होतात देऊळे नष्ट
होतात देवता भ्रष्ट
गो-ब्राह्मण ओरडीती
धर्मावरती संकष्ट
न्याय नीती उरली नाही
सारेच भोगती कष्ट
हा घोर मांडीला ज्यांनी
त्यांचिया पुढे जावोनी
देशाभिमान सांडोनी
प्रेमाच्या मंगल माते!
लववेना हे शिर माते !!
तू सांग ?तुझ्या चरणाशी हि तोडून ठेवीन मान
तू सांग ? तात चरणाशी कापोनी ठेविन मान
देश,देव,धर्मासाठी खड्गावर ठेवीन मान
परि परके सत्ताधारी
गृही शिरोनी झाले वैरी
बघतांच तयाना भारी
सक्रोध वृत्ती मम होते!
लववेना हे शिर माते !!
मी म्हणता "नाही..नाही..!" दरबारी नेले आई !
जो आत शिरोनी पाही, वर चढोनी गेली भुवई !
मुज-याला हात न वाही शिर लववू शकलो नाही !
हे सिंहासन कोणाचे ?
हे वैभव तरी कोणाचे ?
काहूर मनी प्रश्नाचे
अपहारी नृपसत्तेते!
लववेना हे शिर माते !!
एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो !
ढळाढळा आई गे ! रडतो त्वेषाने आणि संचारतो !
झोपेत देशबंधुंच्या दुख्खाने दचकून उठतो !
बोलते भवानी “उठ ?”
बोलते जन्मभू “उठ ?”
“धर समशेरीची मूठ !”
अवमानून त्या आज्ञेते!
लववेना हे शिर माते !!
देशाचा राजा नाही, राजनिष्ठ राहू कैसा ?
धर्माचा राजा नाही, राजभक्त होऊ कैसा ?
या उलट्या बोध गळाते, जीवनाचा अडके मासा !
ज्या शिरी भार देशाचा
ज्या शिरी भार धर्माचा
कर्तव्ये वाहायचा
विसरुनी देशधर्माते !!
लववेना हे शिर माते !
स्वाभिमान सुटला ज्यांचा, देशभक्ती सुटली ज्यांची
कुलकीर्तीचा इतिहास, स्मृती देईल उज्वलतेची
वाढवोत ते ते शोभा,दास्याच्या दरबाराची
उद्दाम म्हणो कुणी माते,
कि करोत उपहासाते
परि जागोनि स्वत्वाते
हिंदू द्वेषी तख्ताते !
लववेना हे शिर माते !!
सुलतान जाहला क्रुध्द , उमराव जाहले क्रुध्द
जातिवंत झाले स्तब्ध, जनकही होय हतबुध्द
परि तुझी आणि अंबेची, शिरी कृपा असावी शुध्द
मावळचे जमवुनी भाई
स्थापीन मराठेशाही
हलवीन आदिलशाही
बोलतो सत्य जे गमते!
लववेना हे शिर माते !!
कवितेच्या काही ओळी मुळ स्वरुपात नाहीए,असे वाटते.श्री.तिवारी यांच्या पुस्तकातील हा पोवाडा आहे.अजुनही अंगावर शहारा येतो. मी ८-९ वर्षांचा असतांना (१९६०) हे पुस्तक आमच्याकडे होते.अतिशय सुंदर पोवाडे.पुन्हा असे काव्य शक्य नाही. राजन लंके, नाशिक 9423963938
ReplyDeleteमुळ पुस्तकाच्या इतक्या वर्षांपासून शोधात आहे.हे जग सोडून जाण्या अगोदर पुन्हा एकादा वाचण्याची अनिवार तळमळ आहे.
ReplyDeleteमराठ्यांची संग्राम गीते या पुस्तकात हे गीत आहे
ReplyDelete