गणेश नमन
नमन तुज गणेशा
बुध कौशिक ऋषी विशेषा
श्री सीतारामचंद्र देवता।
अनुष्ठूपछंदा, शक्ती सीता
श्रीमद हनुमान कीलकम।
श्रीरामचंद्रा व्हावे प्रीतम
जपावे सदा या स्तोत्रा
श्रीराम तोजी तो त्राता।
प्रार्थना
ध्यान करा ज्याचे बाहू अजान बाहू
धरी करी जो चापबाण,राम पाहू
बसे बद्ध पद्मासनी,पितांबर जो नेसला
नेत्र कमलदलापरी, वदनी प्रसन्नता
वामांकी असे सीता,करी मुखावलोकना
नील मेघापरी कांती जयाची,अलंकारधारी
जटामंडल धरी शिरी, वंदावा तो राम रामप्रहरी।
रामरक्षा
चरित रघुनाथाचे असे शतकोटी श्लोकांचे।
एकेक अक्षर जयातील,
होई महापाप नाशाचे।।
शामवर्ण जयाचा नीलकमलापरी,
असा राम राजीव लोचनी।
जानकी लक्ष्मण जयासंगे,
जटामुकुट दिसे शोभूनी।।
तलवार जया हाती,
पाठी राहे बाणभाता।
दुजा हाती चापबाण,
करुनी संहार दानवांचा।
होई जगाचा त्राता।।
करी जे पातकांचा नाश,
पुरवी सर्व कामना।
करुनी ध्यान प्रभूचे,
हे रामरक्षा स्तोत्र ह्मणा।
रघुराज वंशी जन्माला जो,
तो राम करो मस्तकाचे रक्षण।
दशरथाचा पुत्र तो राम,
करील मम भाल रक्षण।।
कौसल्या पुत्र जो राम,
राखो माझे नयन।
विश्वामित्र प्रिय तो रघु,
कान करो सदा श्रवण।।
करो ती रक्षण नाकाचे,
भ्राता लक्ष्मणाचा करो रक्षण मुखाचे।
सकल विद्या जयाला ज्ञात
तो विद्यानिधी राखो रसना।
करी भरत जयाला वंदन
तो राम मम कंठा रक्षिल ना।।
दिव्य अस्त्रे जया स्कंधी,
तो राखेल मम खांदे ।
केले भंग शिवधनु जयाने,
तो राम रखो मम बाहू आनंदे।।
सीतापती राम जो,
करा रक्षण मम करांचे,
जिंकले जयाने परशुरामा,
करील रक्षण मम हृदयाचे।।
जिंकले जयाने खर नामे दानव,
तो राम रक्षो मम मध्य अंगा।
देई अभय जो जांबवना,
राखील मम नाभी स्थाना।।
स्वामी जो सुग्रीवाचा,
तो रक्षो प्रदेश कटीचा।
तो रामप्रभू मारुतीचा,
करील रक्षण मम जांघाचा।।
जो रघुत्तम करी नाश दानवांचा,
तो राम रक्षील ऊरू साचा।
जयाने बांधला सेतू सागरी,
गुडघ्यांचे करी रक्षण तो राम।
जयाने वधिला लंकापती रावण,
तोच राखेल पोट-या उत्तम।।
बिभीषणाला दिले जयाने राजपद,
तोचि रोखेल मम पदाला।
देई आनंद जो सकला,
तो राम रक्षील सर्व शरीराला।।
जो करील पठण या स्तोत्राचे
तो रामबल योगे पावेल सकल साचे।।
तो होईल चिरायू सुखी,
वाढेल तयाचा कुलवंश।
सर्व कार्यी मिळेल विजय,
विनयाने शोभेल जयाचा वंश।।
रामनामाने होई जायचे रक्षण,
त्या मानवाचे जाणा हे लक्षण।
पाताळ,भूमी वा आकाशी,
खल तयाचे करती न अवलोकन।।
राम,रामभद्र वा रामचंद्र,
या नामाने करी जो स्मरण।
त्या मानवाला स्पर्शती न पापे,
सुखे मिळती तयाला,
मोक्षे होई पावन।।
जिंकाला सकल जगता,
तो मंत्र राही सफल रामनामाचा।
त्या मंत्राने मंतरलेला गोफ,
करी धारण कंठी,
पावेल सकल सिद्धी जाण।।
इंद्रवज्र जसे संरक्षक राहे,
तैसेच हे रामकवच रक्षक पाहे।
करी स्मरण जो या स्तोत्राचे,
आज्ञा पाळती सकल जन।
लाभेल तयाला जय सर्वदा,
होईल तयाचे कल्याण।।
ही रामरक्षा स्वप्नी सांगती,
स्वये शंकर बुध कौशिका प्रती।
तैसीच काढली लिहुन,
येता जाग प्रभाती।।
वन हे जणू कल्पवृक्षांचे,
करी दूर जे सर्व आपदा।
त्रैलोकी जो मनोहारी राम,
प्रभू आमचा, लागो तया पाद।।
तरुण, रूपसंपन्न सुकुमार जो,
तरीही तो महाबलशाली झाला।
पुंडरीकाप्रमाणे जयाचे अक्ष,
केले तयाने परिधान कृष्ण जीनाला।।
सेवती कंदमुळफल जे,
जितेंद्र, तपस्वी अन ब्रम्हचारी।
केला संहार राक्षस कुलांचा,
ते रामलक्ष्मण चापबाण धारी।।
रघुकुली पुत्र दशरथाचे,
श्रेष्ठ सर्वधनुर्धरामाजी।
ते बंधु करोत रक्षण
प्राणीमात्रांचे या जागामाजी।।
सदैव सज्ज धनुष्य बाण हाती,
अक्षय भाता राहे जया पाठी।
ते राम लक्ष्मण चालोत पुढे,
मार्गी माझ्या रक्षणा साठी।।
अंगी कवच करी धारण,
चापबाण,जया हाती तलवार।
आमचा मुर्तिमंत मनोरथ जणू,
लक्ष्मणासह राम करो रक्षण वारंवार।।
राम दाशरथी जो शूर,
जयाचे अनुचर लक्ष्मण करी।
काकुस्थ कुळीचा पुरुष पूर्ण,
कौसल्यासूत रघुत्तम तो हरी।।
जाणी जो वेदांतविद्या,
तो पुराण पुरुषोत्तम।
जानकीचा वल्लभ तो राम,
वैभवशाली दावी अतुल पराक्रम।।
श्रद्धेने करी जो नित्य,
जप माझ्या या नामाचा।
लाभेल त्याला अश्वमेधाहून,
पुण्य,यात काय संशय तो कशाचा।।
दूर्वदलापरी शामवर्ण जयाचा,
नेत्र पद्मापरी,पितांबरधारी।
त्या रामनामाची करती स्तुती,
ते मनुज संसारातुनी मुक्त होती।
रघुकुल श्रेष्ठ लक्ष्मणाचा भ्राता,
तो रघुवर सीतापती सुंदर।
काकुस्थ कुलोत्पन दया सागर,
तयासी प्रीय होत ते वीप्रवर ।।
राजेंद्र, सत्यप्रिय तो दाशरथी,
शामल आनंददायी ती शांतिमुर्ती।
रघुकुल तिलक, जयाने वधिला
रावण, त्या रामाला आनंदे वंदती।।
रामा,रामभद्रा वेधसे,
रघुनाथा,नाथा नामे जो बोधिला।
करुनी प्रणाम त्या देवा,
तो सीतापती आम्ही नमिला।।
श्रीराम राम रघुनंदन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणगर्जनी राम राम।
श्रीराम राम शरण तुला राम राम।
श्रीराम चंद्र चरण स्मरतो मनापासुनी।
श्रीराम चंद्र चरण स्तवितो मी गाऊनी।
श्रीराम चंद्र चरण नमितो शिर लवूनी।
श्रीराम चंद्र चरण शरण मी रात्रंदिनी।
माता राम मम पिता रामचंद्रा,
स्वामी राम मत्सखा राघवेंद्रा।
मम सर्वस्व राहे तो रामचंद्र,
त्या राघवा नमस्कार माझा।।
दक्षिणेस लक्ष्मण जयाच्या,
वामांगी राहे जनकात्मजा।
पुढे उभा मारुतीराया,
त्या राघवा नमस्कार माझा।।
देई आनंदा जनांना जो,
रणात देई धीर तो रणशूर।
राजीव नेत्री असे जे कारुण्यरूप,
श्रीरामाला वंदन भरुनी ऊर।।
मनाप्रमाणे गती जयाची,
वेग राहे पवनापरी।
जितेन्द्र, बुद्धीमंतात श्रेष्ठ जो।
तो वानर युथांचा पुढारी।
त्या वातात्मजा शरण जावे,
राहे जो रामदूत सर्वतोपरी।।
कविता शाखावरी बैसोनी,
रामनामाचे करी जो गुंजन।
त्या मधुर मधुराक्षरांना देई रूप,
वाल्मिकी करी कोकिल कुंजन।।
जो आपदांचा नाश करी,
जो दाता सर्व संपदांचा।
देई आनंद जो जनलोका,
करतो नमन मी साचा।।
करता गर्जना रामनामाची,
जळती बीजे या भवसागरी।
देऊनी सकल सुख संपदा,
ते नाम यमदूता धडकी भरी।।
राम राजमणी सदा विजयी,
त्या रामाला सदा भजावे।
जयाने मारिला निशाचर चमू ,
त्या रामाला सदैव नमावे।।
नसे दुजा श्रेष्ठ रामाहुनी
त्या रामाचे राहे मी दास।
चित्त माझे राहे रामठायी,
तो राम उद्धरी मज आज।।
हे मनोरमे, सांगती शिव गौरीप्रती।
मी भजतो सदैव रामनामाते।
आनंदायी ते नाम मनारमवी,
ते नाम राहो मुखी सदा ते।।
याप्रमाणे बुधकौशिक कवीने।
रचले हे स्तोत्र आनंदाने।
ते रामरक्षा स्तोत्र या परी,
होई संपूर्ण, गावे आनंदाने।।
No comments:
Post a Comment