कचकड्याच्या 'मायावी' दुनियेत विश्वास,कृतज्ञता,प्रामाणिकपणा,आदर या आदर्श मूल्यांना फारसा अर्थ नसतो आणि वाव तर अजिबात नसतो.स्पर्धेच्या रानटी इर्षेने इथला हरेक जीव प्रतिस्पर्ध्याला पराभूत करूनच आपला मार्ग प्रशस्त करीत राहतो.जिंकणे आणि आपले स्थान सलामत ठेवणे हाच मर्यादित मंत्र नसानसात भिनलेल्या या रूपेरी दुनियेत जंगलचा कायदा निरंकुश पणे लागू आहे.
पण अशाही स्वार्थी ,नकारात्मक दुनियेत काही जीव असे असतात ज्यांना या कला नगरीत राहून या साऱ्या षडरिपुंपासून दूर राहून आपली कला कारकीर्द बहरवता येते.त्यांच्या या वाटचालीत त्यांना पावलोपावली अडचणी येतात,समोरचा यशाचा मार्ग अचानकपणे धूसर होत जातो, कर्तृत्व वारंवार सिद्ध करण्याची 'शिक्षा' मिळत जाते, हाताशी आलेलं यश/संधी पा-यासारखी निसटून जाते,बरं हे करणारी काही नियती नसते ती असतात तुमच्या आमच्या सारखी हाडामासाची माणस.कां ? कां ? याचे उत्तर शोधण्यात फारसा अर्थ उरत नाही. स्वीकारायच आणि वाट चालत राहायचं मग यशाचा मार्ग दिसतोच.. अश्या प्रख्यात गायिका म्हणजेच सुमन कल्याणपूर.
ढाका येथे २८ जानेवारी १९३८ साली सुमन हेमाडी यांचा जन्म झाला. १९४३ साली त्यांनी मुंबईत येऊन संगीताचे रितसर प्रशिक्षण घेतले. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद सुमनताईंच्या आवाजाने प्रभावित होऊन HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मो.शफी यांनी संगीत दिलेल्या "मंगु" (१९५४) या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले.गाण्याचे बोल होते "कोई पुकारे धीरे से तुझे"
गायिका कल्याणपूर यांनी गेल्या तीन दशकांच्या सुरेल प्रवासात १३ भारतीय भाषांमध्ये ३५०० हजाराहून अधिक गाणी गायिली आहेत. हिंदी पार्श्वगायन क्षेत्रात कर्तृत्व सिध्द करून दाखविले आहे. मराठी सिनेगीत, भावगीत, अभंग, दर्यागीते, हिंदी, गुजराती, भोजपुरी, राजस्थानी, अवधी, मगधी, छत्तीसगढसह विविध भाषांतील सिनेगीते मधूर गायनाने सजवली आहेत. 'नंदाघरी नंदनवन फुलले, सावळ्या विठ्ठला, झिमझिम झरती श्रावणधारा, घाल घाल पिंगा वाऱ्या, केशवा-माधवा, पाखरा जा दूर देशी आणि निंबोणीच्या झाडामागे' ही गीते लोकप्रिय ठरली आहेत. 'न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया,ठहरीए होश मै आ लू, तो चले जाईएगा,तुमसे ओ हसीन कभी मोहब्बत न मैने करनी थी,परबतो के पेडो पर शाम का बसेरा है,अज हु ना आये बालमा,तुमने पुकारा और हम चले आये,मेरे मेहबुब न जा,नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे,आपसे हमको बिछडे हुए,चले जा चले जा..जहां प्यार मिले,मन गाए वो तराना,दिल ने फिर याद किया' या आणि असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीहि गाजवली होती.
आपल्या जीवनात सर्वोच्च स्थानावर असतानाही त्यांनी प्रत्यक्ष जीवनात मात्र एकप्रकारचा साधेपणाच जपला..त्यांनी ना कधी आपल्या यशाचा गर्व केला, ना कधी मागे राहिल्याबद्दल कुठेही नाराजी व्यक्त केली.
संगीताला समर्पित जीवन जगणा-या 'गान'साम्राज्ञीस जन्मदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment