Wednesday, 23 December 2015

'गोपाळा..गोपाळा..देवकीनंदन गोपाळा..!'

''भुकेलेल्यांना=अन्न, तहानलेल्यांना=पाणी, उघड्यानागड्यांना=वस्त्र गरीब मुलामुलींना=शिक्षणासाठी मदत,बेघरांना=आसरा,अंध,पंगू रोगी यांना=औषधोपचार,बेकारांना=रोजगार,
पशु-पक्षी,मुक्या प्राण्यांना=अभय, गरीब तरुण-तरुणींचे=लग्न,दुःखी व निराशांना=हिंमत,गोरगरिबांना=शिक्षण.
हाच आजचा रोकडा धर्म आहे!हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!''
असे सांगणारा हा महापुरुष महाराष्ट्राच्या इतिहासात सतत ५० वर्षे कार्यरत होता.निरक्षरता,अंधश्रद्धा,व्यसनाधीनता यांवर कडाडून प्रहार करणारे हे चरित्र म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर.अमरावती येथे शेणगाव नावाच्या गावात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला.चिंध्यांची गोधडी हेच त्यांचे वस्त्र,पायात पादत्राणांचे तुटके जोड,खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू अश्या अपरिग्रह वृत्तीने जगणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत म्हणजे गाडगे महाराज..








                  'गोपाळा!गोपाळा!देवकीनंदन गोपाळा..'म्हणत लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे बाबा म्हणत,‘मी कोणाचा गुरू नाही,मला कोणी शिष्य नाही.’आचार्य अत्रे म्हणत,'सिंहाला पाहावे वनात,हत्तीला पाहावे रानात,गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात..!' डॉ.बाबासाहेब आंबेडकरही बाबांची विचारपुस करीत असत.धर्मांतराचा निर्णय घेताना आंबेडकरांनी बाबांना मत विचारले तेव्हा गाडगेबाबा म्हणाले,''ते तुमचे तुम्ही पहा,पण दोन रस्ते टाळा. भारताबाहेरून आलेले रस्ते सोडून द्या. तुमच्यामागे लक्षावधी लोक आहेत.या लेकरांची दिशाभूल होणार नाही एवढी काळजी घ्या.' 'बाबा Socratesप्रमाणे 'Dialectical Method'ने कीर्तन करीत.संत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
           कर्मवीर भाऊराव पाटील बाबांना आप्त वाटत. ज्यावेळी अनुदानाचा प्रश्न उद्भवला,त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यास बाबांनी भेटुन मदतीची सूचना केली,पुढे अखंड महाराष्ट्रात 'रयत शिक्षण संस्था' नावाची चळवळ उभी राहिली.कर्मवीरांनी कृष्णा-कोयनेच्या संगमावर वसलेल्या कराड शहरात 'सदगुरू गाडगे महाराज महाविदयालया'ची स्थापना करून कृतज्ञता व्यक्त केली.'गाडगेबाबांचे संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी आहे.'असे गो.नी.दांडेकरांनी म्हंटले आहे. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत,आपले तत्त्वज्ञान पटवून देत.त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे.’असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
शहरांत उपचारासाठी येणा-या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा,गोरगरीबांसाठी अन्नछत्रे,दुष्काळग्रस्तांना मदत,निर्धन विद्यार्थ्यांसाठी शाळा व वसतिगृहे काढून ज्ञानमंदिराकडे नेणारा, माणसांत भगवंत पाहणारा, माणसांच्या सभोवतालच्या स्वच्छतेबरोबरच 'मानसिक व बौद्धिक' स्वच्छता  करणारा हा कर्मयोगी '२० डिंसेंबर १९५६' या दिवशी सेवामुक्त झाला.
    'डेबू', 'देवकीनंदन गोपाळा' हे गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहेत.गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते.
पुरस्कार :
महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
 The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
 आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
 कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
 गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
 गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
 गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
 दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
 मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
 मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
 लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
 श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
 श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
 श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट,   अकोला (१९९४)
 श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
 श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
 श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
 श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
 श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
 संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
 संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)





No comments:

Post a Comment