Thursday, 22 June 2017

गर्दी.. !!


आपलं असंच असतं नेहमी.. काही मिळविण्यासाठी काय काय सोडावं लागतं, याचा विचार करावा लागतो. हिशोब केला तर जमवण्यातून मिळतो तोअनुभव’. लाखोंच्या संख्येत असूनही मधमाश्या  कधी भांडण करीत  नाहीत. त्याही जमवतातच ना अनुभवरूपी मध.

गर्दी.. !!

गर्दीला चेहरा नसतो तरी प्रत्येकजण येथे मुखवटा घेऊन वावरतात .स्वतःच वेगळेपण जपून गर्दीत मिसळणारेच खरे हुशार असतात. शांतता सगळ्यानांच हवीय. आम्ही कधी चुकतच नाही म्हणत  खरीअशांती’ हेच माजवतात. प्रत्येक गोष्टीची मापं काढायला नकोत. सहज अनुभवायच्या असतात काही गोष्टीगंमत’ म्हणून..

कुठे जायचंय ? किती दिवस ? Routine Life मध्ये स्वतःकडे पाहायला तरी वेळ मिळतो का ? -याचदा होतं असं; प्रत्येकाची  मनं वेगळी, विचार वेगळे. सोबत असूनही मन भलतीकडेच असतंस्वप्नांची रांग लागली की मग झोपेचं 'खोबरं' होतंखरंय ना ? नकोसं किती साठवून ठेवतो नकळत  आपण ? स्वप्नं पडतात तेव्हा तो 'कचरा' नकोसा होतो. कित्येक विचार येतात मनात, कधी अस्वस्थ,भयानक,आनंदी वगैरे ही भली मोठी रांग लागते!! 'विचारांची गर्दी' मोठा प्रवास असला तरी जगण्याला खतपाणी घालण्याचं काम इथूनच होत असतं.
रेल्वेने प्रवास कोण नाही करत ? ‘लोकलच्या गर्दी’विषयी मुंबईकरांपेक्षा जास्त कोण सांगू शकेल?  एक दिवस तिकिटाला भली मोठी रांग.. म्हणून एका फॅमिलीने त्यांच्या मुलाला कुपन्स आणायला सांगितले. तो मुलगा धावत गेला आणि लगेच तिकीट घेऊन येत होता. तेवढ्यात रांगेतला एक माणुस त्याला ओरडला, अरे बारक्या ! हे तुझं बरंय, आम्ही काय xxx आहोत? रांगेत उभं राहून तिकीट घ्यायला ? छोटा उत्तरला :  आहातच!  बघा जरा, मी तिकीट  नाही, कुपन्स घेतलेत त्यासाठी रांग नाही लावली तरी चालते. काहीही विचार न करता व्यक्त होणारी एखादी तरी व्यक्ती आपल्यात असतेच.

सिनेमांतील गर्दी पहिली की इथला चंदेरी चेहरा खूपच आकर्षक आहे,प्रत्येकाला तो नायक बनण्याची इच्छा असतेच.. लोकनायक बनण्याची,मेहनत करण्याची तयारी करणारे तसे दुर्मिळच..

‘काळोखातल्या गर्दी’च एक वेगळंच रूप पहायला मिळतं. चूकत नाही असं जगात कुणीच नाही. पण चुकांची पुनरावृत्ती करून निर्ढावलेले येथे सर्रास वावरतात. माणसं वाईट नसतात, पण अंधारात ती प्राण्यांपेक्षा भयंकर होतात.





'सोशल मीडिया वरची गर्दी' अस्वस्थ मनाला झोप येते तरी कुठे ? जगभराकडे पाहताना स्वतःकडे वेळ द्यायला, (सॉरी!) बघायला तरी निवांत वेळ काढतो का आपण ? कुणाचं काय तर कुणाचं काय ? आरोग्य, अध्यात्म, देशसेवा, सिनेमा, भाषा यापलीकडे जाऊन समजत असो वा नसो, आपला विषय असो वा नसो, खरं की खोटं.. याहीपेक्षा व्यक्त होण्याची घाई. इतकं ‘शहाणपण’ येतं तरी कुठून(!)? उत्तरं प्रत्येक प्रश्नांची असतात, पण आपण ती शोधतच नाही आणि पळवाट म्हणून 'Log Out' चा पर्याय स्वीकारतो. 

मागे एकदा गावच्या ठिकाणी पैसे संपल्याने ATM शोधत असताना एका मुलाला ATM मिळतच नव्हते. अचानक एक Bike वाला येतो अन् २ किमीं अंतरावर असलेल्या ATM मध्ये घेऊनही जातो आणि परत आणून देखील सोडतो.
तहान लागलेली असताना अचानक पाण्याची सोय होते, तसंच संकटात कुणीतरी मदत करणारं आपल्याल्या मिळतंच, फक्त ‘विश्वास’ हवा.

एकदा प्रवासातुन उतरत असताना  'मुख दर्शन व्हावे आता' ही ओळ गुणगुणत असताना आणि आणि समोरून 'ती'ने चेह-यावरील स्कार्फ त्याच क्षणी काढत मनापासुन हसावं. अनोळखी लोकांच्या गर्दीत आपलं असं म्हणून ‘जगण्याचं’ कारण मिळावं तेव्हा सुखावह वाटते ही गर्दी..
‘सुखसाधनांची गर्दी’ जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो ? रस्त्याचं काम सुरु असताना त्यातील एका स्त्रीचं मूल, झाडाला साडीचा पाळणा करून त्यात निवांत झोपलेलं पाहिलं की.. साधनांमध्ये सुख की समाधानामध्ये सुख ? हा प्रश्न सतावतोच.

पैसे नसताना भीक मागणाऱ्या माणसांची गर्दी आपल्याला दिसून येते. पण सत्तेसाठी मत मागून लुबाडणा-या, भावनांचं राजकारण करणा-या, काहीही न करता मदत मागणा-या, मुबलक असूनही  income Tax वाचवणा-या, मंदिरात फक्त मागण्यासाठीच जाणा-या -या भिका-यांच्या गर्दीकडे’ पाहिलं की मूल्यशिक्षणाचा पाठ मिळतो.

रस्त्यावरची गर्दी.. अन्याय पाहणारी गर्दी,अन्याय सहन करणारी गर्दी,अन्याय करणारी गर्दी, अनोळखी शहरात गेल्यावर वाटणारी, स्फोटातून होण्या-या नुकसानाची किचिंतही कल्पना नसलेली, हातावरच पोट चालणाऱ्या मनातील भीतीयुक्त गर्दी… अजून बरंच अंतर चालायचं आहे गर्दीचं ‘संगठन’ व्हायला. गणेशोत्सव, दहीहंडी, २६जुलै अशा कित्येक प्रसंगात दिसून येते ही गर्दी, गर्दीतील ही चित्र आश्वासक आहेत; अर्थात मूळ हेतू सुधारूनच..

प्रत्येकाचं असतं आपापलं आभाळं त्यात असते कित्येक माणसांची गर्दी.. आभाळाला सुद्धा विविध रंग दिलेत आम्ही, धर्मवादाला हिरवा रंग, जातीवादाला निळा रंग, भक्तीला भगवा रंग. पैसा,पद,प्रतिष्ठा यातच अडकलं तर स्वतःची खरी ओळख पटावी तरी कशी ? ‘माणुसकीच्या डोळ्यांनी’ पाहिलं की अगदी जसं असतं तसंच दिसतं निरभ्र आकाश..गर्दीत मिसळुन जाणारे बरेंच असतात. 'भूतकाळा'त न रमता पण 'वर्तमाना'त आपलं बोट धरून सोबत घेऊन गर्दीला आपलंस करत उज्ज्वल 'भविष्या'कडे घेऊन जाणारेच आभाळाच्या गर्दीत त्या ध्रुव ताऱ्यासारखे ठळक दिसतात.

No comments:

Post a Comment