केवढासा तो जीव लोभसवाणा.. चेह-यावर समाधानाचं हसू आलेलं.. आईसमवेत शाळेतून घरी येताना आपल्याच मस्तीत रमलेला.. रस्त्यात जेव्हा पाहिलं तेव्हा थोडसं कुतूहल माझ्याही चेहऱ्यावर होतच म्हणा.. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जणू त्यांनी जगच जिंकलं असावं असं भासत होतं..
निमित्त होत ते शाळेत होणाऱ्या गणितातील विशेष परीक्षेचं.. मुळात असल्या 'एखाद्या' विषयात प्राविण्य मिळवता येणाऱ्या अशा काही परीक्षा असतात हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसतं ही गोष्ट वेगळीच.. असो ! चौकशीअंती समजलं की छोटू दुसरीला आहे.. घरची परिस्थिती छान आहे तशी.. मध्यमवर्गीयच.. तर होणाऱ्या परीक्षेसाठी शाळेतून पाठवण्यासाठी ५ जणांची निवड करण्यात आली आहे.. परीक्षेत प्रथम येणाऱ्यास १००००/-,व्दितीय येणाऱ्यास ५०००/-,तृतीय येणाऱ्यास ३०००/- रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे..
ह्याने न घरी विचारताच त्या परीक्षेसाठी स्वतःहुन नावं दिलेलं होतं (आजच त्या ५ विद्यार्थ्यांच्या पालकांना विध्यार्थ्यांना कुठे परीक्षेसाठी घेऊन जायचं आहे याकरिता बोलावलं होतं तेव्हा त्यांना हा ही परीक्षा देतोय हे समजलं..)
वर्गातून खाली उतरता उतरता तो आईला म्हणाला..
आई :मी खूप अभ्यास करेन,काही करेन..पण पहिलाच नंबर काढेन..
कौतुक आणि आश्चर्यमिश्रित चेहऱ्याने आईने विचारलं : ''का रे ? तू ही परीक्षा देत आहेस हीच मोठी गोष्ट आहे..''
छोटू : ''अगं ते पहिल्या क्रमांकाचं मिळणारं बक्षीस आणि बाबांचे थोडे पैसे त्यात टाकून आपण आपल्या घरात 'Refrigerator' घेऊयात ना.. म्हणजे जी भाजी खराब होते ना ती आपण त्यात ठेवू.. अन्नही वाया जाणार नाही.. आणि माझी 'कॅडबली'ही त्यातच ठेवता येईल..''
त्याच्या उत्तराने लहानपणी
मनाला भावलेल्या काही ओळी अचानकच नजरेसमोर तरळल्या..
‘’हमारे पीछे कोई आए ना आए
हमें ही तो पहले पहुँचना वहाँ हैं
जिन पर हैं चलना नई पीढ़ीयों को
उन ही रास्तों को बनाना हमें हैं I
जो भी साथ आए उन्हे साथ ले ले
अगर ना कोई साथ दे तो अकेले
सुलगा के खुद को मिटा ले अंधेरा
हमारी ही मुट्ठी में आकाश सारा
जब भी खुलेगी चमकेगा तारा II’’
परीक्षा होण्यास अजून अवकाश आहे.. यश मिळेल कि नाही हा नंतरचा भाग..
परंतु मिळालेल्या संस्कारात छोटू मात्र नक्कीच 'पास' झाला आहे..
यात मात्र काहीच शंका नाही..