आदर्श तू आम्हां शिकण्या-सुधारण्या अंगण दिलेस जगती
कवी कल्पना साकार करण्या तवपथ हा आचरती समस्त विश्वाला ध्येयदात्री । तू सावित्री ।।
अवकाशाचे ध्येय गवसण्या मिळते तव स्फूर्ती-शक्ती
नभांगणी भारताची 'कल्पना' अढळपदी शोभती
तमवाटेवरची प्रकाशयात्री । तू सावित्री ।।
न्यायशील तू तितकीच प्रेमळ प्रेरक स्नेहमूर्ती
संस्कृती रक्षिण्या दुरित जाळण्या येथे 'रमा' गर्जती
अन्यायविरोधी अग्निहोत्री । तू सावित्री ।।
आरोग्य असे खरी श्रीमंती करीसी ममतेने जागृती
प्रयत्नी साथ चालता 'आनंदी' सदा तळपती
अबलांची ऊर्जादात्री । तू सावित्री ।।
शब्दसुमने भाव प्रकटती मिळे मनाला शांती
ज्ञानदीप उजळे चौफेर होई सामाजिक प्रगती
आद्यमहिलासुधारक कवयित्री । तू सावित्री ।।
तुझीया जन्मदिनी तुझी ही मुले शब्दसुमने अर्पिती ।
भेद विसरुनी उजळीत हृदये तुला कर जोडिती ।।
( डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे १० मार्च २०१७ रोजी आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवड झालेली कविता )
No comments:
Post a Comment