Friday, 30 March 2018

असेही एकदा व्हावे !



नमस्कार मंडळी !! कसे आहेत ? मजेतच असणार ना ?
जेव्हा काय करायचं समजत नसतं आणि फिरण्याची आवड असते. तेव्हा सारं काही विसरून फिरायला जायचा माझा निर्णय इतका सुंदर ठरेल हे मलाही माहित नव्हतं.
एक मिनिटं.. मी काय बोलतोय हे समजलं नाही ना ?

चला तर मग जाऊयात प्रवासाला, ही गोष्ट नव्वदीतली आहे, ज्यावेळी नुकतेच फोन वैगेरे आले होते. आणि मी तुमच्याच समकालीन.. 

काही जागा अशाच असतात, जिथे गेल्यावर आपल्याला वाटतं की आपण येथे आधीही आलो आहोत. इथला आणि आपला ऋणानुबंध फार जुना आहे. इथली माती, इथली घरं, इथला कण अन् कण डोळ्यांत साठवलेला आहे.
इतक्या दूर आणि इतक्या उंचीवर असूनही आपला आणि इथला संबंध काय ? तेच नेमकं कळत नव्हतं. मन प्रसन्न तर होतंच पण अस्वस्थदेखील होतं. आजूबाजूला कुणी ओळखीचं नव्हतं पण सारंच ओळखीचं होतं. मी सुहेल, राहणार तसा मुंबईचाच,मुंबईच्या धावपळीच्या दुनियेतून शांत वाटावं म्हणून मी घरी सांगूनच मसुरीला गेलो होतो. परतीचं तिकीट काढता..  

तिथे वातावरण खूप थंड असलं तरी आज्जीने दिलेल्या स्वेटरमुळे थंडी शरीरावर काही असर करत नव्हती. दोन-तीन दिवस गेल्यावर अस्वस्थता अधिकच वाढत गेली. तिथे एक छोटंसं मंदिर होतं, त्यात जाऊन तरी शांतता मिळेल असं वाटलं म्हणून तिथे गेलो. दिव्याच्या प्रकाशात उजळणाऱ्या मूर्तीचं ते रूप पाहून मनाला प्रसन्न वाटलं. ती शांतता खूपच स्फूर्तिदायी होती. मग मंदिर चौफेर निहरायचं असं ठरवून मी बाहेर पडलो.



मंदिराच्या चारही बाजूंना सुंदर अशी फुलबाग होती. ती वर्षभर फुलांनी बहरलेली असेल असं दिसताक्षणी तरी वाटतं नव्हतं. मंदिराच्या डाव्या बाजूला एक जुना फलक होता. त्यावर लिहिलेलं होतं- '' विश्वेश्वर '' 

तसं विशेष काही नसलं तरी दोन-तीन मिनिटं माझी नजर त्यावर खिळली होती. आपण त्याकडे का पाहतोय हे समजलं नाही, म्हणून मी त्याजवळ गेलो आणि निरखून पाहिलं तर त्या फलकाच्या मागे एक चारोळी लिहली होती, चक्क तीही मराठीत.. ज्यावर लिहिलं होतं..

'' रत्नसिंधूच्या प्रांगणात जागा सुंदर गहन
गिरिजेसंग जावया तेथे सुखावले मन
मुक्त वाहतसे शुभ्र सतेज धारेश्वर
मनोभावे संक्रांती पावतसे हा ईश्वर’’


मन काहीसं स्वस्थ झालं. भारतातीलच पण त्या भागात आपल्या मातृभाषेतील त्या ओळी सापडल्याने एक वेगळाच आनंद झाला. तिथल्या त्या ओळींचा फोटो काढून मग मी तपास करायचं ठरवलं. शेजारीच एक लाकडी बांधकामाचं हॉटेल होतं. तिथपर्यंत जायला दगडी रस्ता होता. तसं ते कमी उंचीचच होतं, तिथून काही अंतरावरच तो प्रसिद्ध धबधबा, आत प्रवेश करतच होतो, तर तिथे एक लहान मुलगी तिथल्या पेहरावात खेळत होती. तिने माझे मनापासून स्वागत केले. फारशी भूक नसल्याने मी काहीतरी घ्यायचं म्हणून गरमागरम maggie घेतली. अंश सेल्सिअस तापमानात प्रचंड थंडी वाजत होती खरी पण त्या फोटोमुळे उत्साह कमी होत नव्हता.    

तिथल्या पोलीस चौकीतही चौकशी केली असता काही माहिती मिळाली नाही. अखेर मी तिथल्या पहाडी घरांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. घरी कळवल्यानंतर पुढील प्रवास करण्यासाठी मी निश्चिंत झालो
तिथल्या प्रत्येक घराचे दरवाजे तसे उघडेच होते पण मला त्या ओळींचा अर्थ अथवा त्याविषयी माहिती सांगणाऱ्या एखाद्या व्यक्ती अथवा खुणेकडे जाण्यासाठीचे माझ्या हृदयाचे दरवाजे अजून बंदच होते.



मग काहीच हाती मिळाल्याने उगीचच सारा खटाटोप केला असे वाटणार इतक्यात त्या पहाडीपासून थोड्या अंतरावर एक घर दिसले आणि मग उगीचच हायसे वाटले. त्या घरी पोहोचल्यावर समजले की तिथे  वृद्ध ‘राजेंदर चाचा’ राहतात. त्यांच्या घरातील वस्तू आणि पुस्तकं पाहून जाणवले की ते शिक्षक असावेत. त्यांनी माझा चांगला पाहुणचार केला. मग त्यांनीच सांगितले की ते काही वर्षांपूर्वी दिल्लीला शिक्षक म्हणून नोकरीला होते.

पुढे काही बोलणार इतक्यातच त्यांनी विचारले, '' यहा अक्सर कोई आता जात नही, Tourist लोग भी यहा आते नही, और तुम तो यहा के नही लगते.. फिर यहाँ कैसे ?''

आपण काहीतरी विचारणार आणि कुणीतरी तेच आपल्याला विचारावे हे ऐकताच मला पटले की भेट काही फुकट जाणारी नव्हती.  

गेल्या काही महिन्यांतील धावपळ म्हणून हवापालटासाठी आलेलो मी, त्यात सापडलेल्या त्या ओळी म्हणून मी इथपर्यंत आलो हे सांगितले. थोडाफार माझा परिचय झाल्यावर त्यांनी तो फोटो पहिला. आणि ते म्हणाले तुला शोधायला फार अवघड जाईल.
माझी उत्सुकता जागृत झाली होती मला त्या ओळींचा अर्थ जाणून घ्यायचा होताच म्हणून मी म्हंटलं.. चालेल. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आठ दिवस त्या दोघांनी येथे घालवले आहेत.

त्यांच्याविषयी त्यांनी जे सांगितले ते तुला सांगतो पण ते कुठे असतात, असतील ? ह्याची मला काहीच माहिती नाही.
आता प्रचंड रात्र झाली आहे. तू आराम कर, आपण उद्या ह्यावर बोलू असे म्हणून त्यांनी मला जाण्यास सांगितले. मी तिथल्या जवळच्या घरात राहिलो. तिकडची पहाडी घोंगडी,टोपी सोबत असली तरी मला काही झोप येईना, मला दुसऱ्या दिवसाची पहाट उगवण्याची उत्सुकता लागली होती. फोटो उशाशीच होता. त्या वृद्ध माणसाच्या सांगण्यातून मला पुढला धागा गवसणार होता.








दुसऱ्या दिवशी अधिक वेळ न घेता त्यांनी सांगायला सुरवात केली.
रातकिडयांनी आवाजाचे वादळ उठवले होते. माजघरात दिव्याच्या प्रकाशात चौघेही बसले होते.
निर्मयी , बहीण, आई आणि वडील. वडील गावातील एकमेव नावाजलेली व्यक्ती, नौदलातून निवृत्त झालेले. गावातील लोकांना प्रबोधनाचे धडे देणारे, आई कमी शिकलेली पण स्वभावाने प्रेमळ. निसर्गावर संपूर्णतः अवलंबून असणाऱ्या या गावातील लोकांच्या मनात कुठलीही वैर अथवा पापाची भावना नव्हती. निर्मयीचा वाढदिवस लवकरच येणार होता.

मुलांचं जीवन तसं सोप्प असतं पण आपले आयुष्य आता कसे असेल ह्याचा विचार ती करत होती. आयुष्यात काही अपेक्षा ठेवता लग्न करणे आयुष्य सुखात घालविणे हीच भूमिका मी बजावायची का ? अर्थात हे ही करणे फार सोप्पे नाही पण जन्माला आल्याचे सार्थक व्हावे असा एखादा तरी वाढदिवस साजरा करता यावा असं निर्मयी ला मनोमन वाटत असे.  वडिलांना पेन्शन होती त्यावर कुटुंबाचा खर्च भागत होता. रेडिओवर संगीत असणे हा त्यांचा विरंगुळा त्यांना असे. बाकी कामाच्या पसाऱ्यात दिवसकसा निघून जात असे ते कळतही नसे.

सर्वसाधारणपणे भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या तिच्या मैत्रिणीही आता मोठ्या झाल्या होत्या. लग्न,मुलं,संसार ह्या स्वप्नांव्यतिरिक्त त्यांना काही सुचतच नसे. त्यात निर्मयी चा असा वेगळा विचार त्यांना पटत नसे. मग त्याही तिला समजाविण्याचा प्रयत्न करीत.

पण तिला ही व्यक्त होण्यासाठी त्याच मैत्रिणी असल्याने हा विषय नेहमी ऐकून त्या सोडून देत असत. बऱ्याच विचाराअंती तिने डॉक्टर होण्याचे ठरविले. पण आपली मुलगी पुरुषांच्या क्षेत्रात कशाला ह्या विचारांनी तिच्या आईने तिचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. वडील काही विरोधात नव्हते, पण तिचं आयुष्य मार्गी लागावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि लहान बहिणीला तर ताईने जेवण बनवावं, लग्न करावं म्हणजे आपल्याला मज्जा करता येईल असं वाटत होतं.
अखेर घरच्यांचा विरोध पत्करून तिने admission घ्यायचा निर्णय घेतलाच. त्यात मनात भीतीही होतीच, पुढे काय होणार ?  अश्रूंनी भरलेल्या घरातील चेहऱ्यांचा निरोप घेऊन ती शहराकडे जायला निघाली. निसर्गसानिध्यातील शांतता घरच्यांची सुरक्षितता सोडून निर्मयी  पहिल्यांदाच घरातून बाहेर पडणार होती. परिस्थिती बेताचीच असल्याने सोबतही कुणी नव्हतं.  

त्यासाठी तिने मन आधीच कठोर केलं होतं. आणि पत्राद्वारे ती घरच्यांशी संपर्क ठेवू लागली. स्वप्न उराशी होते. पण ते पूर्ण कसे करायचे याची तिला किंचितही कल्पना नव्हती.

लहानपणी रक्त दिसले तरी चक्कर येणारी निर्मयी  आज अगदी स्वबळावर भरारी घेण्यास निघाली होती. जखमी रुग्ण, अपघाती रुग्ण, त्यांच्या मनाच्या अवस्था . मनाची तयारी सगळे विचार डोळ्यासमोर तरळू लागले.
परिस्थिती माणसाला शिकवते पण माणसानेही शिकण्यासाठी मेहनत आणि जिद्द दाखवावी लागते. हे संस्कार लक्षात ठेवून निघालेली निर्मयी  मजल दरमजल करत पुढे जात होती.

पुढे काही वर्षांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर.. त्यादिवशी निघालेल्या दिवसाचा तो क्षण आणि आजचा क्षण.. ह्यात खूप काळ लोटला होता. घरी जायची उत्सुकता तर होतीच बहिणीचं लग्न झालं होतं, आई बाबाही आता थकले होते. पण प्रॅक्टिस कारणही तितकंच गरजेचं होतं, म्हणून एक हरियाणातील चार महिन्याचा कॅम्प करूनच निर्मयीने घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.   
दुःखात रडण्यापेक्षा धैर्याने जगणारेच सुखी होतात.


लाईटची इतकी सवय लागली होती की दोन-तीन मिनिटं देखील Acविना राहू शकणारा मी इथे कित्येक दिवस आनंदाने राहत होतो. ते सांगतच होते, जणू मला त्यांना भेटायची ओढ लागली होती. कधी कसं केव्हा ह्याची खात्री नसली तरी उत्सुकता वाढतच होती.  
मेणबत्तीच्या प्रकाशात त्या वृद्धांच्या सुरकुत्या मला पुढील प्रवासाची वाट दाखवत होत्या.


आपल्याला कालचं आज आठवत नाही आणि त्यांना ते पैलू, बारकावे जसेच्या तसे आठवत होते. बऱ्याचदा आपण नेहमी दुसऱ्याला ऐकवतच असतो.  'ऐकावं कसं' हे समजावणारे मूर्तिमंत विद्यापीठ म्हणजे ते वृद्ध-‘राजेंदर चाचा’
काही प्रसंग असे असतात आपण उगाचच दडपणात असतो, पण अशा वेळी समोरचा माणूस हळूच आपल्या मनावरचं ओझं हलकं कधी करतो ते समजतच नाही.

प्रवास करून शरीरं थकलं होतं पण झोप काही म्हणावी तशी लागली नाही
कधी कधी वाटतं उशाशी 'काळजी' ठेवून झोपायची सुविधा असती तर.. सूर्यास्तानंतर काम करण्याची माणसाची सवयच सुटली असती तेही कुठल्याहीउपदेशाचे डोस’ पाजता..  





  





दुसऱ्या दिवशी राजेंदर चाचा पुढे म्हणाले,
पुस्तकं पाहणारे,वाचणारे,विकत घेणारे कित्येक असतीलही पण पुस्तकं का वाचावीत हे कुणीही समजून घ्यावं ते त्याच्याकडून..
आपण एखादं पुस्तक घ्यावं, वाचावं आणि ते आवडावं.. ते कितीही वाचलं तरी नव्याने संदर्भ गवसावे अगदी तसंच प्रत्येक पान, त्यातील चित्र आणि संदर्भ..
कोणतही पुस्तक हातात घ्यावं आणि त्याचं नाव सांगावं,  मग त्याच नाव असं  का पडलं असावं ? आणि त्यातील ठिकाणं यांचं अगदी हुबेहूब वर्णन डोळ्यासमोर उभा करणारा तो
त्यातील काही ठिकाणं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत आणि त्याने कुठलीही ठिकाणं पाहिलेली नाहीत. केवळ वाचलेली आहेत, तरीही जसेच्या तसे वर्णन!! खरंच किती भारी ना !!
असा हा महावीर..
घरात तसा एकटाच, आई लहानपणीच वारलेली, पण बाबांनी उत्तम संस्कार केलेला मुलगा.. शाळेत तसा कमीच शिकलेला पण बाकीच्या प्रत्येक कामात अगदी प्रविण ..

मी म्हंटलं , वाह.. मी ही हेच शोधायला शहर सोडून आलो असेन कदाचित.. हे सगळं सांगत असताना  राजेंदर चाचांच्या डोळ्यांत पाणी आलं.
मी म्हंटल.. बडे भी रो सकते है ? त्यांनी आकाशाकडे पाहिलं , हसले आणि म्हणाले, नक्कीच.. तुला अजून बरंच काही पहायचं आहे..

पुढे त्यांनी सांगितलं की,
अखेर ती हरियाणाला पोहोचली, तिला अनोळखी ठिकाणी जाणं काही नवीन नव्हतं.. ती घरापासून लांब राहिल्याने निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात नक्कीच होती. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि व्यवस्था म्हणून निर्मयीची राहण्याची व्यवस्था महावीरच्याच घरी करण्यात आली. 


 

तो होताच असा गावात अगदी आकर्षक आणि उठून दिसणारा
 घरात , साऱ्या गावात तोच सर्वांच्या तोंडी असायचा ,
कुणाच्याही मनावर सहज राज्य करणारा तो राजकुमारच होता जणू..
 हे इतकं सुंदर बघायला मिळेल याची तिला  कल्पनाही नव्हती.
त्याला फारसं व्यक्त व्हायला आवडायचं नाही पण त्याच राहणीमान खरंच सुंदर होतं
निर्मयीला त्याच्या प्रेमात पडायला अगदी इतकंच कारण पुरेसं होतं.

गावही खूप छान होतं आणि सर्वजण मदतही करायचे.  तिची सर्वजण विचारपूस करायचे आणि तिच्या कामाचं कौतुकही..


इतका सुंदर राजकुमार , सर्वांकडून त्याच्याविषयी ऐकलेलं पण तरीही शांत का ?
मदत सर्वाना करत असे पण तरीही तो व्याकुळ दिसे.
त्यानेच सांगितलं कि, गावात कुणाचंही लग्न असलं तरी पाहुण्यांची राहायची सोय आमच्याच घरी असते, असच  काही  महिन्यांपूर्वी रम्या आली होती. आमच्या गावात राहणाऱ्या काकांच्या पुतणीची ती मैत्रीण, पुतणीसोबत लग्नासाठी आली होती.  ती आल्याक्षणीच आवडली होती मला, मैत्रीही झाली पण तिच्यासोबत माझं सारखं असणं तिला अवघडल्यासारखं वाटू लागलं ,
मी तिला प्रेमाविषयी विचारलं देखील ?
तर ती म्हणाली , तू चांगला आहेस पण प्रेम नाही वाटत तुझ्याविषयी..
तुझ्याकडे बघून आदर वाटतोही पण तुला समर्पण करावं असं वाटत नाही. आणि ती लग्न झाल्यावर निघून गेलीही..
त्याच्याकडे पाहिलं कि तो हरवलेला का असे ह्याच कारण आज निर्मयीला समजलं.

बोलता बोलता ती त्याला म्हणाली, “खरं सांग,
तुझं प्रेम आहे म्हणतोस ते ठीक आहे. पण तिने कधी तुला त्या दृष्टीने वागवलं का ? प्रेम एका बाजूने असून संपूर्ण आयुष्य जगता येत का ? हे बघ प्रेमात सोडून जाणारे  आधीच सोडून गेले हे चांगलं नाही का?

लग्नानंतर हे झालं असतं तर??
जाऊ दे.. कल्पनाच केलेली बरी.. !

दोष त्या व्यक्तीचा असतो. पण आपण  स्वतःलाच चुकीचं समजून पुढे जात नाही
प्रेम एकाला जरी वाटत असलं तरी ते एकट्याने पूर्ण होत नाही त्यासाठी दोघांनीही त्यात असायला हवं.











महावीरला जाणवलं की कित्येक दिवसांनी तो हसला होता, त्याला खऱ्या अर्थाने तो कुठेतरी चुकत असल्याची जाणीव झाली. आणि त्याने पुन्हा नव्याने सुरवात करायची असं ठरवलं.
आपण एखाद्याला नावडू ही शकतो हे स्वीकारायला तिनं त्याला शिकवलं.

निर्मयी आयुष्याकडे किती वेगळ्या पद्धतीने बघायची, तिचं बालपण आणि शिक्षण याविषयी ऐकून तिच्याविषयीचा महावीरचा आदर वाढू लागला.
सहवासाने प्रेम जडतं असं म्हणतात पण ते कधी आणि केव्हा जडलं ते समजलंच नाही.

पुढे गावात camp साठी लागणारी सर्वतोपरी मदत म्हणून तो तिथं नेहमीच असायचा.
गावातील लोकांसाठी तिची अविश्रांत मेहनत, त्यातून फार कमीच वेळ बोलायला मिळायचा पण त्यातूनही त्या दोघांच्यात एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती.

आयुष्य खूप जगायचं आहे खूप साऱ्या गोष्टी घडायच्या आहेत , आठवणींचे कित्येक कप्पे अजून रिकामे आहेत, काही काळानंतर आता परिचय होऊ लागला होता.

  
असेच एके दिवशी ती भेटायला गेली होती. आणि घडलं असं..
तिचा चेहरा लाजेने लाल झाला. नेहमीच माणसांचा संपर्क होत असे पण आज त्याच्यासमोर तिला संकटात सापडल्यासारखं वाटत होतं स्तुती कुणाला आवडत नाही पण तिची स्तुती करणं हेच तिला जास्त भावत होतं.

नजरेला नजर देणंही अवघड होत होतं.
कवितेतून अथवा उपमा देऊन बोलण्यापेक्षा त्याला थेट व्यक्त होणं आवडायचं
त्यालाही सोबतीचं कौतुक वाटत होतं , कधी नव्हे तर तो आज तिच्या कलेने वागत होता.


तू इतकी छान बासरी वाजवतोस  माहित नव्हतं ? निर्मयी म्हणाली
मी क्वचितच वाजवतो. कुठे शिकलेलो नाहीये,  महावीर म्हणाला
निर्मयी म्हणाली, अरे पण किती छान ? त्यात समरस होण्यासारखा आनंद नाही
संगीत जगण्याची प्रेरणा देते. आणि ते जगण्यासाठी  नवं नवं करण्याची प्रेरणा देते. आणि समाधानही देते,  महावीर म्हणाला.
बोलण्याचं भान रहात नव्हतं. आज -या अर्थाने वातावरण बहरले होते, सूर्य मावळतीला आला होता तरीही अंधारावर प्रीती मात करीत होती.
जणू सौंदर्य आणि संगीताची मैफिलच जमली होती. 

मग त्याने तिला लग्नाविषयी विचारलं आणि अधिक विचार करता निर्मयीने त्याला होकार दिला.
पण वेगळी जात असल्याने त्यास तिथे मान्यता नव्हती. हळूहळू महावीरच्या वडिलांनीही विरोध दर्शवला आणि तिला घरी परतण्यास सांगितले. तिच्या घरी पाठवण्याची तयारीही केली होती, पण या साऱ्याची खबर महावीरला आधीच लागल्याने ह्यांनीही आधीच पळून जायचे ठरवले. कारण समाजाला त्यांचा निर्णय मान्य नव्हता, कुणीही समजून घेण्याची तयारी दाखवत नव्हतं. याउलट त्या दोघांना वेडं ठरवायचं ही त्यांची जिद्द होती.
ती दोघे निघाली, काय करायचं हे डोक्यात होतंच पण कुठे ते नाही.
 मिळेल त्या बसने त्यांनी जायचे ठरवले.

खिडकीच्या शेजारी महावीर आणि निर्मयी बसले होते, तशी गर्दी कमीच होती , पण कडाक्याची थंडी होती
वळणावळणात एकमेकांना स्पर्श होत होता, घाटात तर इतका slow वेग होता की , उतरावं आणि थेट पळत जावं असं वाटत होतं कारण थंडी असह्य होती.

गरजा कमी असल्या की कुठल्याही प्रसंगातून बाहेर पडणं सोपं होतं हे त्यांनी त्या दिवशी अनुभवलं.. तिच्याकडे असलेल्या त्या शालीपेक्षा एकमेकांच्या कुशीत प्रेमाची उब जास्त परीणामकारक होती.   ते एका गावात उतरले.



जिथे कुणाचीही ओळख नाही, पाळख नाही. 
तिथे मी  त्यांना भेटलो. पाहताक्षणीच वाटलं की आमच्यात काही असावं.. बस्स..!! 
आतापर्यंत एवढंच मला माहित आहे.

आता राजेंदर चाचांची निरोप घ्यायची वेळ आली होती, मी त्यांना भेटवस्तू देऊन निघालो, निघायची इच्छा तर नव्हती पण पुढे काय झालं हे जाणून घ्यायची उत्सुकताही लागली होती. 


मी सर्वप्रथम त्यांनी सांगितलेल्या महावीरच्या घरी जायचे ठरवले. तिथे गेल्यावर समजले की महावीरच लग्न झाल्यानंतर सगळे जण घर- संपत्ती विकून निघून गेले आहेत. तिथे चौकशी केल्यावर अधिक माहिती मला मिळाली नाही. मग काय करावे हे सुचतच नव्हते. आणि अजूनही त्या देवळापाशी सापडलेल्या चारोळीच्या संदर्भ लागत नव्हताच ?

घरी जायची उत्सुकता होतीच पण रुखरुखही लागली होती की आपण इतक्या जवळ पोहोचलो पण हाती काहीच लागलं नाही. शेवटी मग मी घरी जायचा निर्णय घेतला.


परतीच्या गाडीत एक महाराष्ट्रातील कुटुंब होतं, त्यांनी मला सहज विचारलं, तुम्ही मराठी ना ?
कुठे ?
मी म्हंटलं : मी फिरायला आलो होतो आता घरी जातोय.

ते म्हणाले, आम्हीही घरी जात आहोत..

(कधी कधी कुठल्या गोष्टींचे संदर्भ कुठे लागतील हे सांगता येत नाही.)
त्यांना मी तो चारोळीचा फोटो दाखवला,
त्यावर त्यांना संदर्भ लागत नव्हता पण त्यांनी तिथले वर्णन सांगायला सुरवात केली.
गप्पा मारता मारता मला समजलं की कोकणातील आहेत. ते शिवभक्त आहेत.
आणि त्यांनी सांगितले की तिथे बहुतेक सारे शिवभक्त आहेत, कर्णेश्वर, संगमेश्वर, सोमेश्वर तिथले देव आहेत. मग मी घरी जाता तिकडे जायचा निर्णय घेतला. कारण जिथे चारोळी होती त्या फलकावर लिहिलं होतं 'विश्वेश्वर'

मग काही तासांनंतर मी तिकडे पोहोचलो.

तिकडे गेल्यावर संपूर्ण माहिती काढल्यावर मला समजले की ती चारोळी हा पत्ता होता..
संगमेश्वर येथील मार्लेश्वर गावाचा.
तेथील धबधबाही प्रसिद्ध आहे आणि संक्रांतीला गिरीजादेवीशी त्यांचे लग्न लावले जाते.

मला खूप आनंद झाला.  मग मी तिकडे गेलो,  निर्मयीचे घर अखेर सापडले










मु.पो. : मार्लेश्वर.
तिथे निर्मयीचे आईवडील वारल्याचे समजले पण बहीण तिकडे राहत होती तिने पुढची कथा सांगितली.
तिने सांगितलं की,
निर्मयी आणि महावीर मसुरी वरून पुन्हा गावी हरियाणात परतले मग वडिलांना त्यांनी समजावलं तिनेही गावातील लोकांना मदत केली असल्यामुळे तिचा स्वभाव त्यांना माहित झाला होता.
विचार केल्यावर वडिलांचा विरोध ही मावळत गेला.
त्यांना वडिलांविषयी आदर आहे हीच गोष्ट त्यांना भावली आणि परस्पर लग्न न करता ते मला समजवायला आले आणि मला विचार करायला भाग पाडले.
आयुष्याच्या सकाळी आपण कामात, कमावण्यात इतके मग्न असतो की आपल्याला स्वतःशीही बोलायला वेळ मिळत नाही म्हणून निदान उतारवयात माणसाने विचार करावयाला हवा
शांत विचार केल्यावर त्यांनीही लग्नाला मान्यता दिली. 
त्यांचे लग्न तिथेच झाले. पण समाजाचा विरोध पत्करावा लागु नये म्हणून त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करायचा निर्णय घेतला. ते नाशिकला आहे. महावीर आता मोठा व्यापारी आहे, त्यांचे बाबाही सोबत असतात, ताईचं स्वतःच मोठं हॉस्पिटल आहे ते दोघेही आनंदात आहेत, आणि आता १६ वर्षाची क्षिप्राही त्यांच्या आनंदाचे कारण आहे. तिने मला त्यांचा पत्ता दिला. मला ऐकून खूप आनंद झाला.

मग मी त्यांचा निरोप घेऊन तिकडे जायचे ठरवले. प्रवासात लिहिलेली टिपणं आज जोडायचा प्रयत्न करत होतो, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण झाला होता.. म्हणून मी त्या दोघांना एक पत्र लिहायचं ठरवलं.
अखेर मी त्यांना भेटलो.
आत्तापर्यंतची संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहिली..
थोड्या गप्पा मारल्यावर मी निघताना त्यांना पत्र दिलं.
तुम्हीही सारे या प्रवासात सोबत आहातच म्हणून तुम्हालाही ते सांगतोय.
त्यात लिहिलं होतं की.. 


निर्मयी आणि महावीर,
तुम्ही मला ओळखत नसालही पण मी तुम्हाला ओळखतो,

आकर्षणाचं प्रेम खरंतर पाण्यावर दिसणाऱ्या बेटासारखंच
उथळ व तरंगणारं .. असेलही एखादं क्षण सुखावून टाकणारं..

सर्वस्व बहाल करणारं प्रेम हे दोन तृतीयांश मनाच्या समुद्रात असायला हवं.. सोबत नेणारी नौका एकदा का मिळाली ना की एक विलक्षण शांतता मिळतेच
अर्थात दुसऱ्यांना दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास नसतोच तर उरलेल्या श्वासांसाठीचा हा आधार असतो.

एक कविता मला या संपूर्ण प्रवासात सुचली ती पुढे लिहिली आहे.
तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा !!

पाहणे ते दुरुनी कथेच्या ह्या आडुनी
सौंदर्य ते दरवळे ह्या मनाच्या अंगणी
दुःखात ओहोटी तरी मिळे सुखाला भरती
पाहुनी हे नाते हास्य उमलते ओठांवरती

इवलीशी सुमने उमलती मौनातल्या दास्यातूनी
गंध सारे बहरती कळीतल्या हास्यातुनी
नेत्र स्फुरती शब्द कवने जणू वाटे आरसा
अनामिकांच्या पसाऱ्यात दिसे एक कवडसा

नेत्रांत ह्या फुल फुलते आश्वासल्या मातीतुनी
ओढ खुलते बीज रुजते प्रेमाच्या सरींतूनी
श्वेतवर्णी पाकळ्यांत रत्न सारे सांडले
अर्थ सारे गवसले मौनात शब्दांतुनी मांडले


आणि मी त्यांचा निरोप घेतला.
वार्धक्य त्यांच्यातलं सौंदर्य कमी करत नव्हतं, ते त्यांच्या बोलण्यातून,स्वभावातून आणि आत्म्यातून प्रकट होतच होतं.
तुम्हालाही आता सारं लक्षात आलं असेलच.. पुन्हा सारं सांगायची गरज नाही ना ?

आता प्रवास संपणार होता, सगळ्यांचा निरोप घेऊन मी पुन्हा घरी यायला निघालो.. आठवणींचे बोचके थोडे ओले झाल्याने मन जरा जास्तच जड झालंय. आणि पावले पुढे चालत आहेत. सारं काही सुरळीत होऊन पुन्हा नव्याने प्रवास करण्यासाठी.. 
आता घरी थोड्याच वेळात पोहोचेन सुद्धा..

चला तर मंडळी सुरवात करूयात नव्या प्रवासाला.. मी माझ्या आणि तुम्ही तुमच्या..
खूप साऱ्या शुभेच्छा !!







समाप्त


No comments:

Post a Comment