचा गजर टिपेला पोहोचला  असताना तिथे धावून येणारा विठ्ठल जेवढा जनात असतो तेवढाच प्रत्येकाच्या मनातही असतो..



टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग

दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाउ नाचु सारे होउनी निःसंग

जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देउनी हा बोलतो मृदंग

ब्रह्मानंदी देह बुडुनीया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग

 


Thursday, 18 February 2016

जल स्थल अंबर दे ललकार ! शिवछत्रपतींचा जयजयकार !!





काळाच्या पेठा-यात दडलेली रत्ने ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. महाराष्ट्राच्या मातीतील 'नर'रत्नांची सर्वांनीच दखल घेतली आहे. अभंगापासुन औद्योगिकतेच्या क्षेत्रात, पाडगावकरांच्या कवितेपासून रंगभूमीच्या कलाकारांपर्यंत... या नररत्नांमध्ये शोभुन दिसणारा शिरोमणी म्हणजे 'शिवाजी महाराज..'
आयुष्यभर जिवाशी खेळणारे एक 'अष्टपैलू' खेळाडू, दुर्जनांचा कर्दनकाळ स्वरुप 'वज्र', 
संतांच्या भुमीतील आधाररुपी वृक्ष आणि प्रेमळ जनतेच्या 'मनामनांत राज्य' करणारा ह्रदयसम्राट..
म्हणुनच तर शिवाजी महाराजांवरील ग्रंथसंपदा विपुल नसली तरी, 'शिवरायांविषयी माहीती नाही' असा एकही नाही.. हेच ह्या शिवचरीत्राचे मोठेपण आहे...





दिपस्तंभासारखी उभी आजही असे शिवशाही..
लोकशाही ही बनुन नाचते पुंजपतींची झुंडशाही..


पुन्हा घेऊनी संकल्प हाती, जेव्हा पूर्ण करू निरपेक्ष कष्ट..
तेव्हाच मिळतो हक्क म्हणाया....
  "महाराज...जय महाराष्ट्र..!"