Thursday, 17 December 2015

" Oh! How great is LOVE... and How little am 'I' ! "


''न समजलेल्या ओळींना खूप काही अर्थ असतात...
 उस्फुर्तपणे प्रकटलेल्या भावना व्यर्थ नसतात.. '' 
 नातं कुठलंही असो, प्रत्येकाशी जोडलेला संबंध असो.. त्यात 'प्रेम' असलं तरच ते टिकतं..
''आयुष्य जगण्याला लढण्याच तेज हवं असतं..
स्वप्नांची भरारी घेण्यासाठी पंखांना उडण्याच बळ हवं असतं…
जगतात तर काय 'निर्जीव' यंत्रे देखील हो..
पण 'जीवा'ला जगण्यासाठी मात्र 'प्रेम'च हव असतं..''
कधी,केव्हा,कसं,कुठे होईल ते माहित नाही..पण शोधलं कि सापडतंच..!
वय कुठलंही असो..दिनदर्शिकेच्या तारखांना काळाचे कोणतेच संदर्भ नसतात.
मोकळेपणाने बोलत जावं ह्याचा अर्थ असा नाही कि जगापुढे आपलं सगळं आयुष्यच उघडून ठेवावं.
स्थळ,काळ,व्यक्तींचं तारतम्य पाळणं मात्र ह्यात गृहीत आहे...अर्थात परिणामांची भीती न बाळगता !!

कधी भावनेच्या आहारी जाऊन दाखवलेलं धाडस केविलवाणं होऊ शकत.अथवा त्यात सहजभाव नसेल तर गोंधळ होऊ शकतो,
नाहीतर जे बोलायला हवं ते आयुष्यभर बोललं जात नाही. आत्मसन्मानाचा हळुवारपणाही त्यात जपला जात नाही..म्हणून 'सत्या'च्या पायरीवरच प्रेम होऊ शकतं.
संबंध जपताना प्रेमाचंच 'खत'पाणी घालायला हवं; कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात..नाहीतर संशयाची बांडगुळ वाढायला जरासाही वेळ लागत नाही आणि राग-द्वेष ह्यांच्यामार्फत हा वटवृक्ष पोखरायला..

दृष्टीतून आश्वासन,स्पर्शातुन मायेची ऊब,चुकांतून समजण्याची वृत्ती,शरण नव्हे तर समर्पणाचा भाव संपला ना..तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत नाही. म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला…कि 'जगण्याचा' त्रास होत नाही.

प्रेमाचे अनेक पदर आणि छटा उमजत जाणं हा एक समृद्ध प्रवास असू शकतो.ह्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला नवीनच आनंद देत असतो.भावनांचे रेशमी बंध अलगद उलघडत जातात, मग पती-पत्नीच्या नात्यांत फक्त 'व्यापार' वा स्वार्थ इतकाच प्रेमाचा मुक्काम ठरत नाही तर आयुष्याला प्रवाही करणारं ते एक माध्यम ठरतं.
कुणीतरी म्हंटलय ना,''मनाची दारं उघडी हवीत.अनुभवांना सामोरं जायला हवं.भीतीनं दार बंद करून घेऊन फटीतून पाहिलं तर आकाश तेवढंच दिसणार ! त्याची व्याप्ती कळ्णार नाही. मात्र संपूर्ण दार उघडलं तरच ती नजर विस्तारते. उमगतं,प्रेम म्हणजे स्वीकार,सहजता,सन्मान,विश्वास,अवकाश आणि आनंद..''

ते पवित्रही हवं..निस्सीमही हवं अन् आल्हाददायकही..म्हणजेच जितकं ते कमवायला हवं तितकच ते दयायलाही हवं. भक्तीत, 'Expectational Love'ने सुरु होणारा हा प्रवास Emotional Loveपासुन ते Intellectual Loveपर्यंत करता-करता, 'Eternal Love'मध्ये त्याचं 'परिणीत होणं' हीच खरी जीवनाची सार्थकता आहे.

कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..'Anything For You..Here' And 'Handle With Care' असेल तर प्रेम फक्त टिकत नाही तर ते हृदयात रहातं आणि वाढतंच जातं..असो! शब्दांच्या ह्या पसा-यात थोडीशी धूळ झटकली इतकंच.ज्याचं त्यानंच शोधायला हवं.कारण प्रेमात पडायचं(?).. नव्हे तर 'जगायचं' असतं. चर्चा करुन Between the Lines 'ते' शोधण्यापेक्षा थेट 'अनुभवायचं' असतं. 

5 comments: