Wednesday, 11 November 2015

पावसाला आवतान...


सरल्यावर पाचांनंतर त्या, आहे 'खास' मास 'जून',
काळ्या पांढ-या गर्द ढगांच्या, 'पाठशिवीचा खेळ' रुजून,
सृष्टीच्या घटकांतील संयम, चालला आहे निजून,
सगळीकडे एकच चर्चा, "हा पडत का नाही अजून"? 

'ऊन कोवळे' म्हणता म्हणता, चांगलेच गेले आहे 'माजून',
हरित तृणासह मृगपृष्ठेही, काढलीत त्याने 'भाजून',
सोड तुझे तू 'मौन', आमुच्या 'प्रार्थना'ही गेल्यात थिजून,
दे ना ! थेंब तुझ्या 'स्पर्शा'चा,
बहरून येईल पुन्हा रुजून

घेऊन बसलो आहे कराया, रचना तुजवरी अंदाजून,
कागदासवे 'पर्व नवे', पण शब्दच पडले आहेत 'जून'
पुन्हा लिहुयात बालभावगीतं, नकोच त्या 'वैरण्या' अजून
"पाठव माझ्यासाठी तीजसवे, 'शब्दांची घागर' आवर्जून" 

AC च्या पाण्याने गेलेत, पत्रेही सारे भिजून,
बंद करून दरवाजे खिडक्या, भावनाही जातील कोमेजून,
मुक्तपणे करण्या विहार, मज खोलू देत दरवाजे अजून,
येशील ना आतातरी लवकर, "का वाट पहावी आम्ही अजून" ?  


No comments:

Post a Comment