Thursday, 19 January 2017

माणसे जन्माला येतात पण 'माणुसकी‘ निर्माण करावी लागते..

वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.


खांडेकरलिखित पुस्तके

    अजून येतो वासफुलांन, अमृतवेल, अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर : व्यकी आणि विचार, उल्का (१९३४), उःशाप, कल्पलता, कांचनमृग ( १९३१ ), कालची स्वप्ने, कालिका, क्रौंचवध ( १९४२ ),  घरटे,  घरट्याबाहेर, चंदेरी स्वप्ने, चांदण्यात, जळलेला मोहर ( १९४७ ), जीवनशिल्पी, झिमझिम, तिसरा प्रहर, तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३, ते दिवस, ती माणसे, दंवबिंदू, दोन ध्रुव ( १९३४ ), दोन मने ( १९३८ ), धुके, नवा प्रातःकाल, पहिली लाट, पहिले पान, पहिले प्रेम (१९४०), पाकळ्या, पांढरे ढग (१९४९), पारिजात भाग १, २, पाषाणपूजा, पूजन, फुले आणि काटे, फुले आणि दगड, मंजिर्‍या, मंझधार, मंदाकिनी, मध्यरात्र, मृगजळातील कळ्या, ययाति, रंग आणि गंध, रिकामा देव्हारा (१९३९), रेखा आणि रंग, वामन मल्हार जोशी: व्यक्ति-विचार, वायुलहरी, वासंतिका, विद्युत्‌ प्रकाश, वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८ ), समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे), समाधीवरील फुले, सहा भाषणे, सांजवात, साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे), सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी स्वप्ने भंगलेली, स्त्री आणि पुरुष, हिरवळ, हिरवा चाफा ( १९३८ ), हृदयाची हाक ( १९३०), क्षितिजस्पर्श.

 
पुरस्कार आणि सन्मान

    वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
    साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)
    पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
    ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी
    कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली.



१) जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही !प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो; पण तो दुसर्‍याला लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी!

२) मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य,असे हे जीवन !  लहानपणाच्या आठवणी किती नाजूक मोहक, पण किती बहूरंगी असतात !जणू काही मोरपिसच !

३) शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूनांच साधते!

४) आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा ?

५) प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं ते प्रेम कुणावरही असो ते कशावरही जडलेल असो मात्र ते खंरखुर प्रेम असायला हवं !ते हृदयाच्या गाभ्यातुन उमलयाला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नव्हे. निरहंकारी प्रेम विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करु शकतो ! प्रिय व्यक्तीला तिच्या दोषासहं स्वीकार करण्याची शक्ती खर्‍या प्रेमाच्या अंगी असते - असली पाहिजे !

६) भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरुड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे. एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं,ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्‍या स्वप्नामागनं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!

७) समुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.

८)  माणूस

माणूस हा झाडासारखा आहे.

तो सुखासुखी वठत नाही

तो ओलावा शोधत राहतो

त्याचं खर प्रेम असतं - जीवनावर

मग ते जीवन कितीही विद्रूप,

कितीही भयंकर असो !

कारण मृत्युनंतरच्या अंधारात

कुठलीही चांदणी चमकत नाही

हे तो मनोमन जाणतो...

९) रोजनिशी - या डाय-या नाहीत..आपल्या आयुष्यात जि फुले फुलली त्यांचे अत्तर साठवुन ठेवलेल्या कुप्या आहेत या..

१०) लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते!  आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच...

११) कळ्या फ़ुलल्याच नाहित तर जग सुगंधाला मुकेल.

१२) मित्राच्या मॄत्युपेक्षाही मैत्रिचे मरण असह्य असते

१३) माणसे जन्माला येतात...पण माणुसकी निर्माण करावी लागते.

१४) या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन येतं!  स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे, पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे - हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.

१५) आपण सदैव आत्मकेंद्रित असतो.नेहमी केवळ स्वत:च्याच सुख-दु:खाचा विचार करतो.त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं !तू दु:खाच्या पिंज-यात स्वत:ला बंदिवान करुन घेऊ नकोस. त्या पिंज-याचं दार उघडं,पंख पसर आणि आकाशात भरारी मार.जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार..

१६) जीवन नेहमीच अपूर्ण असतं. ते असं असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे...

१७) जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं!

१८) त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , ते रणांगण आहे.






                                    विष्णू सखाराम खांडेकर  यांस जन्मदिनी विनम्र अभिवादन !

No comments:

Post a Comment