Tuesday, 7 February 2017

हे भलते अवघड असते..











हे भलते अवघड असते..
(भाग २)


‘स्वप्न की प्रेम?’  ह्या गोंधळात ४-५ महिने सहज निघून गेले.एके दिवशी माझ्या मित्राची एक कविता वाचनात आली; त्यात लिहिलं होतं..
''स्वप्नांची आहे सोबत म्हणून वास्तविकतेला अर्थ आहे
जर स्वप्नच पडली नाहीत तर झोप सुद्धा व्यर्थ आहे..''
आकाशात दडलेली नक्षत्रे जशी चंद्रप्रकाशातच उजळून येतात, तशीच कविता वाचताच माझ्या मनातील त्या भावना अचानक डोळ्यांसमोर तरळल्या. त्यादिवशी मी मित्राकडे  घरी गेलो होतो.. सोबत तिच्या कवितेचा कागद घेऊनच.. कारण कुणालातरी मनातलं सांगावं आणि  मोकळं व्हावं.. हे मनात होतंच.. तो मला कधी नव्हे तर म्हणाला  “बुद्धिबळ खेळतोस का?” बुद्धिवानांचा खेळ, त्यात अजब नियम, ही मनात असलेली भीती म्हणून मी कधीच न खेळलेलो हा खेळ, मग मला तो नियम समजावीत होता आणि मी त्याला माझी 'ट्रेन'कहाणी.. बुद्धिबळाचा डाव अखेर सुरु झाला.. मनात द्वंद्व सुरु होतंच.. काही वेळाने हत्तीची चाल केली.. माझ्या समोर असलेलं प्यादं देखील मी नकळत मारलं नाही.. तर तो म्हणाला,''अरे! हत्तीची चाल जशी आडवी असते तशी उभीदेखीलं..!''  मग ती चाल मी सुधारली.. नंतर मी हरणार हे दिसताच म्हंटल मला झोप येतेय.. चल झोपुयात.. त्यानेही होकार दिला..
'कधीही हार न मानण्याची ही 'चाल' मी यशस्वीरीत्या खेळलो होतो.. मग झोपण्यापूर्वी तो मला म्हणाला, “अरे मगाशी तुझ्या कहाणीत बोललास, ती कविता तरी दाखव.” मग मी त्याला तो कागद दाखवला..बाजूला मीही होतोच. तो वाचत होता.आणि माझ्या मनात त्या बुद्धिबळाच्या खेळातले त्याचे शब्द आठवत होते की, ''अरे! हत्तीची चाल जशी आडवी असते तशी उभीदेखीलं..!'' 
पाचही बोटं हाताच्या मुठीत बंद करून मधलं बोट ओळखायला लावायच्या खेळात पहिल्या फटक्यात जसं कुणी ओळखावं तसं मला त्या  कवितेत गवसलं..



''नित्याचाच जीवन एक प्रवास..
जणु तुझ्या येण्याने फुलला गुलमोहोर..!
रंगले स्वप्न मनी हे प्रीतीचे
गवसला मज तवरूपे चित्तचोर..!
निशीदिन हवी सोबत तुझी खास
वाट तू शोधशील ना ? शब्दातुनी अंतरीचे भाव ओळखशील ना ?
सरतील मग विरहाचे क्षण सारे.. सापडेल मग प्रेमाचा नित्यनवा अनुभव..!!''
=नि ज रं ग नि वा स   :  निजरंग निवास..

‘स्वप्न की प्रेम’ यातील दरी आता नाहीशी होऊन पुढील वाट दिसू लागली होती.. ‘निजरंग निवास, देवबाग.’
संकट जशी एका पाठोपाठ येतात तसं आनंदाचे प्रसंगही.. माझा मामाची बदली देवगडच्या पोस्टात झाल्याची बातमी दुस-याच दिवशी मला मिळाली.. त्याने फिरायला यायची सूचना केलीच होती.. म्हणून मामाला आमच्या कथेत पोस्टमन न बनवायचा निर्णय न घेता मी थेटच तिकडे जाण्याचा निर्णय घेतला..
मामाला तसे राहायचे घर नसल्याने तो एका आजोबांच्या घरी रहात होता.. कोकणातली चि-यांच कौलारू आणि प्रशस्त घरं.. ऐकलं  होतं आता पाहतही होतो. खूप खोल्या,मागे पुढे आंगण, घराच्या पुढे समुद्र आणि मागे संथ वाहणारी नदी आजुबाजूला भरपूर आंबा, फणस, चिकू अशी झाडं.. प्रवास खूप झाल्याने मी त्या दिवशी जेवून झोपी गेलो.
सूर्योदय..!!
मुंबईच्या इमारतीत ह्याकडे सहज दुर्लक्ष होतंच. प्रत्येकाला विनामुल्य असं अनुभवायला दिलेलं निसर्गाने अनोखं बक्षीस.. कोकणात भल्या पहाटे थंडीत नदीत आंघोळ करण्याचा मूर्खपणा करणारा मी नव्हतो.. सगळं आवरलं आणि गावात मंदिरात  गेलो.. पत्ता शोधायच्या नादात असतानाच अचानक तीच समोर येताना दिसत होती..मी काहीही न बोलण्याचा मूर्खपणा ह्यावेळेस करणार नव्हतोच. अखेर मी तिलाच विचारलं, “गावात काय काय आहे बघण्यासारखं ? मी मुंबईवरून आलो आहे मामाकडे फिरायला.. समोरच्या घरात राहतोय.” 
मी आलोय हा आनंद.. इतका वेळ का लावलास हे नजरेतून सांगणारे डोळे.. थोडासा राग.. थोडीशी आपुलकी.. तिच्या चेह-यावरील अनेक रंग मला उमगत होते..
ती उत्तरली :
(कुणीतरी म्हंटलय)
''..रचना सुरेख केली..
ना वेध अनुभवायचा
..अरसिक वाचणारे
..उपयोग काय त्याचा?''
जोरात हसत हसत ती सांगून गेली भेटू लवकरच.. !! अर्थात तेही मागे पाहत पाहतच.. 

जग केवढं मोठं आहे, आपलं कुणालातरी असंच भेटणं आणि पुन्हा शोधणं.. हे बहुधा अशक्यच वाटत असलं तरी.. एकदा का आपलं कुणी असं समोरच येऊन भेटलं की वाटतं.. आपलं 'जगच' इथून आहे.. 
संध्याकाळी ती तिच्या भावासोबत निमंत्रण द्यायला घरी आली होती.. त्यांच्याकडे उद्या पूजा होती.. मला खरवस आवडतो हे तिच्या लक्षात होतं.. म्हणून तो घेऊन आली होती. मामा तिला सांगत होता की ह्याला खरवस प्रचंड आवडतो.. आम्ही दोघेही मनातल्या मनात हसत होतो.
तिला कविता आवडतात हे माहित असल्याने 'तुझ्यावरच्या कविता' हे पुस्तक मी तिला घेऊन गेलो होतो. पण देण्यासाठी मामासमोरच प्रश्न विचारला की “तुला कविता वाचायला आवडतात का ? मी एक नवं पुस्तक वाचतोय..” तर तिचा भाऊच म्हणाला, “अरे हिसुद्धा छान कविता करते..!!” अखेर तिच्यासाठी आणलेलं पुस्तक तिला सुपूर्द केलंच..
तिच्याकडे पूजेला गेल्यावर तिच्या घरच्यांना  तिच्या भावाने करून दिलेली माझी ओळख म्हणजे हे ‘पोस्टमन काकांचे पाहुणे’ बरं का.. खूप पुस्तक वाचतात आणि खरवस आवडतो आणि फिरायला आलेत चार दिवस.. गावात पूजा म्हटलं की movie बघणं ओघाने आलंच.. मग त्यात काही आनंदाचे क्षण एकत्र घालवण्याची संधी मीही सोडणार नव्हतोच..
निघताना मी तिच्या घरच्यांना विचारलं की मला फिरायचं आहे.. ह्या छोट्याला उद्या नेऊ का ? तिचे बाबा म्हणाले, “आता विचारायचं काय , न्या की सोबत..” तो हट्ट करून बसला की  “ताई सुद्धा सोबत हवी मग”.. मी म्हंटलं जवळच जातोय.. मग त्यांनी परवानगी दिली..
फिरण्याचा दिवस फार लवकर गेला.. तिचा भाऊ त्याच्या छोट्या मित्रानाही घेऊन आलेला.. मग आम्ही गप्पा मारत फिरत दिवस घालवला.. तिने तिच्या बालपणीच्या जागा.. तिची डायरी तिने मला दाखवली.. तिने माझ्याशी आणि मी तिच्याशी  बोलत होतो ४-५ महिन्यांतील घडामोडी..इ.  जणू काही तिच्या जपुन ठेवलेल्या आठवणींच्या अत्तराचा सुगंध विश्वासाने माझ्यासाठीच दरवळत असावा..हा दिवस हा क्षण संपूच नये, ही भावना मनात होतीच.. अखेर सूर्यास्ताच्या आधीच घरी पोहोचतो, असं सांगून निघाल्याने आम्ही वेळेत घरी पोहोचलो..
तिच्या घरी माझं यथोचित स्वागत झालं.. मग ‘मी उद्या निघतोय’ अस सांगितलं, तेव्हा तिच्या वडिलांनी मला सुखद धक्काच दिला होता.. की अवनी सुद्धा ‘मुंबईला येणार आहे’ तिला जॉब लागलाय आणि तिचं Call Letter आणि फर्स्ट month ची सॅलरी आल्यावरच ती मुंबईला येणार होती.. कारण सर्वकाही होईपर्यंत तिने Work From Home एक महिना त्या कंपनीसाठी केलं होतंच.. तिचे बाबा अगदी विश्वासाने खांद्यावर हाथ ठेवून म्हणाले, “पाहुणे.. तुमच्या मुंबईत माझी बहीण राहते.. आता तुमच्याशीही ओळख झाली आहे.. तेव्हा हिला काही लागलं तर मदत करा.”
मीही ठामपणे सांगितलं : “काळजी नसावी...”
तिने दाखवलेलं कोकण मला नक्कीच भावलं होतं.. अन् तिची साथही.. 

गावातून निरोप घेताना ती आली होती..
मी उशीर झाल्याने घाईतच होतो..दोघांचेही पाणावलेले डोळे दिसत होतेच.. त्यात तिने मला एक चिठ्ठी दिली.. भरल्या अंत:करणाने, जड पावलांनी मी पुन्हा मुंबईत पोहोचलो.. सोबत मामाही आला असल्याने ती चिठ्ठी तशीच बंद होती..  मी ती उघडली.. खूपच घाईत लिहिलं असावं कदाचित तिला लिहिण्यास वेळ/सवड मिळाली नसावी..
त्यात लिहीलं होतं..
.



Dear Vyom,
“It is happy to sharing wid u.. I got the job in Mumbai.. we will defenately meet soon.. sry, I want to give you surprise; but my father told u already.. My employee No. is 20812’’
13-1-8-5-6-4-18-1,  16-22-20,  12-20-4;
23-15-18-12-9,
13 -21-13-2-1-9.

Yours,
 Avni..

क्रमश:

No comments:

Post a Comment