Saturday, 25 March 2017

वपुर्वाई..

वसंत पुरुषोत्तम काळे.
निराळ्या पद्धतीने लिहिणारा शब्दांचा जादूगार !
 
कादंबरी,नाटके,आत्मवृत्तपर,चरित्रात्मक लेखन जरी ह्यांनी केले असले तरी त्याही पेक्षा सरस ते  कथाकथनकार म्हणून भावतात.
 
गोष्ट सांगणं ही एक अद्भुत कला आहे, हल्लीच्या पिढीत प्रकर्षाने हरवत जाणारी ही कला पुन्हा शिकायची असेल तर वपुंना ऐकल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही वयातील व्यक्तीला सहज खिळवुन ठेवणारी त्यांची शैली काही औरच.. ती मजा सांगण्यात नाही ऐकण्यातच आहे. शब्दसामर्थ,उपमा,अंतःकरणास भिडणारे शब्द, प्रसंग विस्तृतपणे मांडण्याचे अनोखे भाषासौंदर्य त्यांच्या लिखाणात आढळते.

सामान्यांना 'असामान्य' करण्याची सहजता त्यांच्या लेखणीत आहे. वपुंची प्रकाशित साहित्य संपदाही खूप आहे. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हरकत नाही.
कुठलीही तुलना नाही पण गंमत म्हणून सांगायचं झालं तर व पु काळे आणि William Sydney Porter (O.Henry) ह्यांच्या कथा लिहिण्याच्या शैलीत थोडे साम्य आढळते.

 

त्यांची काही वाक्य -

एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात.. "हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी, कायम रिताच राहावा.असा मला आशीर्वाद द्या!"

"'जगायचं' - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं - म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत.
केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात.
भोगून पार केलेली संकटं आणि यातना, त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात.
त्याची नशा माणसाला गस्त बनवते, मस्तवाल बनवत नाही..."

"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका."


माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो.
पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो."


'सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.असा एखादा अनुभव.'"

माझं वैयक्तिक आयुष्य माझ्या साहित्यापासून लांब नाही म्हणूनच मला 'वाङमयीन अलिप्तता' साधलेली नाही हे मला जाणवतं,
पण त्याच वेळेला माझ्यातल्या लेखकाच्या आणि माणसाच्या संवेदना एकंच आहेत ह्याचा मला अभिमान वाटतो."

"माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत.
जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.
आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही.
एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं वाटतं. असं का?''




 






















"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही.
वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव
जोडायचे असतात.
म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं.
करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
'साहित्य हे केवळ चुन्यासारखं असतं.'
त्यात आपल्या विचारांचा कात
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही.
आणि लेखकाला हवा असतो तो संवाद.
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही."

 
जीवनात घडणारे प्रसंग तितक्याच ताकदीने मांडणा-या ह्या लेखकाला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन !


Saturday, 11 March 2017

सुख़न..

सुख़न..
नाव थोडसं वेगळं वाटलं..

बंबैय्या हिंदीत तसं लवकर न जुळणारं.. उर्दूचा तसा फारसा संबंध नाही म्हणा ना हवं तर..
निमित्त होतं हातावर अत्तर लावुन स्वागत केलेल्या एका मैफिलीचं..

बीमार को मरज की दवा देनी चाहिए
मैं पीना चाहता हूं, पिला देनी चाहिए
'राहत इंदौरीजीं'च्या रचनेने ह्या सुरु केलेली मैफिल..

मैंने उसको इतना देखा
जितना देखा जा सकता था,
मगर फिर दो आँखों
से कितना देखा जा सकता था..

'उर्दूकी कहानी दीमक की जुबानी' ही अफलातून आहे तितकीच वास्तवाची जाणीवही करून देणारी आहे.  

है मोहब्बत हयात की लज़्ज़त वरना कुछ लज़्ज़त-ए-हयात नहीं
क्या इजाज़त है एक बात कहूँ वो मगर ख़ैर कोई बात नहीं

हफीज जालंधरी यांचं सादर केलेलं
दिल अभी तक जवान है प्यारे किस मुसीबत में जान है प्यारे ही छान होतं



'मख़दूम मोहिउद्दीन' यांनी लिहलेलं आप की याद आती रही रात भर चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर ही सुंदर पेश केलं..


ए-वादा-शिकन ख्वाब दिखाना नहीं था ही अप्रतिम आवाजात सादर केलं
मध्यतंर कधी आलं समजलंच नाही.


स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्दांची मजा सांगणारा 'दर्द लड़की होती है या लड़का ?' हा किस्साही मस्त आहे..

जावेद अख़्तर साहेबांची मैं और मेरी आवारगी ही रचनाही कार्यक्रमात रंगत आणते..

अत्तराचं अस्तित्व बहुधा नाहीसं होत असेल देखील परंतु 'सुख़न' मात्र नक्कीच मनावर कोरली जाते.

अपने सब यार काम कर रहे हैं,
और हम हैं के नाम कर रहे हैं

वेळेचं बंधन असल्याने शेवटी सादर केलेली कव्वाली ही सुंदरच
'सादगी तो हमारी जरा देखिये, एतबार आपके वादे पे कर लिया..'

प्रत्येक भाषेला एक वेगळं महत्व आहे आणि ते त्या भाषेतच समजून आनंद घेण्यात एक वेगळीच मजा आहे...
उर्दू न समजणा-यांही हा कार्यक्रम नक्की पहावा असा आहे. 
लोग डरते हे कातिल की परछाईं से, हमने कातिल के दिल में भी घर कर लिया ||
सुरुवातीला घरात सूरु केलेली मैफिल रसिकांच्या मनात मात्र नक्कीच घर करून राहील ह्यात काहीच शंका नाही..

इक दुश्मन को खुद हमसफ़र कर लिया ||

पुणेकरांनी ताकदीने सादर केलेली मैफिल नक्कीच उर्दूविषयी प्रेम निर्माण करण्याचं, असलेलं प्रेम वाढवण्याचं, मनसोक्त आस्वाद घेण्याचं काम करते.

हा कार्यक्रमाचा आढावा नाही.. त्यामुळे तिथे जाऊन प्रत्यक्ष बघूनच दाद द्यावी हीच माफक अपेक्षा.. 


९ मार्च २०१७





Friday, 10 March 2017

भेद विसरुनी उजळीत हृदये तुला कर जोडिती..



आदर्श तू आम्हां शिकण्या-सुधारण्या अंगण दिलेस जगती
कवी कल्पना साकार करण्या तवपथ हा आचरती
समस्त विश्वाला ध्येयदात्री तू सावित्री

अवकाशाचे ध्येय गवसण्या मिळते तव स्फूर्ती-शक्ती
नभांगणी भारताची 'कल्पना' अढळपदी शोभती
तमवाटेवरची प्रकाशयात्री तू सावित्री

न्यायशील तू तितकीच प्रेमळ प्रेरक स्नेहमूर्ती
संस्कृती रक्षिण्या दुरित जाळण्या येथे 'रमा' गर्जती
अन्यायविरोधी अग्निहोत्री तू सावित्री

आरोग्य असे खरी श्रीमंती करीसी ममतेने जागृती
प्रयत्नी साथ चालता 'आनंदी' सदा तळपती
अबलांची ऊर्जादात्री तू सावित्री

शब्दसुमने भाव प्रकटती मिळे मनाला शांती
ज्ञानदीप उजळे चौफेर होई सामाजिक प्रगती
आद्यमहिलासुधारक कवयित्री तू सावित्री

तुझीया जन्मदिनी तुझी ही मुले शब्दसुमने अर्पिती
भेद विसरुनी उजळीत हृदये तुला कर जोडिती








( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे १० मार्च २०१७ रोजी आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवड झालेली कविता )  

Tuesday, 7 March 2017

हे भलते अवघड असते..


दोन जिवांचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मीलन घडवून आणणारा प्रेमाचा धागा म्हणजेच विवाह. सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्या आशीर्वादाने नव्या आयुष्याची सुरवात करण्यासाठी छापलेल्या पत्रिका,पत्रिकांवर नावे कोणाची छापायची, लग्नस्थळ कुठे असावे, दोघांच्या कुटुंबीयांना लग्नस्थळ सोयीचे पडेल का?बँजोवाले, खरेदी, ह्या सर्व गडबडीत अखेर तो क्षण आलाच.. घराला रंगही देऊन झाला होता.आमच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवून केळवणही झालं होतच..

नव-यामुलीची कलाकुसर पारखण्यासाठीच म्हणा ना हवं तर पण बनवलेला रुखवत खुप सुंदर होता. त्यात एक वेगळाच फोटो माझ्या आई-बाबांनी आमच्यासाठी रुखवतात ठेवायला दिला होता. त्याचा संदर्भ आम्हा दोघांनाही लागत नव्हता. त्याकडे तेव्हा लक्ष तर गेलं होतंच पण विचार करायला वेळ नव्हता.








गंमत म्हणजे त्या सोहळ्यात नऊवारी साडी,नथ घालून आलेली ती चिमुरडी,तिच्या मावशीची मुलगी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. तिचं मुरडणं पाहून सगळ्यांनाच हसू येत होतं.

मग विधीस सुरवात झाल्यावर योग्यसमयी आम्ही उभे राहिलो आणि मामींनी म्हंटलेली गदिमांची ही मंगलाष्टके विशेष भाव खाऊन गेली.

जवळ जवळ मीलनाचा मुहूर्त
उभय तरुण जीवा वाटती शब्‍द व्‍यर्थ
झटपट पट आत विप्र हो दूर सारा
अधीर बहुत झाली, पंख येतील हारा


प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्‍य ध्‍यानी धरा
आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा
सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्‍यापित्‍यांनी दिले
त्‍यांचे श्रेय सुखप्रद तुम्‍हां, ‘कुर्यात सदा मंगलम्’


गुरुजींनी पुढील सुंदर मंगलाष्टक म्हंटल्यावर मला थोडं  हसूच आलं होतं

चांदण्यात चांदणे हे पौर्णिमेचे
लुगड्यात लुगडे ते पैठणीचे
ते लुगडे नेसता मनी हर्ष दाटे
बघुनि समोर नवरा ठेंगणा स्वर्ग वाटे


त्यानंतर एकमेकांना माळा घातल्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद घेताना त्यांचा आग्रहास्तव अवनीने लाजुन घेतलेलं नाव-

हासुनी कळी फुल उमलले, मोहरून आला सुगंध
'व्योम'रावांच्या सोबतीत गवसला मज जीवनाचा आनंद..

नेमकं त्या रुखवतात ठेवायला दिलेल्या  फोटोत काय होतं हे समजत नव्हतं पण आमच्या एकत्र येण्याच्या नेहमीच्या पद्धतीनुसार त्यांनी आम्हाला दिलेलं एक छोटसं त्यांच्या अनुभवांतून काहीसं सुचन करणारं एक छानसं असं सांगणं होतं..


‘’सौभाग्याची जाणीव ठेवुन गरजेच्यागोष्टी प्राप्त करण्यासाठी सोबत येण्यासाठीचे पहिले पाऊल.
नातं म्हणजे केवळ दोघांचं नव्हे तर कुटुंबासाठी मिळालेल्या साधनांतून सर्वाना जपण्याची जाणीव 
वेळ कुणासाठी थांबत नाही. योग्य वेळी योग्य मार्गाने कमावलेल्या पैशानेच सुखप्राप्ती करावी ही समज
सुख मिळवणं म्हणजे नेमकं काय ? प्रत्येकाची वेगळी आणि स्वतंत्र अशी व्याख्या असली तरी ते मानण्यात आहे त्या पेक्षा मिळवण्यात आहे. केवळ सफल होण्यापेक्षा समाधानी होण्यात ते आहेच.  
विवाह केवळ बंधन नव्हे तर आपले विचार, परंपरा जपणे, त्यासाठी स्वप्नांना बळ देण्यासाठी पुत्रप्राप्ती
आयुष्य हा क्षणाक्षणांचा उत्सव आहे फक्त तो मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि लहानग्यांसोबत धमाल मस्ती करता करता

साजरा करता यायला हवा.
आयुष्यात फक्त करार नाही, केवळ समाजबंधन म्हणुन नाही तर येणा-या सुख-दु:खात दोघांच्या 'सहयोगा'तुन धैयाने जीवन जगणे
वधुसमावेत तांदळाच्या सात राशींवर पाऊल ठेवताना तिच्या माझ्यासंबंधी अपेक्षा तसेच माझी तिच्याविषयी  असलेल्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव म्हणजेच सप्तपदी..’’

आम्हां दोघांनाही त्या फोटोचा उलगडा गुरुजींनी सांगितल्यावर झाला.. तेव्हा त्या गोष्टीची जाणीव झाली. कर्तव्याचं भान ठेवायला भाग पडणारे आशीर्वादाचे ते हात आजही प्रेरणा देणारेच आहेत

सर्वाना सन्मानाने,थोड्याश्या आग्रहाने
वाढता यावे म्हणून जेवताना व्हावी संगत.
म्हणून जेवणासाठी आमच्या दोघांच्याही आग्रहाने ठेवली होती पंगत..  

बाबांचे डोळेही पाणावले होते. तिच्याशी नेहमी भांडणारा तिचा भाऊही आज रडत होता. मग तिला जप असं मला बाबा म्हणाले.. आणि जड अंत:करणाने सगळ्यांचा निरोप घेऊन भावी आयुष्याची सुरवात करण्यासाठी आम्ही घरी जावयास निघालो.
वाद्यांच्या आवाजात आम्ही हळुहळु घरी पोहोचलो देखील..

तशा आठवणी म्हणा छायाचित्रांच्या माध्यमातून कायमच्या मनावर कोरल्या जातातच..

क्रमश:








हे भलते अवघड असते.. 
(भाग ६)