“जो मनाने वाईट आहे
तो काशीत गेला तरी त्याचा नरक चुकणार नाही आणि खरा भक्त कुठेही मेला तरी नरकात जाणार
नाही”, असे ठामपणे सांगणारा प्रबोधक संत… अंधश्रद्धेवर प्रकर्षाने हल्ला चढवणारा बंडखोर
कवी म्हणजे संत कबीर. जन्म कुठल्या कुळात झाला हे महत्त्वाचे नाही तर माणूस आपल्या
‘कर्माने श्रेष्ठ होऊ शकतो’ हे दाखवून देणारे एक ‘प्रभावी विणकर’... ईश्वरनिष्ठा, प्रेम,
अहिंसा हि ‘मूल्ये’ कबीराच्या काव्यातून व्यक्त होताना दिसतात. कबीराच्या कवितेत 'राम',
'हरि', 'अल्ला रहिम' हे शब्द अनेकदा येतात. कबीराचा ईश्वर ‘एक’ आहे आणि तो सर्व ‘सृष्टीत
व्यापून’ राहिलेला आहे. जातिभेद, धर्मभेद यापलीकडे जाणारा तो एक 'सत्यनिष्ठ' अनुभव
आहे.
ज्याला कागदाचा, शाईचा
स्पर्श कधीही झाला नाही.. ज्याने कधी लेखणीही हाती घेतली नाही.. भक्तीच्या जोरावर तो
देखील महापुरुष होऊ शकतो हि घटना देखील स्फूर्तीदायक आहे. वैचारिक प्रवास, भटकंती यांतून
मिळालेले ज्ञान हेच त्यांचे विद्यापीठ होते.
पोथी पढ़ पढ़
जग मुआ, पंडित भया न कोए |
ढाई अक्षर
प्रेम का, पढ़े सो पंडित होए ||
अशी पंडितांची क्रांतिकारी
व्याख्या सांगणारा तत्वज्ञ. सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत त्यांनी
अध्यात्माचे ‘ज्ञान’ दिले. हिंदू आणि सुफी सिद्धांताच्या खुणा त्यांच्या काव्यात उमटलेल्या
दिसतात.
हिंदू - मुस्लिम ऐक्यातून
'राष्ट्रीय ऐक्य ' जपणारा हा अनोखा देवदूत. त्यांचे काव्य 'कबीरबानी ' या नावाने ओळखले
जाते. ज्यात एक विलक्षण साधेपण आहे, आंतरिक अनुभव आहे. लोकांच्या मनाशी संवाद साधणारा
हा अनोखा संतकवी..
मना, रे कुठे उतरून
जासी?
पुढे पंथ वा पथिक हि
नाही गाठ ना मुक्कामासी ;
नसे नीर, नावाडी, नौका, कुणी न दोर खेचाया,
गगन, धरा, कालगती नाही,
नसे तीर उतराया ;
तनमन नाही, मीपण नाही,
शून्य न तू शोधावे,
तो बलवंत घटातच आहे,
शरण तयाला जावे ;
विचार करुनी पहा मना
तू, अंत कुठेही नाही,
कबीर म्हणे तू सोड
कल्पना, असशि तसा तू राही.
No comments:
Post a Comment