Sunday, 19 February 2017

हे भलते अवघड असते..




“प्रश्न लवकर पडतात,पण उत्तरं शोधावी लागतात. त्याकरीता वाट पहाण्याखेरीज काहीच गत्यंतर नसते.”
मला भावलेली गोष्ट म्हणजे मी तिला दिलेल्या कोड्याच्या उत्तरानंतरही तिचं वागणं बदललं नव्हतं. अर्थात हे मात्र दिलासादायक होतं. कोडं ? तिलाही जाणवलं.. नुसतंच प्रश्न नसलेलं. विचार करायला भाग पाडलेलं.. पण नेमकं काय आहे, हे समजायला तिला महिनाभर तरी लागला. 
म्हणजे,  तू=२ मी=४ मैत्री=६

१) २४६२४६

२)प्रतिष्ठा,पैसा,राग,संशय,आनंद,आदर,भीती,अपेक्षा,सुंदरता,सवयी,काळजी= ११
 २४६२४६/११ = २२३८६

३)प्रतिष्ठा,पैसा,राग,संशय,आनंद,आदर,भीती,अपेक्षा,सुंदरता,सवयी,काळजी,मन,बुद्धी= १३
 २२३८६/१३  = १७२२

४) १७२२/२४६= ७

मग मात्र तिने मला कॉल केला की, “अरे मला उत्तर मिळालंय. आता तरी ते तिकीट उघडून पाहू का. ?” मला तिला मिळालेल्या उत्तरापेक्षाही तिने तिकीट अजूनही न उघडण्याचा ‘खरेपणा’ नक्कीच भावला होता.
खरंतर आपण एखाद्याला काही सांगावं आणि त्याला ते कळू नये, ह्याखेरीज दुसरी कुठलीही वाईट गोष्ट ह्या जगात नाही. परंतु मला ठाम विश्वास होता की, कोडं हे ‘निमित्त’ होतं अन् मला जे ‘सांगायचं’ आहे ते ‘वेगळंच’ होतं..
तिचा एकेदिवशी फोन आला की आज अचानक गावी जायचं आहे काही दिवस. मग मी तिला म्हणालो, “सगळं आवरून आमच्या घरीच आज जेवायला ये. त्यानिमित्ताने आई-बाबांशीही ओळख होईलच.” ती आली, जेवण देखील झालं:  त्यादिवशी 'कोकणकन्ये'चं दर्शन घरच्याना झालंच! मग घरच्यांची परवानगी घेऊनच मी तिला सोडायला गेलो. मला कोड्याच्या उत्तराची प्रतीक्षा होतीच. ट्रेन निघण्यापूर्वी तिने माझ्या हातात एक पत्र दिले.

तिने माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं.ज्यात लिहिलं होतं..  

प्रिय व्योम,
       कसा आहेस ? तू मजेतच असतोस नेहमीच, मीही मजेत आहे. ऐक ना.. समोर भेटल्यावर नेमकं हेच बोलता येईल की नाही किंवा फोनवर नीट सांगता येईल की नाही समजत नाही; म्हणून पत्रातून व्यक्त होतेय.भावनांना पोहोचवण्याचं एक आवडतं साधन - पत्र..!!तुझ्या तीन अंकी कोड्याचं उत्तर मला मिळालंच. पण तुला नेमकं काय सांगायचं आहे हे मला समजलं, तेव्हा खूप खूप खूप आनंद झाला. किती सहज बोलतोस रे तू ? तुझा खूपच हेवा वाटतो मला.
तू, मी, मैत्री हे आपल्या जीवनातील न विसरता येणारे खास अनुभव. ज्यांना तू २वेळा सरळ गृहीत धर म्हणालास. एकदा तुझ्यासाठी आणि एकदा माझ्यासाठी. ब-याचदा आपण  नातं नेमकं प्रतिष्ठा, पैसा, राग, संशय, आनंद, आदर, भीती, अपेक्षा, सुंदरता, सवयी,काळजी ह्यावर निवडतो ? की खरंच आपुलकीने ? म्हणून त्याने भागलं की उरतोस फक्त 'तू..' नातं जसं मिळतं, तसं दिल्यानेच पूर्ण होतं, नाही का ? म्हणून पुन्हा मीही त्यातुन प्रतिष्ठा, पैसा, राग, संशय, आनंद, आदर, भीती, अपेक्षा, सुंदरता,सवयी, काळजी अन् सर्वात महत्वाचं मन, बुद्धीच समर्पण सुद्धा. ह्यांनी 'तू'ला भागलं.. की उरते फक्त 'मी'.
'मी' लाही तू,मी, मैत्री ने भागलं की उरते  फक्त ' साथ-प्रेमाची..!!'
किती रे सुंदर विचार करतोस ? ते तिकीट उघडायच्या आधीच मला समजलं होतं हे सारं तुझ्या कोड्यातून.. नव्हे ! तुझ्या विचारलेल्या प्रश्नातून. पण तरीही एक औपचारीकता म्हणून मी तिकीट पाहिलं आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला समजलं. किती सुंदर आहे ना.. आपण कुणावर तरी प्रेम करावं, ह्यापेक्षा आपल्यावर कुणाचं तरी प्रेम आहे, ही भावनाच खूप सुखद आहे..
                                                                                                            - अवनी



कोड्याचं नेमकं उत्तर तिला मिळालं होतं ह्याच खूप समाधान होतं पण तिच्या मनात काय असेल ह्याची उत्सुकता ही..

काही दिवसांनी ती गावावरून परतलीदेखील,सोबत गावाचा 'खाऊ' घेऊनच..नातं सांभाळणं एकवेळ सोप्पं असतं पण नातेवाईक.. न बोललेलं बरं.. हा खाऊ दुसरा तिसरा कुणी नसून तिचा मामेभाऊ होता. तिच्यासोबत आलेला. आल्यानंतर प्रत्येकवेळी तिच्या बोलण्यात तोच असायचा आणि भेटीसाठी ती आल्यावरदेखील तोच. लहानपणी जसं आपल्या वाटणीचा खाऊ आपल्यालाच मिळावा अन् दुस-या कुणालाही तो मिळू नये ही भावना मला खूप सतावत होती.  ती तशीच होती.. पण मी मात्र बदलत होतो..
एके दिवशी आम्ही सोबतच होतो. तिला पंचतंत्रातल्या गोष्टी फार आवडायच्या.तिच्या आज्जीने तिला लहानपणी खूप सांगितलेल्या. ती मला एक गोष्ट सांगत होती. एक छोटी मुलगी तिच्या आजोबांचा हाथ धरून चालली होती. एक मोठं झाड त्यांच्या शेतातलं.. ती म्हणाली, ”हे  झाड खूप जुनं आहे ना ?”
आजोबा म्हणाले, “हो माऊ..अगदी माझ्याही आधीचं..!!”
“आजोबा, झाडं इतकी वर्ष कशी काय टिकतात ?”  
“खरं सांगू, मला नेमकं ठाऊक नाही; पण माझ्या अनुभवावरून मला समजलं आणि आपल्या पूर्वजांनी नाती जपण्याचा आश्वासक दृष्टीकोन दिला, त्यातुन  ते तुला सांगतो. झाडं आपुलकीनेच वाढतात. ‘झाडं सजीव आहेत’, असं जगदीशचंद्र बोस यांनी जगाला प्रयोगाने सांगितलं, त्यापूर्वीही कित्येक अगोदर वृक्षांशी असलेलं भावविज्ञान येथे ज्ञात होतंच की ! त्यांना आपल्या स्पर्शांतून मोठं होण्याची प्रेरणा मिळते. मायेची ऊब मिळते, अगदी थंडीत तुझ्या आज्जीने शिवलेल्या गोधडीची उब तुला मिळते तशी.
झाडं परोपकारी असतात.. तू त्यांना दगड मारलास, तर ते तुला फळं देणार नाहीत असं होत नाही. चुकीला शिक्षा अशी असते की ती चूक पुन्हा होऊ नये हे समजायला हवं.  
झाडं मोठं होईपर्यंत मातीशी नाळ जोडतात आणि मोठी झाली तरी मातीचे उपकार विसरत नाहीत. ही त्यांनी स्वीकारलेली मातीची गुलामी नव्हे किंवा अगतिकतेने पत्करलेली शरणागती नव्हे; तर आयुष्यभर सोबत राहण्यासाठी केलेलं जाणीव पूर्वक समर्पण आहे.
झाडं वाढायला खूप वर्ष लागतात. पण आजुबाजूचं गवत किंवा बांडगुळं वाढायला काही दिवसही पुरेसे असतात. तसंच आकर्षण वेगळं आणि प्रेम वेगळं. सोबत असणं वेगळं आणि आपुलकी असणं ह्यात खूप फरक असतो.
माऊ, तू खुप लहान आहेस, कधीतरी ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.”
मग मी अवनीला घरी सोडलं आणि मी माझ्या घरी जायला निघालो.
‘नेमकं तिच्या मनात काय आहे ?’  मला काहीच समजत नव्हतं..

मी अस्वस्थ झालो होतो. एका नव्या सूर्योदयाची वाट पहात होतो. पण डोळ्यांसमोर मळभ दाटलं होतं.
घरी पोहोचलो, जेवलो आणि मग तिला Gud Night चा sms करणार तेवढ्यात तिचा sms मला आला.
त्यात लिहिलं होतं..


‘’दृष्टीतून _ _ _ _ ,
_ _ तुन मायेची ऊब,
चुकांतून _ _ _ ण्याची वृत्ती,
शरण नव्हे तर _ _ _ _चा भाव संपला ना..
तर नात्यांचा श्वास 'Ventilator' लावून देखील टिकत नाहीत.
म्हणूनच नात्यांचा 'श्वास' जपला कि 'जगण्याचा' त्रास होत नाही.
संबंध जपताना _ _चंच खतपाणी घालायला हवं;
कारण नात्यांचे वृक्ष असेच बहरतात.’’


मी शब्दांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार तेवढ्यात निद्रादेवीच्या अधीन कधी गेलो समजलंच नाही.

क्रमश:







हे भलते अवघड असते..
(भाग ४)

1 comment:

  1. भेट जरी ना या जन्‍मातून
    ओळख झाली इतकी आतून
    प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर

    ReplyDelete