जे.कृष्णमूर्ती (११ मे १८९५) प्रख्यात भारतीय विचारवंत. जन्म तमिळनाडू राज्यातील मदनपल्ली (जि. चित्तूर) येथे. वडिलांचे नाव नारायण अय्या. आडनाव जिद्दू. १९०९ मध्ये सी. डब्ल्यू. लेडबीटर व मिसेस अॅनी बेझंट यांना अंतर्ज्ञानाने, केवळ तेरा वर्षे वयाच्या कृष्णमूर्तीमध्ये त्याच्या उज्ज्वल भावी आयुष्याची पूर्वचिन्हे दिसली. त्यामुळे त्यांनी कृष्णमूर्तीच्या शालेय आणि आध्यात्मिक शिक्षणाची जबाबदारी पतकरण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार कृष्णमूर्तीच्या वडिलांनी प्रथम कृष्णमूर्तींना त्यांच्या स्वाधीन करण्याचा करार केला. तथापि नंतर मात्र त्यांनी मुलाचा (कृष्णमूर्तीचा) ताबा मिळावा म्हणून दावा दाखल केला. प्रिव्ही कौन्सिलने मिसेस बेझंटच्या बाजून निकाल दिला (१९१२–१४).१९१४ ते २१ ह्या काळात मिसेस बेझंट यांनी खाजगी रीत्या नामांकित शिक्षकांकरवी कृष्णमूर्तीचे शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण करून घेतले, तसेच कृष्णमूर्तीच्या आध्यात्मिक कार्याकरिता १९११ मध्ये ‘पूर्वतारक संघ’ (द ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट) ह्या संस्थेची आणि तिच्या हेराल्ड ऑफ द स्टार ह्या मुखपत्राची स्थापना केली. संघाच्या प्रमुखपदी त्यांनी कृष्णमूर्तीची स्थापना केली. ‘पूर्वतारक संघा’चे १९२८ मध्ये सु. एक लाख सभासद होते. हॉलंडमध्ये एक किल्ला व सु. २,०२५ हे. जमीनही संघास देणगी म्हणून मिळाली होती. संघाचे वार्षिक मेळावे भरत, तसेच जगद्गुरूशी मीलन झाल्याची घोषणा होऊन कृष्णमूर्तीची स्वतंत्र विचारांनी ओतप्रोत अशी प्रवचनेही होत. त्यामुळे कृष्णमूर्तींची कीर्ती जगभर पसरली.
दुभते जनावर दूध देण्याचे बंद झाल्यानंतर त्याची रवानगी कोंडवाड्यात का केली जाते ? झाडाला फळे लागणे बंद झाले म्हणजे त्याच्यावर कुऱ्हाड का चालविली जाते ? ही रोजच्या जगण्यातली उदाहरणे इतरांवर प्रेम करण्याच्या मुळाशी काहीतरी अपेक्षा असण्याचे प्रतिनिधीत्व करतात. कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण इतरांवर प्रेम करू शकत नाही, ही व्यावहारिक भावनाच प्रत्येक मानवाच्या आणि मानवी समूहाच्या प्रत्येक समस्येचे मूळ आहे, हा सिद्धांत जे.कृष्णमूर्तींनी आपल्या विचारांतून मांडला आहे. शिक्षणपद्धतीतून समाज घडतो. या पद्धतीची बीजेच नीतिमूल्यांना सुरुंग लावणाऱ्या तत्त्वांनी बाधित झाली आहेत. निरपेक्ष प्रेमाचे कोंदण या शैक्षणिक बीजांना मिळाले तर समतोल समाजाची निर्मिती शक्य आहे, हा नवा शिक्षण विषयक दृष्टीकोन त्यांनी रूजविला आहे.
कुठल्यातरी अपेक्षा किंवा मानवी स्वभावाच्या वृत्तींवर अवलंबून असणारी प्रेमाची संकल्पना अवलंबित्वामुळे अपूर्ण ठरते. देशात सध्या प्रचलित असणारी शिक्षणपद्धती हे अवलंबित्व आणि अपूर्णत्व येथील समाजाला देते. समाजातील समस्यांचे मूळ शिक्षणातील मूल्यशिक्षणाच्या विरोधी तत्त्वांमधून येते, याकडेही जे. कृष्णमूर्तींचा विचार प्रकर्षाने निर्देश करतो. या समाजाला संघर्षाच्या नियमापलिकडे नेण्याच्या प्रक्रियेला जे. कृष्णमूर्ती मुक्ती मानतात. निरपेक्ष प्रेम हे मुक्तीच्या संकल्पनेच्या जवळपास पोहचते. कुठल्यातरी भावनेला किंवा अपेक्षेला प्रत्युत्तर म्हणून व्यक्त झालेले प्रेम हे प्रतिक्रीया असू शकते. जेथे प्रतिक्रीया येते त्यामागे व्यापार किंवा व्यवहार दडलेला असू शकतो. हे व्यवहार विरहीत प्रेम समाजात निर्माण होण्याची प्रक्रिया मानवी समूहाचा प्रवास मुक्तीच्या दिशेने नेते. विचारांची सर्व आंदोलने शून्यात विलीन करून या मुक्तीच्या दिशेने मानवी समूहाला नेण्याचे स्वप्न जे. कृष्णमूर्ती यांनी पाहिले. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना चालून आलेल्या विश्वगुरूपदाचा त्याग करून व्याख्याने, लिखाण आणि संवाद या माध्यमांद्वारे माणूस अन् माणूस उभी हयातभर त्यांनी पिंजून काढला.
आपल्या पाल्याने शिक्षण अन् करिअर मधल्या रॅट रेसमध्ये टिकाव धरावा. जीवनात त्याने सत्तेची आणि भौतिक उंचीची पदे त्याने पादक्रांत करावीत, एवढ्याच मर्यादित ध्येयासाठी पालकरूपी समाज जगतो. मात्र, तुम्ही जितके वर जातात तितके इतर दु:खी होतात, हा विचार कृष्णमूर्ती मांडतात. याचा अर्थ सत्तेची किंवा उंचीची पदे कुणीही पादक्रांत करू नये असा नाही तर त्या सत्ताप्रवासाला समाजाची आक्षेपरहित संमती असायला हवी, या विचारांकडे त्यांचा कटाक्ष आहे. सत्तेचे पद साम, दाम, दंड अन् भेद या लालसेतून जन्म घेते. ही लालसा निर्माण करणारी शिक्षणपद्धतीच बदलवली तर स्पर्धारहित समाज निर्मिती शक्य आहे, हा दृष्टीकोन ठेऊन भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेत कृष्णमूर्तींच्या अनुयायांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या आहेत. आपल्या जीवनात आपणच स्वत: स्वत:चे शिक्षक आणि विद्यार्थी बनण्याचा अनोखा विचारही ते मांडतात.
सध्या आपले सामाजिक जीवन कलह, द्वेष, मत्सर, युद्धे इत्यादींनी आणि वैयक्तिक जीवन काळजी, भीती, दुःखे इत्यादींनी भरलेले आहे. याच्या मुळाशी मन-बुद्धी यांविषयीचे आपले अज्ञानच आहे. मन-बुद्धीची मुख्य वैगुण्ये पुढीलप्रमाणे होत : (१) मन पूर्वसंस्कारांनी बद्ध आहे. (२) आपण समस्यांची वर्णने, चिकित्सा, उपाय योजना इ. करताना परिस्थितीला परस्परविरोधी मर्यादा घालतो. (३) कर्ता ‘मी’ याला आपण अवास्तव महत्त्व देतो. (४) पूर्वानुभवावर विसंबल्याने नित्यनूतन वर्तमानाचा आपणास विसर पडतो. या सर्व चुकांवर कृष्णमूर्तीच्या मते एकच उपाय आहे आणि तो म्हणजे, आपल्या मनाच्या सर्व व्यापारांकडे आपण स्तब्धतेने, त्यांना चांगले-वाईट न म्हणता अथवा त्यांबाबत कुठलीही अभिलाषा न बाळगता, निव्वळ पाहणे किंवा त्यांची अवधानपूर्वक संपूर्ण जाणीव बाळगणे (अवेअरनेस) हा होय. यामुळे चुका उघड होऊन, सत्याचा प्रादुर्भाव होतो. मन अधिक विचलित न झाल्यास प्रादुर्भूत सत्य दृढ होते. अशा प्रकारे स्तब्धतेने चुकांचे निरसन करणे, म्हणजेच ध्यान होय. एकंदरीत कृष्णमूर्तींनी प्रतिपादन केलेला मार्ग अध्यात्माचा अथवा तत्त्वमीमांसेचा नसून, तो ज्ञानमीमांसात्मक योगमार्ग म्हणजे ‘समत्व योग’ आहे. वैश्विक दृष्टी,मानव व पर्यावरणाचा विचार,शास्त्रीय दृष्टीचा समावेश असणारी धार्मिक चेतना ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवुनच त्यांनी शाळा सुरु केल्या.
भयासारखी भावना अनुभवल्याशिवाय आनंदाची अनुभूती अपूर्ण आहे. भय असो वा आनंद प्रत्येक भावनेचा वाहक विचार असल्याकारणाने त्या विचारांवरील नियंत्रणच विचाररहित अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यास कारणीभूत आहे. हे लक्षात घेऊन विचाररहित मनोवस्था साधण्याचा सराव मानवी समस्यांच्या पलिकडे मानवी जीवनाला घेऊन जातो, हा अनुभवण्यासारखा सिद्धांतही त्यांच्या ओघावत्या लिखाणातून येतो. वैश्विक आणि शास्त्रीय दृष्टीकोन, बाळगणाऱ्या जे. कृष्णमूर्तींच्या विचारांमधील शिक्षण दारिद्र्यापासून ते आण्विक युद्धांपर्यंतचे सर्व प्रश्न आपल्या कवेत घेते. आत्मकेंद्रित समाजाचा दृष्टीकोन जगात विषमता अन् दुहीपेक्षा इतर वेगळी फळे देऊ शकणार नाही, यासाठी निरपेक्ष प्रेमाची कृती प्रत्येक मानवाच्या जीवनात रोजची दीपावली साजरी करू शकेल.
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी जे.कृष्णमूर्तींचे निधन झाले.
जीवनाच्या संघर्षात भाकरीपासून ते आण्विक युद्धापर्यंतच्या प्रश्नांनी सारे जगच ढवळून निघाले आहे. या टप्प्यावर तत्वचिंतनाच्या बैठकीला जग कितीसे गांभीर्याने घेणार ? या प्रश्नाला भीक न घालता जे.कृष्णमूर्तींचा शिक्षण विषयक संदेश या दीपावलीत अंतरीच्या उंबरठ्यावर प्रकाश पाडण्यास पुरेसा ठरावा..
कृष्णमूर्तीचे ग्रंथलेखन
फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम (१९५४), एड्यूकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ लाइफ (१९५५), कॉमेंटरीज ऑन लिव्हिंग (तीन भागांत – १९५६,५९,६०), लाइफ अहेड (१९६३), धिस मॅटर ऑफ कल्चर (१९६४), फ्रीडम ऑफ द नोन (१९६९), द ओन्ली रेव्हील्यूशन (१९७०), द अर्जन्सी ऑफ चेंज (१९७१) इत्यादी. यांशिवाय त्यांच्या प्रवचनांचे व भाषणांचे पंचाहत्तर संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांपैकी पेंग्विन कृष्णमूर्ती रीडर (१९७०) उल्लेखनीय आहे.
No comments:
Post a Comment